"गो नी जोशी"

श्री. गो नी जोशी सर
- चारुदत्त कुलकर्णी

प्रास्तविक

सरांचा आणि माझा संबंध 1977 ते 1980 पर्यत जास्त आला. ते आम्हाला विद्यापीठ हायस्कुल , कोल्हापूर येथे चित्रकला शिकवत असत.

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात शालेय जीवनात येते आणि आपल्या जीवनावर खूप मोठा ठसा उमटवून जाते .आपल्याला ती काही उतराई करण्याची संधी देत नाही  किंवा मिळत नाही .लांबून पाहणाऱ्याला ती व्यक्ती जरी सामान्य वाटली तरी ती खूप असामान्य होती आणि तिच्या प्रतिभेला  योग्य तो न्याय मिळाला नाही  याचा सल आपल्याला सतत वाटत राहतो  .पण त्या व्यक्तीनेच तसे राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. विद्यापीठ हायस्कूलमधील चित्रकलेचे शिक्षक  श्री गो नि जोशी हे असंच एक अफलातून  व्यक्तिमत्त्व होते  .स्वत ची शैली असलेला एक असामान्य चित्रकार  ,ज्योतिषशास्त्राचे गाढे व्यासंगी  ,अफाट ताकद आणि चपळता असलेला एक अथलिट  ,घरची परिस्थिती चांगली नसताना कित्येक मुलांना शिक्षणासाठी आश्रय देऊन त्यांच्यावर प्रेम करणारा एक सहृदय माणूस  ,पंचवीस माणसे अंगावर धावून आले तरी त्यांना एकटा तोंड देऊ शकेल अशा निधड्या छातीचा माणूस असे त्यांचें काहीसे वर्णन करता येईल  .

सरांच्या  कार्याचे आणि आयुष्याचे अवमूल्यन करावे  ही माझी खरोखरच कुवत  योग्यता आणि    क्षमता   नाही.पण त्यांच्यासाठी खूप काही करावसं वाटत होते पण त्यांनी कधीही संधी दिली नाही  .हा लेख लिहून त्याची थोडी अल्पशी उतराई होईल अशी मला आशा आहे .


 विद्यार्थ्यांच्या नजरेतून सर

श्री  गो.  नि. जोशीसर ज्येष्ठ चित्रकार व आमचे गुरू  

"रोज शाळा सुटल्यानंतर आठवीमध्ये  प्रिएलिमेंट्री   आणि नववीमध्ये एलिमेंट्री  साठी आमचे चित्रकला वर्ग भरत असत  .सगळी मुले आनंदाने सरांनी सांगितलेल्या विषयावर चित्र काढत असत  .सर वर्गामध्ये फिरवून मुलांच्या अडचणी सोडवत  .जर कुणी बोथट पेन्सिलीच्या टोकाने चित्र काढत असेल तर त्याला एक छानसि  टपली पण मिळत असे.  मधून मधून मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून सर छानशा गोष्टी पण सांगत असत  .
त्यांनी आम्हाला पोस्टर कलर्स  जलरंग पेन्सिल्स यांचा उपयोग करून  संकल्पचित्र, वस्तुचित्र, स्मृती क्षेत्र कोलाज कसे काढायचे हे शिकवले. माणसा
माणसाच्या आकृती काढण्यासाठी चक्क ग्राऊंडवरची   खेळणारी मुले बघून , त्यांची पेन्सिलने धरून मापे कशी घ्यायची  आणि चित्रात जिवंतपणा कसा आणायचा हे शिकवले  .
असे हे गो  नि   जोशीसर   ,चित्रकलेला वाहून घेतलेले  ,अतिशय शिस्तप्रिय व पोटतिडकीने मुलांना शिकवणारे सर  ,आम्हाला लाभले हे आमचे भाग्य  !"
 आरती कोष्टी, मुंबई
🙏🙏🙏

"दहावीला आम्हाला  चारपैकी एक विषय घ्यायचा असं होतं. चित्रकला संगीत इलेक्ट्रॉनिक किंवा टेक्निकल. तर आमच्या वर्गात फक्त पाच जणांनी चित्रकला घेतलं आणि शाळेतल्या सगळ्यांना ते बंद पाडायचा होता. म्हणजे फक्त पाच विद्यार्थ्यांसाठी वेगळा क्लास चालू ठेवायचा म्हणून! शाळेने एक अडगळीची खोली दिली होती. सर तेथेच  शिकवायचे आणि नंतर ती खोलीही बंद झाली! मग शिक्षकांची खोली होती त्याच   खोलीत ते आमचा क्लास घ्यायचे .भारतीय कलेचा इतिहास आणि     पाश्चात्त्य कलेचा इतिहास खूप   तळमळीने शिकवत असायचे ,आणि बाकीचे शिक्षक मोठमोठ्याने वाटेल   त्या फालतू विषयांवर गप्पा मारत बसलेले असायचे .  अगदी आरामात पहुडलेल्या अवस्थेत !  आम्ही त्यांना म्हटले , "इथे तुम्ही काय बोलतात याकडे लक्ष देता येत नाही तर आपण दुसरीकडे बसून काम करायचे का ?"तर ते म्हणाले,  "आता हा   चित्रकलेचा विषय राहू दे, बाजूला   कितीही  गदारोळ सुरू असू दे तुम्हाला एकाग्रचित्त करता आलं पाहिजे " असं म्हणत त्यांनी  समोरच्या एका फळ्यावर एक छोटासा खडूने ठिपका काढला आणि सांगितलं की यावर  लक्ष केंद्रित करून बघत बसा. मी जवळजवळ पंधरा वीस  मिनिटे सलग बघत होते  आणि नंतर मला आठवतं की डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागले !    नंतर सर म्हटले की ही वीस मिनिटंही मागे ते शिक्षक बोलत होते तुम्हाला ऐकू आले का?    तर मला खरंच ऐकू आलं नव्हतं .  समाधी अवस्थेत गेल्या   सारखं झालं होतं. आणि ते म्हटले की बस,  आता तुम्ही  हळूहळू हा वेळ वाढवत जायचं ! आयुष्यातला एक फार मोठा धडा शिकवला त्यांनी आणि तो आयुष्यभर फार मोठी शिदोरी बनून गेला."
डॉ मंजिरी महाजन फणसाळकर
पॉंडेचरी
🙏🙏🙏

