"देवधर सर"
#शाळेतील आठवणी
#(विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर)
By : चारूदत्त कुलकर्णी
एखाद्या कसलेल्या गवयाच्या मैफिलीप्रमाणे देवधर सरांचा इतिहासाचा तास रंगलेला असे. सर्व मुले मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. सर फळ्यावर फक्त धड्याचं नाव लिहीत. नंतर फळ्याकडे पाठ आणि मुलांकडे तोंड करून खुर्चीवर बसत आणि मुलांना म्हणत आता फक्त श्रवणभक्ती करा... त्यांचं बोलणं सुरू झालं की मुलं त्यात अगदी गुंगून जात. बोलता बोलता कधीतरी डस्टर बरोबर चाळा करण्याची त्यांची सवय. मधेच थांबून मुलांना सांगत की हे लिहून घ्या. सरांच्या या रिवाजातून मुलांकडे नोट्स आपोआप तयार होत. ते बोलत असताना मुलांनी फक्त ऐकायचे आणि त्यांनी सांगितल्यावरच वहीमध्ये लिहायचे अशी पद्धत होती.
शिकवतांना पुस्तक बघण्याची गरज सरांना कधीच पडली नाही. अभ्यासक्रमात आवश्यक असेल त्यापेक्षा खूपच जास्त ते शिकवायचे. प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव उलगडून दाखवायचे. विषय अतिशय मनोरंजक करायचे. सरांचा इतिहासाचा तास कुणीही बुडवायचे नाहीत किंवा त्या तासाला दंगा करायचे नाहीत. परीक्षेतही सर्व मुलांना इतिहासात खूप चांगले मार्क पडायचे. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना सर आपल्यातीलच एक वाटायचे.
देवधर सरांचं पूर्ण नाव माधव शंकर देवधर, घराणे मूळचे सांगलीजवळच्या दुधगावचे, तिथे त्यांचे वडिलोपार्जित कापडाचे दुकान होते. सरांचे वडील मॅट्रिक झाल्यानंतर कोल्हापुरात आले आणि त्यांनी स्वत:चा व्यवसाय थाटला. परफेक्ट सोप वर्क्स नावाचा त्यांचा साबणाचा कारखाना होता. सरांना तीन भावंडे, बहीण सुधा, नंतरचा भाऊ प्रमोद आणि धाकटी प्रेमा. सर सर्वात मोठे.
मॉन्टेसरी ते अकरावीपर्यंत पूर्ण शिक्षण विद्यापीठ हायस्कूलमध्ये झाल्यावर पुढे बी ए, बी एड करून सर विद्यापीठ हायस्कूलमध्येच नोकरीला लागले. कालांतराने मनात आले तेव्हा दोन्ही वर्षांचे आठही पेपर्स एका दमात लिहून सर एम ए झाले. त्यानंतर एम एड ही झाले.असे करणारे युनिव्हर्सिटीच्या इतिहासातील ते पहिले आणि शेवटचे असावेत!
बारा जून एकुणिसशे सदुसष्ठला सरांचा विवाह झाला. सरांच्या सौभाग्यवती विजयाताई या पूर्वाश्रमीच्या मंगला वसंत गोखले. त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीला. वडिलांच्या बदलीच्या गावी बिर्हाड फिरत राहिल्याने बाईंचे अकरावीपर्यंतचे शिक्षण सहा वेगवेगळ्या शाळेतून झालेले.
प्रत्येक गोष्ट खूप इंटेन्सली किंवा उत्कटतेने करायची असा सरांचा स्वभाव. शाळा संपल्यानंतर ते लक्ष्मीपुरीतील दळवीज आर्ट मध्ये जाऊन तिथे कलेचा इतिहास शिकवायचे.
सरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. सरांच्या घरी पुस्तकांनी भरलेली सात-आठ कपाटे होती. महाभारताचे अठरा भाग, रामायणाचे खंड असे पौराणिक वाङ्मयही त्यात विराजमान होते. प्रत्येक पुस्तकात कुठल्या पानावर काय लिहिले्ले आहे याबद्दलची सरांची फोटोग्राफिक मेमरी अचंबित करणारी होती.
यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी सरांचे मार्गदर्शन घेण्यास येत. अशा वेळी सर बाईंना हाक मारून त्या विद्यार्थ्याला हवा असलेला संदर्भ असणारे पुस्तक वरच्या मजल्यावरच्या कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात किती क्रमांकावर लावलेले आहे हे त्या पुस्तकाच्या कव्हरच्या वर्णनासह सांगून आणून देण्याची विनंती करीत आणि विद्यार्थ्याला अपेक्षित संदर्भ त्या पुस्तकात किती क्रमांकाच्या पृष्ठावर आणि कोणत्या परिच्छेदात असणार आहे याची कल्पना देत.
