"गो नी जोशी"
श्री. गो नी जोशी सर - चारुदत्त कुलकर्णी प्रास्तविक सरांचा आणि माझा संबंध 1977 ते 1980 पर्यत जास्त आला. ते आम्हाला विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर येथे चित्रकला शिकवत असत. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात शालेय जीवनात येते आणि आपल्या जीवनावर खूप मोठा ठसा उमटवून जाते .आपल्याला ती काही उतराई करण्याची संधी देत नाही किंवा मिळत नाही .लांबून पाहणाऱ्याला ती व्यक्ती जरी सामान्य वाटली तरी ती खूप असामान्य होती आणि तिच्या प्रतिभेला योग्य तो न्याय मिळाला नाही याचा सल आपल्याला सतत वाटत राहतो .पण त्या व्यक्तीनेच तसे राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. विद्यापीठ हायस्कूलमधील चित्रकलेचे शिक्षक श्री गो नि जोशी हे असंच एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते .स्वत ची शैली असलेला एक असामान्य चित्रकार ,ज्योतिषशास्त्राचे गाढे व्यासंगी ,अफाट ताकद आणि चपळता असलेला एक अथलिट ,घरची परिस्थिती चांगली नसताना कित्येक मुलांना शिक्षणासाठी आश्रय देऊन त्यांच्यावर प्रेम करणारा एक सहृदय माणूस ,पंचवीस माणसे अंगावर धावून आले तरी त्यांना एकटा तोंड देऊ शकेल अशा निधड्या छातीचा माणू...