"गो नि जोशी हे आमचे चित्रकलेचे सर.आम्हाला त्यावेळी संगीत आणि चित्रकला यांपैकी एक विषय निवडायला लागायचा आणि मला संगीत कधी विशेष न  आवडल्याने मी चित्रकला निवडली. त्यामुळे गो नि जोशी सरांशी  परिचय झाला  आणि  त्यांचा बराच सहवास मिळाला.   वेगवेगळ्या चित्रकलेच्या स्पर्धा  यातून भाग घ्यायला मिळाला. त्यांच्या आठवणी सांगायच्या झाला तर  त्यांच पहिल्यांदा आठवतं ते करारी व्यक्तिमत्त्व, त्यांच्या कपाळावरच्या आडव्या रेघा आणि घट्ट मिटलेले ओठ आणि भेदक नजर. असे एकंदरीत व्यक्तिमत्त्व!  आठवण होते ती त्यांच्या खूप  जिद्दी आणि करारी स्वभावाची ,जरी परिस्थिती बेताची असली तरी स्वाभिमानी आणि जीवनमूल्ये जपणारे ते सर होते.आणखी अतिशय शिस्तीचेही होते.  त्याचा कलाकाराचा स्वभाव मधून मधून खूप लक्षात यावयाचा . त्यांना कुठलीही गोष्ट जमत नाही किंवा येत नाही असे म्हटले तर अजिबात आवडत नसे , प्रत्येक गोष्ट धडपडून ती या ना त्या प्रकारांना साध्य करायची  असा त्यांचा स्वभाव होता .ते विद्यार्थ्यांनाही तशाच प्रकारचे धडे द्यायचे  .   त्यांना   चित्रकलेचं ज्ञान तर अफाट होतंच आणि  शिकवण्याची हातोटी  पण खूपच सुंदर होती  . त्यांचा माझा संपर्क यामुळे वाढला की दिल्लीमध्ये मुलांसाठी जी स्पर्धा भरत असे ,   इंदिरा गांधी किंवा असले काही तरी नाव होते  ,  त्या परीक्षेसाठी त्यांनी आमची ठराविक मुलांची निवड करून त्याचे चित्र पाठवायचे ठरवले . मी   ते चित्र जवळजवळ महिनाभर   काढून पूर्ण करत होते   आणि त्यासाठी लागणारं परफेक्शन  येईपर्यंत ते अजिबात  स्वस्थ बसले नाहीत  ,  त्यांनी माझ्याकडून कित्येकवेळा ते चित्र काढून घेतल,त्यासाठी अनेकवेळा मी त्यांच्या घरी पण गेले . त्यामुळे मला  त्यांचा   सहवास खूप मिळाला .    घरीसुद्धा ते   बाहेरून बाहेरून कठोर पण आतून खूप मायाळू  ! काटेरी  फणसाप्रमाणे  . त्यांच्याबद्दल कायम  एक अतिशय आदरयुक्त भीती वाटायची .आणि घरी पण गेल्यावर   ते प्रेमानं बायकोला सांगून, मुलं घरी आली म्हणून त्यांना काहीतरी खायला दे वगैरे असं नेहमीच चालायचं . ते अतिशय आपुलकीनं आणि प्रेमानं आमच्याकडून काम करवून घ्यायचे. परत परत कंटाळा न करता  कधी रागवून, कधी प्रेमानं ,कधी समजावून असं करून ते आमच्याकडून काम करुन घ्यायचे.  आमच्याकडून त्यांनी एक वस्तुचित्र  किंवा   वेगवेगळे  कागदाचे आकार करून त्याचे   एक वास्तुशिल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली   आम्ही बनवले होते  . ते सगळं आठवलं की मला वाटते की  असे सर भेटणं  खरोखरच आमचं भाग्य होते  .  मला  त्यांच्याबद्दल अतिशय आदरही आहे आणि मला  नंतर त्यांचा सहवास फारसा न मिळाल्याने  वाईटही वाटत. पुष्कळवेळा त्यांना भेटावंसं वाटत असायचे  पण आम्ही   लांब जाऊन राहिल्यामुळे शक्य झाले नाही  .  परंतु त्यांच्याबद्दल निदान आता आठवणी तरी सांगायला मिळतात हेसुद्धा माझ एक भाग्य समजते ."
डॉ मंजुषा देसाई  विंजामुरी
कॅलिफोर्निया


 

जोशी सरांच्या आयुष्यातील ठळक घटना- माधव जोशी
(सरांचे जेष्ठ पुत्र, देवरूख व गोव्यात वास्तव्य, पाठय पुस्तक अभ्यासक्रम निर्मिती क्षेत्रात भरीव कार्य)

जन्म        
११.११.१९२७ कोल्हापूर जिल्हा, गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ या गावी. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरपासून ३७ किमी वर असलेल्या  संकेश्वर या शहरापासून ४ किमी वर हे गाव आहे.

व्यक्तिमत्व
लहानपणापासून आग्रही, अभिमानी पण हट्टी स्वभाव. 
व्यायाम, कसरती, साहस यांची अतिशय आवड. क्रिकेट हा आवडता खेळ. ज्यूडो या खेळाचे काही काळ कोचिंगही केले. मात्र या खेळाचा स्वतःच अभ्यास केला. कुस्ती, बॉक्सिंग हे ही आवडीचे क्षेत्र. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी. हैदराबाद आणि गोमंतक मुक्तीसंग्रामातही काम केले. 

चित्रकलेचा निदिध्यास. ज्योतिष शास्त्राचा निरयन पद्धतीने अभ्यास. वाचन खूप आवडे. रहस्यकथा वाचणे हा छंद. कला व ज्योतिष या विषयांवरीलप्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. (ती सर्व पुस्तके कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिरास देणगी रूपाने दिली)

चित्रकारीच्या निमित्ताने कोल्हापूर शहराच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात सहली करणे अतिशय आवडत असे. तसेच मुक्त वातावरणात सहल करणे, प्रवास करणे आवडत असे.