एखादे पुस्तक मिळाले की ते वाचून संपवल्याशिवाय खाली न ठेवणे हा सरांचा स्वभावविशेष. कधी कधी असे वाचन उत्तररात्री दोन-तीन वाजेपर्यंतही चालत असे. सरांचे हे सर्व वाचन हे आडवे पडून होत असे.
शास्त्रीय संगीत हा सरांचा एक आवडता विषय. त्या काळात सरांकडे साठ-सत्तर निरनिराळ्या प्रख्यात गायकां-गायिकांच्या कॅसेट्सचा संग्रह होता. रोजच रात्री झोपण्यापूर्वी अगदी एक-दीड वाजेपर्यंत ते शास्त्रीय संगीत ऐकायचे.
स्वत:चा फायदा होऊन इतरांचा तोटा झालेले सरांना कधीच सहन व्हायचे नाही! सामान्य माणसाला कदाचित हे अव्यवहार्यही वाटले असते पण सर तसेच होते. एकवेळ स्वत:चा तोटा झाला तरी चालेल पण इतरांचा फायदा व्हावा यासाठी ते सतत झटले.
सरांच्या बरोबर सहलीला जाणे ही एक पर्वणी असायची .बेलूर-हळेबीडसारख्या ऐतिहासिक स्थळांबद्दल त्यांना प्रचंड माहिती होती. कोणत्याही सहलीत सरांचे स्थळविवेचन हे अनेकांगांनी होत असे. खूप माहिती आपल्या ओघवत्या शैलीत ते सांगत असत त्यामुळे त्यांच्यासोबत सहलीला जाणे हे सहकारी शिक्षकांनाही खूप आवडायचे. विशेष म्हणजे स्थळदर्शनात कुठे शृंगारिक अभिव्यक्ती दिसली तर त्यांना त्याचे वावडे नसे. अशावेळी दहावीच्या मुलांनी जरा बाजूला या, असे म्हणून थोड्याश्या याही गोष्टी ते मुलांना सहज समजावून सांगायचे!
सर पाठ्यपुस्तक मंडळाच्या अभ्यासक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांच्या काळात कोल्हापूरच्या शाळेतील एका शिक्षकाची राज्यस्तरीय शिक्षण मंडळाच्या समितीवर निवड होणे ही सरांच्या विद्वत्तेची साक्षच!
देवधर सर बरोबरीच्या आणि त्यांच्यानंतरच्या सर्वच शिक्षकांचे आधारस्तंभच म्हणायचे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक सोसायटी स्थापन करणे आवश्यक होते जेणेकरून शिक्षकांना अडचणीच्या वेळी कर्ज किंवा काही अर्थिक, मानसिक पाठबळ मिळेल. सरांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले. हे सारे संघटनात्मक कार्य करतानाही ते कधीही कुणापुढे झुकले नाहीत. त्यांना जे पटत असेल त्या पाठीमागे ते ठामपणे उभे असायचे. आर जी सरांचे आणि त्यांचे संबंध खास जिव्हाळ्याचे होते. आर जी कुलकर्णी सरांना ते गुरुस्थानी मानत. जवळजवळ रोजच सर आर जी सरांकडे जात, दोघे तिसऱ्या मजल्यावर जाऊन काहीवेळ बोलत बसत व नंतर सर तेथून आपल्या घरी जात.
विद्यापीठ हायस्कूलमधल्या एस एस कुंभार सरांच्या पहिल्या तासाला देवधर सर बसले होते. तास संपल्यावर ते मुख्याध्यापकांना म्हणाले, हा माणूस खणखणीत आहे, अभ्यासू आहे... कुंभार सरांची तिथे कायमची वर्णी लागण्यामध्ये देवधर सरांनी केलेल्या या प्रशंसेचा वाटा होता. सच्चरित राहून केलेल्या साधनेचे वजन सरांच्या शब्दांना प्राप्त झालेले होते.