शिक्षण व व्यवसाय
१९५२ मध्ये कोल्हापूर येथील कला निकेतन या संस्थेत अभ्यास करून Government Diploma in Art (GD Art) ही पदविका संपादन केली महाराष्ट्र-गुजरात द्वैभाषिक प्रांतात दुसरा क्रमांक मिळविला. पेंटिंग या विषयात विशेष गती असल्याने कोल्हापूर येथील दळवीज आर्ट या संस्थेत ही त्यांनी शिक्षण घेतले. 

१९६३ मध्ये सरकारी निर्णयानुसार SSC परीक्षा देऊन १९६४ ते ६६ या काळात चित्रकलेतील आर्ट मास्टर (AM) ही पदव्युत्तर पदवी संपादन करून महाराष्ट्र राज्यात या परीक्षेत ४ था क्रमांक मिळविला. 

१९५४, १४ जून या दिवशी सांगली येथील कै० गणेश कुलकर्णी यांची कनिष्ठ कन्या सुमन हिच्याशी विवाहबद्ध होऊन थेट हलकर्णी (ता० गडहिंग्लज, जि० कोल्हापूर) येथे शेती करण्यासाठी गेले. तिथे १९६० पर्यंत शेती केली...अगदी आपले वडील नीळकंठ जोशी व पत्नी सौ० सुमन या दोघांच्याच मदतीने विहीर आणण्यापासून या शेतीची त्यांनी सुरुवात केली. मनोभावे शेतजमिनीची सेवा करीत त्यांनी शेती करताना आपली कलासाधना चालू ठेवली. 

नोकरी व्यवसाय
१९६० ते ६३. कोल्हापूर येथील वरूण तीर्थ वेशीतील स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत
१९६७. नांदेड येथील त्र्यंबक वसेकर चित्रशाळा या संस्थेत प्राध्यापक.
१९६७ ते १९६९.   वसई येथील रा० प० वाघ प्रशाला येथे कला शिक्षक
१९६९ ते १९८५ (निवृत्तीपर्यंत) कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूल येथे कला शिक्षक

दरम्यान १९६८ ते १९७९ या दशकात कलासाधना. जल व तैल रंगातील सुमारे चाळीस चित्रे काढली. चित्रांचे विषय प्रामुख्याने आध्यात्मिक व गूढ विश्वाकडे कल  व्यक्त करणारे होते. या साधनेत रंगसंगती, रेखाटने, छाया-प्रकाश यांच्यावर विविध प्रयोग केले व नवनवीन तंत्रे विकसित केली. यातील सुस्थितीत असलेली चित्रे २०१५ मध्ये पारनेर येथील त्यांचे आध्यात्मिक गुरू प० पूज्य डॉ० रामचंद्र प्रह्लाद पारनेरकर यांच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने प० पूज्य विष्णु महाराज पारनेरकर यांचे चरणी त्यांच्या कलादालनासाठी अर्पण केली.

१९७९ मध्ये मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत आपल्या सर्व चित्रांचे प्रदर्शन स्वखर्चाने घडवून आणले व एकही चित्र न विकता सर्व चित्रे करवीर नगरीत परत आणली ती एकही चित्र स्वतःपासून दूर करणार नाही असा निश्चय करूनच. 

सेवानिवृत्तीनंतर ज्योतिष विद्येचा अभ्यास चालू ठेवला पण चित्र रेखाटन मात्र जवळपास बंदच केले.

२०१२, २६ जानेवारी अल्पकालीन आजारात त्यांनी कोल्हापुरात राहत्या घरी जगाचा निरोप घेतला. 
  


 पूर्वार्ध

सरांचा जन्म  अकरा नोव्हेंबर एकोणीस सत्तावीस रोजी   कोल्हापूर जिल्हा, गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ या गावी एका सधन कुटुंबात झाला . सरांच्या वडिलांची शेती होती.सरांच्या आईला फुलांच्या रांगोळ्या  काढायची आवड होती.

त्यांचा एक फारसा माहीत नसलेला पैलू  म्हणजेच त्यांची कॉलेजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर केलेलं काम. त्यांनी एकोणीस बेचाळीस चळवळीत तसेच गोवा व हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामात सक्रिय भाग घेतला होता. बेचाळीसच्या चळवळीमुळे त्यांना मॅट्रिकची परीक्षा देत आली नाही. ते जेलमध्ये गेले होते. कुठेतरी त्यांच्या मानेवर जखमेची खूण होती .त्या काळात त्यांनी दाढी वाढलेली हाेती .माझी खात्री आहे की त्याच्या स्वभावानुसार त्यांनी ह्या सर्व लढ्यात खूप धाडसी अशी काही कामे केली असणार .अर्थात त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्याची वाच्यता कुठेही करत नसत . कित्येक लोकं त्यांच्याकडे येऊन म्हणत की तुम्ही नुसता फॉर्म भरून द्या  तुम्हाला पेन्शन मिळेल आणि तुमच्या मुलालासुद्धा  नोकरी मिळेल ,ते म्हणायचे मी पेन्शनसाठी या गोष्टी नाही केल्या!


नोकरीसाठी ते विद्यापीठात  आलेले असताना दीक्षित गुरुजींनी त्यांना पाहिले. हे प्रकरण थोडेसे वेगळे आहे हे गुरुजींच्या कसलेल्या नजरेनं लगेच ओळखले . त्यांना लगेच उद्यापासून कामाला या असे सांगितले  .पहिल्याच दिवशी शाळा सुटल्यानंतर त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना थांबवून ठेवले होते. दीक्षित गुरुजींनी त्यांना क्लासच्या बाहेर बोलावले व सांगितले की मुलांना वेळेवर शाळेतून घरी सोडायला पाहिजे असे थांबवून चालणार नाही . तेव्हा ते म्हणाले की मी हा विषय शिकवतोय, मी हा असाच शिकवणार. मुलांना थांबावे लागेल ,पाहिजे तर आपण मला काढू शकता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी हा संवाद झाला ! अर्थातच दीक्षित गुरुजींनी त्यांचे म्हणने मान्य केले .

सरांच्याकडे अनेक धाडसी कल्पना   तयार असत  .दीक्षित गुरुजींनी एका वर्षी ठरवले की  जगन्मातेच्या चित्रासमोर एक ज्योत लावायची आणि एक लक्ष सूर्यनमस्कार पूर्ण होईल  ती तशीच प्रज्वलित ठेवायची.नंतर एकवीस किलोमीटरवर असलेल्या एका  जैन मुनींच्या तिर्थस्थळी ,मला वाटते रामलिंगला असणाऱ्या  अक्षय ज्योती मध्ये तिचे विसर्जन करायचे .

शाळेची त्यावेळेला पुष्पक नावाची गाडी होती  .तिला मुले लाडाने पुष्पक विमान म्हणत   .त्या गाडीतून  ज्योत नेऊन विसर्जन करायचे असे ठरले होते  .पण एवढ्या सहजतेने गोष्ट करायची म्हटले तर ते सर कसले ! त्यानी  ठरवले की एकवीस विद्यार्थ्यांनी एकवीस किलोमीटर सायकलने जायचं.  म्हणजे प्रत्येकाने एक किलोमीटर ज्योत हातात घेऊन पळायचे, त्यावेळेला बाकीचे वीस जण सायकलवरून पुढे जात असतील . असे आळीपाळीने प्रत्येकाने एक किलोमीटर ती ज्योत हातात धरून पळायचे.आणि पळणाऱ्या माणसाची सायकल चालवायला सर होतेच. त्यांचे बरेच  विद्यार्थी आणि  काही सहकारी  शिक्षक या कल्पनेने एकदम भारावून गेले.शेवटी दीक्षित गुरुजींनी परवानगी दिली.आणि त्या एकवीस मुलांनी आळीपाळीने एकेक किलोमीटर पळत ती ज्योत एकवीस किलोमीटरवरील एका मुख्य ज्योतीत विसर्जन केली  .
सर रिटायर झाल्यानंतर निरोप समारंभ त्यांनी  शाळेला साठ हजार रुपये   दिले .ते कॅम्लिन कंपनीचे रंग विद्यार्थ्यांना विकत त्याबदल्यात  त्यांना काही कमिशन मिळत असे, ते सर्व पैसे आणि त्यात आपली भर घालून त्यांनी शाळेला कृतज्ञतापूर्व परत केले.

पारनेरकर महाराज: सरांचे अध्यात्मिक गुरू

अहमदनगरचे संत श्री. डॉ प्रल्हाद रामचंद्र पारनेरकर यांना सर आपले गुरू मानत  . सर आपल्या घरातील मधल्या खोलीत  जमिनीवर बैठक टाकून बसत असत, त्याच्यावरती त्यांचे एक पूर्णाकृती चित्र ,सरांनीच काढलेले ,लावलेले होते  .अहमदनगरपासून तीस ते चाळीस किलोमीटरवर पारनेर हे गाव आहे  .तेथे व्यासांचे गुरू पराशर यांनी तप केले होते असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज  यांचाही ह्या घराण्याशी संबंध होता असे म्हणतात  .त्यांचा जन्म चौदा जून एकोणीशेबारा या दिवशी झाला  .वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून  ध्यानाकडे त्यांचा ओढा होता  .अनेक धार्मिक ग्रंथ, पोथ्या, पुराणे वाचायची त्यांना लहानपणापासूनच आवड होती  .तसेच कुस्ती, व्यायाम मल्लखांब यात देखील ते प्रवीण होते  .गणपतीवर त्यांची अनन्यसाधारण श्रद्धा होती . त्याची त्यांना दैवी अनुभूती झाली हाेती असे. इंदौरच्या राजवाड्यातील ग्रंथालयातील सर्व पुस्तके त्यांनी वाचली होती  .काल मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ त्यांनी सातवेळा वाचला होता .विश्वाची उत्पत्ती या विषयावर त्यांनी पी एच डी साठी प्रबंध बर्लिन विद्यालयात सादर केला होता. पण तो दुसर्या महायुद्धात बेचिराख झाला  .शंकराचार्य यांचा अद्वैतवाद व मध्वाचार्य यांचा  द्वैतवाद यावरून त्यांनी आपली स्वताची पूर्णवादाची थेअरी तयार केली  .पूर्णवादावर त्यांनी काशी विद्यापीठात प्रबंध सादर करून पी एच डी मिळवली  . असे म्हणतात की गजाननाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले  आणि  त्यांच्याकडून काय जीवनकार्य अपेक्षित आहे हे सांगितले  .दिशाहिन समाजाला स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालून, प्रपंच आणि अध्यात्म यांची सांगड घालून ,गुरुमंत्र अवलंब करून , प्रत्येकाने आपला  संसार नीट करून मोक्ष मिळवावा हे तू तुझ्या शिष्यांना सांग. हे कार्य अवघड आहे  करावयास घे आणि मी तुझ्या पाठीशी  आहे असा  गजाननाने त्यांना आदेश दिला  .नेटाने जगावे व ध्येयासाठी मरावे असा पूर्णवाद नावाचा नवा विचार त्यांनी मांडला  .पूर्णवाद म्हणजे जीवन जगायला शिकवणारे तत्त्वज्ञान आहे  .माणूस मनासारखे जगून पूर्ण समाधानी होऊ शकतो हे त्यांनी स्वत च्या उदाहरणाने शिकवले. स्वतः सदैव कार्यरत राहून असंख्य शिष्यांना कार्य करायला उद्युक्त केले .आता त्यांचे चिरंजीव विष्णुमहाराज हे त्यांचा वारसा चालवतात .

सरांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते .आणि विशेष म्हणजे त्यांनाही सरांबद्दल अतिशय आदर होता  .ते कौतुकाने सरांना पंडितराव म्हणत.महाराज कौतुकाने म्हणायचे की पंचवीस माणसे एकदम आली तरी पंडितराव त्यांना एकटा भारी पडेल  .आणि ही वस्तुस्थिती होती तेवढी त्यांच्या अंगात ताकद आणि चपळता होती .