विद्यापीठ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री प्रदीप गबाळे यांनी सांगितलेली एक आठवण:
"मी स्वतः अनुभवलेला प्रसंग आहे हा. आमच्या शाळेची वार्षिक तपासणी करण्यासाठी कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी आलेले होते. अशा प्रसंगी शाळातपासणीनंतर तपासणी अधिकार्यांची शिक्षकांसमवेत एक समूह विचार सभा होत असे. या सभेमध्ये बहुतेक शिक्षणाधिकारी शिक्षकांचे किंवा शाळेचे दोष दाखवत. तसेच त्याही दिवशी झाले. उपस्थित शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यापीठ हायस्कूलच्या इतिहास शिक्षकांवर असा आरोप केला की, तुम्हा इतिहास शिक्षकांना इतिहास अध्यापनाची उद्दिष्टेच माहित नाहीत. ज्या कुणाला ती माहिती असतील त्यांनी ती सांगावीत. झाले, शिक्षणाधिकारी रागावून बोलत असता येत असले तरी उत्तर देण्यास कोणी धजावेना. देवधर सरांचा राग अनावर झाला. ते ताडकन उभे राहिले आणि त्यांनी इतिहास अध्यापनाची जवळपास 10 उद्दिष्टे शिक्षणाधिकाऱ्यांना ऐकवली, आणि प्रतिप्रश्न केला की या उद्दिष्टांव्यतिरिक्त एखादे त्यांना माहिती असेल तर ते त्यांनी सांगावे. पुढे जाऊन ते असेही म्हणाले, ते तिथले इतिहास प्रमुख आहेत आणि त्यांच्या सर्व शिक्षक सहकार्यांना इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे शंभर टक्के माहीत आहेत... देवधर सरांच्या या तडफदार उत्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी माफी मागून आपले शब्द परत घेतले."
शिक्षण हा सरांचा निदिध्यास होता. रोटीथोर बाई आणि सर असे दोघांनी एका कोर्ससाठी नांव नोंदवले होते. दुर्दैवाने त्या कोर्सच्या पहिल्याच दिवशी सहभागींवर सरांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली. सरांच्या बाबतीत नियती खूपच क्रूरपणे वागली. वयाच्या बावीसाव्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले तेव्हापासून त्यांचे गोड खाणे जवळजवळ नव्हतेच. भजीसारखे चटकमटक पदार्थ आवडत असले तरी खाण्यावर मर्यादा होत्या. शेवटी शेवटी तर ते केवळ कडधान्य उकडून खात तरीही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित झाले नाही. पायाच्या काही बोटांचा त्याग करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि बहुतेक तो घाव त्यांच्या मानी स्वभावाला नाही सहन झाला. 1993 मध्ये कोल्हापुरातील पेशंट डायलेसिससाठी मिरज मिशन हॉस्पिटलला जात तसेच त्यांना न्यायचे ठरले. पण तो योग नव्हता. दवाखान्याच्या वाटेवर असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ॲमब्युलन्स माघारी वळवून त्यांना कोल्हापूरातून शेवटचा निरोप देण्यात आला तो दिवस होता अठरा ऑक्टोबर. बरोबर दोन आठवड्यांपूर्वी तीन ऑक्टोबरला सरांचा पन्नासावा वाढदिवस साजरा झाला होता...
मोठा म्हणून तिन्ही भावडांची जबाबदारी त्यांनी खूप समर्थपणे पेलली. घरी पाहुण्या-रावळ्यांचाही राबता खूप. उभयता सर्वांचे अतिथ्य यथाशक्ती करत आले. इतिहासासोबत इंग्रजी आणि गणित हे विषयही त्यांनी स्वत:च्या मुलांना शिकवले. सरांच्या पश्चात त्यांचा धाकटा आशुतोष उत्तम गुणवत्तेने डिप्लोमा झाला, घरची जबाबदारी ओळखून लगेच नोकरीला लागला, पुढे एएमआयई करून त्याने गोकुळ शिरगावला स्वत:चा व्यवसाय उभारला. आज त्याची वार्षिक उलाढाल जवळपास आठ कोटींची आहे. मुली रेणू जोशी आणि अपर्णा बर्वे नामे, सुस्थळी आहेत. सरांच्या घरी त्यांच्या सहधर्मचारिणी विजयाताई आणि अरविंद मिल्समध्ये मॅनेजर असलेले सरांचे मोठे चिरंजीव श्री ऋषीकेश हे सरांचे लोकोपकाराचे व्रत चालवत आहेत. तिसर्या पिढीत पाच नातू नि एक नात असा परिवार बहरला आहे.
देवधर सरांसारखे ज्ञानी, व्यासंगी, विनम्र आणि शिकवण्याची हातोटी असलेले शिक्षक कधी त्याआधी वा नंतरही माझ्या पाहण्यात आले नाहीत. त्यावेळीे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डींगची सुविधा असती तर... सरांचे शिकवणे कधी पुढीलांसाठी टेप करून ठेवता आले असते. माझी खात्री आहे की भारतातील किंवा कदाचित जगातीलसुद्धा सर्वोत्तम इतिहास शिकविणाऱ्यांमध्ये नांव घ्यावे असे देवधर सर होते. ते आता जिथे कुठे आहेत तिथून त्यांच्या कृपेचा घनु त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांवर सदैव बरसत आहे!
Comments
Post a Comment