  कसरतींची आवड

सरांचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होत असे  . ते पहाटे त्यांच्या घरापासून या महाकालीच्या महाकाली तालमीपासून ते चंबुकडीपर्यंत जोरात पळत जात असत  .हे अंतर कमीत कमी सात आठ किलोमीटर असेल  .नंतर जोर बैठका असा घरी व्यायाम करत असत  .त्यांच्याकडे बॉक्सिंगच्या प्रसिटीसाठी लोखंडी गोळा होता. कोल्हापुरात पहिले ज्युडो क्लासेस पाटोळे यांच्याबरोबर त्यांनी चालू केले होते  .शाळेतल्या  हौशी मुलांना ते कुठली फी न घेता बॉक्सिंग शिकवत असत .

आमच्या बॅचचे विक्रम पाटील आणि प्रशांत वेल्हाळ हे थोडेसे तगडे विद्यार्थी. ते सरांच्या पाठीमागे आम्हाला    बॉक्सिंग शिकवा म्हणून लागले होते. सर रोज सकाळी साडेसहा ते आठ पर्यंत त्यांना घरी बोलवत. त्यांच्या  घरी एक मोठा लोखंडी गोळा टांगलेला होता. सर त्यांना त्याच्यावर जोरजोरात ठोसे मारायला लावायचे. तसेच नंतर जोर-बैठका असा भरपूर व्यायाम रोज दीड तास  करून घ्यायचे. तीन महिन्यात त्या मुलांच्या अंगातली ताकद  जबरदस्त वाढली आणि त्यांचे ठोसे खूपच घणाघाती बसायला लागले. त्यातल्या विक्रमने शाळेतील लहानश्या भांडणात एका मित्राच्या चेहऱ्यावर एक हलकासा ठोसा मारला आणि त्याला चेहऱ्यावर  मोठी जखम झाली, भळाभळा रक्त यावयला लागले  आणि सात आठ टाके घालायला लागले... त्यामुळे  त्यां दोघांची प्रॅक्टिस सरांनी बंद करून टाकली.ती दोघे इतकी झपाटलेली होती की नाकाचे हाड काढून घ्यायची त्यांची तयारी झाली होती.( प्रोफेशनल बॉक्सर ठोसे बसून इजा होऊ नये म्हणून नाकाचे हाड काढून घेतात म्हणे!)

 स्थितप्रज्ञ गो. नि. जोशी सर आणि रेडा- प्रदीप गबाळे

     १९७५-७६ साल होतं ते. मी विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागून चार-पाच वर्ष झाली होती.  दिवाळीच्या सुटीनंतर पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक बा.द. खांडेकर सरांनी शाळा सुटल्यावर मला त्यांच्या कार्यालयात बोलावून शाळेसाठी, *गीता गाती ज्ञानेश्वर* या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. माझे काका, राम गबाले, हे त्या काळातले एक  नामवंत सिनेदिग्दर्शक आहेत याची त्यांना कल्पना असावी, म्हणूनच त्यांनी माझ्यातील दिग्दर्शक शोधण्यासाठी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली असावी असे मला वाटते.
       गीता गाती ज्ञानेश्वर या नाटकात, ज्ञानेश्वर रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतात असे एक दृश्य होते. या दृश्यात एखादी रेड्याची प्रतिकृती वापरावी असा मी विचार करत होतो.  मोठ्या तगडाच्या मागे लाकडी पट्ट्यांचा आधार देऊन रेड्याच्या आकाराचे कट आउट करून घ्यावे आणि ते रंगवून घ्यावे अशा विचाराने मी त्यावेळचे विद्यापीठ हायस्कूलचे  चित्रकलेचे शिक्षक गो.नि. जोशी सर यांच्याकडे गेलो. रेड्याच्या कट औट ची कल्पना सांगितली. कट आउट मागून दोन मुले तो कटआऊट घेऊन चालतील असेही सांगितले. जोशी सर म्हणाले, " कल्पना चांगली आहे. पण आपण कट आउट करण्यापेक्षा प्रत्यक्ष रेड्याची त्रिमितीय प्रतिकृती तयार केली तर ते अधिक परिणामकारक होईल."
" त्रिमितीय प्रतिकृती? कसं शक्य आहे ते?" मी म्हटलं.                         
" ते तुम्ही माझ्यावर सोपवा." सर म्हणाले.
दुसर्‍या दिवसापासूनच जोशी सर रेडा बनवण्याच्या कामाला लागले त्यांनी वर्तमानपत्राची रद्दी जमवायला सुरुवात केली. जिमखान्यामध्ये असणारी मोठी पातेली आणून त्यामध्ये ही रद्दी भिजवण्यासाठी ठेवली.  अगदी एक सारखा पातळ लगदा तयार होण्यासाठी ते मिश्रण,अधून मधून एका काठीने हलवण्याचे काम मुलांना करायला सांगितले. तयार होणाऱ्या  लगद्याला चिकटपणा येण्यासाठी डिंक, सरस यासारखे चिकट पदार्थ त्यात घातले.आठ दहा दिवसात हे लगद्याचं मिश्रण इतकं कुजून गेलं की, शेजारी असणाऱ्या ' राजाज्ञे' वाड्यातील लोक, शाळेत कोणता तरी प्राणी मेला असून त्याच्या वासाचा त्रास होतोय, अशी तक्रार करू लागले. मुख्याध्यापकांनी या लोकांना वस्तुस्थिती सांगून त्यांची समजूत घातली. वर्तमानपत्राचा लगदा कुजून तयार होईपर्यंत जोशी सरांनी तारां पासून एक रेड्याचा आकाराचा त्रिमितीय सांगाडा तयार केला. या रेड्याच्या पोटात दोन मुले सहज बसू शकतील, एवढी त्याची भव्यता होती. त्या मुलांनी तो रेडा घेऊन चालायचं, असं नियोजन होतं. तयार झालेला लगदा या तारेच्या सांगाड्यावर बसवण्याचं काम चालू झालं. जोशीसर हे काम शाळा सुरु होण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर करत असत. शाळेच्या दैनंदिन कामातील एक मिनिटही त्यांनी त्यासाठी वापरला नाही. हे काम पाहण्यासाठी शाळेतील मुलं खूप उशिरापर्यंत शाळेत थांबू लागली. स्वतः मुख्याध्यापक खांडेकर सर, बावडेकर सर ,डी. बी. जोशी सर, संगीताचे पोतदार सर आणि मी स्वतः या रेड्याच्या प्रगतीकडे सतत लक्ष ठेवून होतो. साधारणतः तीन आठवड्यात अत्यंत आत्मविश्वासाने आणि चिकाटीने तयार करत असलेला रेडा आकारास येऊ लागला. सर्वप्रथम डोकं आणि शिंग तयार झालं, मान, पोटाचा भाग  आणि मग शेपूट हे हळूहळू आकारास येऊ लागलं. आता कुजका वासही कमी झाला होता. रेड्याची पाठ आणि पोटाचा घेर तसा जरा फारच मोठा वाटत होता. या सगळ्यांचं वजन दोन मुलं उचलू शकतील काय, अशी शंका मला वाटत होती. माझी शंका मी जोशी सरांना विचारल्यावर ते हसले आणि म्हणाले,  हा लगदा आता ओला आहे म्हणून तुम्हाला जड वाटतोय, पण एकदा का हा सुकला की, एकटा मुलगाही त्याला सहज उचलेल.
          रेड्याची ती भव्यता पाहून माझ्या मनात उगीचच शंकेची पाल चुकचुकत होती. आता रेड्याचे पार्श्वभागाचे काम पूर्ण झाले की रेडा तयार होणार होता. बाकी सर्व आकार इतके अचूक जमले होते की, तो रेडा एकदम मस्तवाल आणि अंगावर धावून येतो की काय असे वाटत होते. नाटकाची तारीख जवळ येत चालली होती. 'रेडा' तयार झाल्यावर मला मुलांच्याकडून सराव करून घ्यायचा होता म्हणून मी जोशी सरांना घाई करत होतो. रेड्याची प्रतिकृती झाल्यावर रंगवायचे काम ही  बाकी होते. नाटकाच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आरक्षित केले होते. कलाकार विद्यार्थ्यांच्या कडून तीन-चार वेळा तरी सराव होणे आवश्यक असल्याने  मी सरांच्या कडे जरा जास्तच घाई करायला लागलो. बाकीचे लोक ही म्हणायला लागले की नाटकांपर्यंत काही रेडा तयार होईल असं वाटत नाही. एक-दोन  मिश्किल शिक्षकानी सरांना होत असलेल्या उशिराबद्दल उगीचच डिवचण्याचे काम केले. तसे स्थितप्रज्ञ वृत्ती असणारे सर थोडेसे नाराज झाले. तरीपण मनावर संयम ठेवून त्यांनी सांगितले की, उद्याच रेडा तयार होईल. आज कितीही रात्र झाली तरी चालेल,  पण मी हे काम पूर्ण करणारच. मला माहित होते की ते  काम खरोखर फारच क्लिष्ट  होते. सर रात्री एक वाजेपर्यंत काम करत असावेत, पण अजून  त्यांच्या मनाप्रमाणे ते पूर्णत्वास आले नव्हते. सरांनी घरी जाऊन केवळ चार तासच विश्रांती घेतली आणि पुन्हा सकाळीच रेड्याच्या कामाला सुरुवात केली. मी शाळेत सकाळी दहा वाजता आल्या बरोबर जेथे काम सुरु होते त्या खोली क्रमांक ३४ समोरील जागेत आलो. खरोखरच रेड्याच्या प्रतिकृतीचे जवळजवळ ९९ टक्के काम पूर्ण झाले होते. जोशी सर, रेड्याच्या पोटाच्या आतील भागातून काहीतरी काम करत होते. मला खूप आनंद झाला. सरांनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि सांगितलेल्या वेळे मध्ये अतिशय भव्य आणि देखणा रेडा तयार केला होता.
        मी अत्यंत समाधानाने मनातल्या मनात जोशी सरांना धन्यवाद देत तळघरातील मोठ्या हॉलमध्ये आलो. नाटकाची तालीम सुरू झाली .  दुपारी बारा-  साडे बारा वाजले असतील, तोपर्यंत वरच्या मजल्यावर कसलातरी गोंधळ चालु असल्याचे जाणवले. सर्व शिक्षक वर्ग लगबगीने खोली क्रमांक ३४ कडे चालला होता. स्वतः मुख्याध्यापक ही आपल्या खोलीच्या बाहेर आले. आणि s एकदम,  एकच कल्लोळ झाला. पडलाss, पडलाss रेडा पडला. माझ्या पायाखालची वाळुच सरकली.  दीड महिना रात्रंदिवस कष्टाने केलेल्या रेड्याला कोणा एका मुलाचा धक्का लागला किंवा रेड्याला स्वतःचे वजन पेलवले नसावे. रेड्यानं जमिनीवर लोटांगण घेतलं होतं. रेड्याच्या पोटाचं पूर्ण पोस्टमार्टम झालं होतं तर डोकं आणि शिंगं  धडापासून वेगळी झाली होती. सरांना मदत करणारी मुलं अक्षरशः रडू लागली. गांभीर्य नसणारे काहीजण हसत होते . पण सर्वात मोठा हादरा मला बसला होता. नाटक तीनच दिवसावर आलं होतं आणि हा अनर्थ झाला होता. रेड्याचं स्टेजवर येणं, त्यांनं वेद म्हणणं, नंतर ज्ञानेश्वरा समोर मान वाकवून वंदन करणं आणि स्टेजच्या  दुसऱ्या बाजूनं निघून जाणं हे दृश्य कसं करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. मी मनातून अतिशय दुःखी झालो. काय करायचं काय आता?  उत्तर काहीच सुचत नव्हतं. केवळ फक्त प्रश्न आणि प्रश्न.  मी खरोखरच डोक्याला हात लावुन, मान खाली घालून बसलो. माझी अवस्था पाहून नाटकात काम करणारी कलाकार मुलं ही रडवेली झाली.माझं लक्ष जोशी सरांच्या कडे गेलं. सर शांत होते. गेले एक महिना रात्रंदिवस केलेल्या मेहनतीवर अक्षरशः पाणी पडलं होतं. पण दुःखाचा लवलेशही मला सरांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. यापूर्वीही  रेडा आकारास येताना सुद्धा आपण काहीतरी वेगळं करतोय याचा अभिमान किंवा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता आणि आता रेडा मोडून पडला म्हणून दुःख ही नव्हतं. भगवद्गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञा प्रमाणे, जोशीसर मला भासू लागले. एवढं सारं होऊनही साधी चिडचिडही न करता सर इतके शांत कसे राहू शकतात असा विचार मी करत असतानाच सरांचा हात माझ्या खांद्यावर पडला. मी मान वर केली. सर शांतपणे म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला  तुमच्या नाटकातील रेडा मिळेल आणि तोही उद्याच अगदी वेळेवर. हा माझा शब्द आहे.
        सरांनी दोन दिवस शाळेला किरकोळ रजा टाकली.  किशोर आणि कंपनी या स्टेशनरीच्या दुकानात जाऊन त्यांनी थर्माकोल, वेगवेगळ्या जाडीचे कार्डशिट, काही कागद असे साहित्य आणले. त्या कार्डशिट वरती पाण्याचा हलकासा हबका मारुन त्यांना पाहिजे तसा आकार द्यायला सुरुवात केली.आपला पहिल्या रेड्याचा प्रयत्न फसला आहे याचा किंचितही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. संध्याकाळी मी पुन्हा त्यांना भेटायला गेल्यावर ते मला म्हणाले, " उद्या सकाळी तुम्हाला रेडा मिळेल. तुम्ही मुलांची तालीम घेऊ शकता".  खरोखरच पुन्हा एकदा सर ती संपूर्ण रात्र शाळेतच  काम करत राहिले.  सकाळी लवकरच मी शाळेत गेलो तेव्हा पुठ्ठ्यापासून आणि कार्डशिट पासून तयार केलेला रेडा तयार झाला होता. सर त्याच्यावर रंगाचे अंतिम संस्कार करत होते.  शब्द दिल्याप्रमाणे शाळा सुरू होण्यापूर्वी सरांनी रेडा माझ्या स्वाधीन केला. रेडा माझ्याकडं सोपवत असताना, कालचाच शांत भाव त्यांच्या चेहर्‍यावर मला दिसला.  सरांची चिकाटी, सरांचा आत्मविश्वास आणि त्यांची स्थितप्रज्ञता पाहून मी सरांसमोर नतमस्तक होऊन म्हंटलं, " सर, झालेल्या खर्चाची बिलं मिळाली तर मी पैसे देण्याची व्यवस्था करतो." सरांनी स्मितहास्य केले आणि केवळ किशोर आणि कंपनीचे एकमेव बिल मला दिले. मी पहिल्या, अयशस्वी रेड्याच्या खर्चा बाबतीत काही तरी बोलणार, इतक्यात सर म्हणाले, " मी जे काम करु शकलो नाही त्याचे पैसे मी घेऊ शकत नाही."      दुसऱ्या दिवशी पासून सरांचे शालेय काम नेहमीप्रमाणे सुरू झाले. मी मात्र सरांच्या या आगळ्या वेगळ्या दर्शनानं अंतर्मुख झालो. मला शिक्षक होण्यासाठी अजून बरंच काही शिकलं पाहिजे याची जाणीव गो. नि. जोशी सरांच्या मुळे झाली.

प्रदीप गबाले
निवृत्त मुख्याध्यापक
विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर

तपोवनातील बाग-प्रदीप गबाळे

तपोवनात १९२७ साली कोल्हापूरात एकमेव असलेल्या  चरखा आश्रमाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ प्रत्यक्ष मी. गांधी यांच्या शुभहस्ते झाला होता. त्या ठिकाणी लवकरच चरखाश्रमाची  इमारतही उभी राहिली. चरखाश्रमापासून सुमारे दीडशे ते दोनशे फुटांवर लक्ष्मी सदन नावाची एक इमारत होती.या दोन्ही इमारतींच्या मध्ये बरोबर चौकोनी जागा शिल्लक होती. या जागेवर छानशी बाग तयार करावी असे गुरुजींच्या मनात होते. त्यावेळी तपोवनात विद्यापीठ हायस्कूलचे संस्थापक कै. वा. द. तोफखाने यांचे नातू ( मुलीचा मुलगा) नचिकेत ढवळे हे तपोवनातील ' अरविंद भुवन' या वास्तूत राहात होते. ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. त्यांनी या मोकळ्या जागेसाठी एका सुंदर उपवनाचा नकाशा तयार करून तो गुरुजींना दाखवला. गुरुजींना तो नकाशा खूप आवडला आणि त्यांनी लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायचे ठरवले. बागेच्या भोवती कंपाऊंड फेन्सिंग घालणे, मध्यभागी झेंडा वंदना साठी गोलाकार तयार करणे, उद्यानात बसण्यासाठी सिमेंटचे बाक ठेवणे, बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी एक हौद बांधणे यासाठी मार्किंग करायचे ठरले. ही गोष्ट गो. नि. जोशी सरांच्या कानावर आली. हे मार्किंग करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आता बागेसाठी खोद काम करुन नदीची माती टाकायचे ठरले. गो.नि. जोशी, आर्. जी. कुलकर्णी सरांनी खोदकाम श्रमदानातून करावे असे सुचवले. म. गांधींच्या नावाने उद्यान होणार असल्याने ते शिक्षक आणि विद्यार्थी यांनी श्रमदान करून केल्यास त्याला वेगळे महत्त्व येईल.तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमदानाचे संस्कार होतील. गो. नि. जोशी, आर् जी कुलकर्णी, मिरजे आणि इतर शिक्षक विद्यार्थ्यांनी  हे काम करण्याची  प्रत्यक्ष सुरुवात केली. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शाळेतील मुलांना आवाहन करण्यात आले. तपोवन आश्रमात काही मुले राहातं होती. तीसुद्धा शनिवार -रविवार श्रमदान करू लागली. पण तेथील जमीन खोदाई करण्यासाठी कठीण होती. वेळ जाऊ लागला. म. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्या बागेचे उद्घाटन करावयाचे दीक्षित गुरुजींच्या मनात होते. वेळ कमी होता. मग गो. नि. जोशी आणि आर् जी. कुलकर्णी सरांनी दररोज सकाळी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. घरातून भल्या पहाटे उठून गो.नि. जोशी आणि आर् जी कुलकर्णी हे मित्रद्वय सकाळी बरोबर सहा वाजता तपोवनात येऊ लागले. मी  त्यावेळी तपोवनातच राहातं असल्याने मी सुद्धा त्यांच्या बरोबर श्रमदानात सहभागी झालो. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत न थांबता श्रमदान होत असे.आश्रमातील मुले सहभागी झाली.नऊ नंतर गो.नि. जोशी आणि आर् जी कुलकर्णी आपापल्या घरी जाऊन, जेवण करून पुन्हा शाळेत वेळेवर येत असत. पाहता पाहता दहा -बारा दिवसात खोदकाम पूर्ण झाले. तोपर्यंत कळंबा येथे राहणारे सेवक शामराव खानविलकर आणि शंकर जाधव यांनी बैलगाडीतून नदीची माती ओढण्यास सुरुवात केली होती. टिंबर मार्केट मधील विद्यापीठ संस्थेच्या एका सदस्याने सिमेंट चे खांब आणि फेन्सिंग तार आणून दिली. महिनाभरातच म. गांधी उद्यान तयार झाले. या उद्यानाचे उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक म. दु. श्रेष्ठी यांच्या शुभहस्ते पार पडले. बाग तयार करण्यासाठी पुढाकार घेणार्यांचा   सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्याचे ठरवले होते. पण त्याला सर्व सत्कार मूर्तीनीच विरोध केला. त्यामुळे केवळ उद्घाटन आणि स्वातंत्र्य सैनिक म. दु. श्रेष्ठी यांच्या भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावर्षापासून प्रत्येक गांधी जयंतीच्या दिवशी ध्वजारोहण, ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन, सूत कताई असे कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. पूर्वी केवळ सूत कताई, वैष्णव गीत असा कार्यक्रम होत असे पण म. गांधी उद्यान तयार झाल्यामुळे ध्वज वंदनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ लागला. गो.नि. जोशी सरांच्या श्रमदानाच्या संकल्पनेतून एक अतिशय सुंदर उद्यान तपोवनात तयार झाले. नंतर या उद्यानात विविध प्रकारच्या फुलं झाडांची लागवड आणि जोपासना करण्याचे काम पां. स. मिरजे सर यांनी केले. या बागेतील फुले झाडांना पाणी देण्याची जबाबदारी मी स्विकारली होती.


  घरगुती सर
महाकाली तालमीत  पुढे गेलं की दोन मजली चाळ होते  .तेथे पहिल्या मजल्यावर तीन खोल्यांचं सरांचं घर होते  .पहिल्या खोलीत बॉक्सिंगचा  पण तसेच व्यायामाचे इतर साधने वेटलिफ्टिंगची साधणे  नंबर लागतो  नंतर लाईफ स्पॅन टाईम्स ऑफ इंडिया फेमिना इलस्ट्रेटेड वीकली यांचे अनेक वर्षांचे अंक  तसेच मित्राचे कॉमिक्स  सरांनी व्यवस्थित गठ्ठे करुन बांधलेली होती  .मधल्या खोलीत सरांचे बसण्याचे आसन आणि त्यावर सरांचे गुरू पारनेरकर महाराज यांचा फोटो आणि आजुबाजुला त्यांची विविध  चित्रे फ्रेम करून लावलेले होते लावलेले असत  .त्या पाठीमागे स्वयंपाकघर होते  .सर्वांच्याकडे सुतारकामाचा सुद्धा बरेच साहित्य होते  .चित्रे प्रदर्शनाला द्यायचे असतील किंवा काही काम असेल तर ते त्याचे सर्व पॅकिंग वगरे स्वतःच लाकूड कापून करत  . एखाद्या मांजर आणि त्यांची पिल्ले ही त्यांच्या आजूबाजूला नेहमी असत.

सर हॉटेलमध्ये जवळजवळ कधीच जाताना  दिसले नाहीत .बाहेर कधी चहासुध्दा पीत नसत.कोणाच्या लग्नाला गेले तर कधी जेवायला थांबत नसतं.परान्नं खात नाही म्हणून सांगायचे.खरी गोष्ट अशी होती की त्यांना कोणाचे काही घ्यायला आवडत नसे .नुसता आहेर देऊन परत येत. पण दर वर्षी तीन दिवस मात्र कुटुंबियांसाठी खास  असायचे....वर्षातून एक दिवस ते सर्व कुटुंबियांना आइस्क्रीम खायला घेऊन जायचे  .तेव्हा सर्वांनी कितीही काहीही खा असे असायचे  .तसंच वर्षातून एक दिवस ते सर्व कुटुंबियांना कामत रेस्टॉरंटमध्ये आंबोळी खायला घेऊन जायचे.तेव्हाही कुणीही कितीही खा असे असायचे.तसेच दर वर्षातून एक दिवस ते सर्वांना कपडे खरेदीला घेऊन जायचे .

सरांचं व्यक्तिमत्त्व व थोडेसे गूढ असे होते  .ते  कामाशिवाय कुणाशी फारसे बोलायचे नाहीत  .बरोबरच्या सहकाऱ्यांबरोबरसुद्धा फारसे कधी बोलायचे नाहीत .वायफळ  गप्पा तर कधीच कोणाशी  मारत नसत .पहाटे साडे तीन ते रात्री नऊ पर्यंत त्यांचा दिनक्रम पूर्ण ठरलेला असायचा  .स्वत बद्दल तर कधीच कोणाशी बोललेलं आठवत नाही.त्यांची मुले म्हणतात की स्वत च्या बालपणाविषयी काही बोललेत असं त्यांनाही काही आठवत नाही. त्यांनाही थोडंसं गुढच वाटे  .

त्यांच्या सहकारी श्रीमती रोटीथोर बाई म्हणाल्या  "तो माणूस अतिशय सच्चा होता आणि चित्रकार म्हणून काळाच्या फार पुढे होता  .पण त्यांची चित्रे  सर्वसामान्य लोकांनी दिवाणखान्यात लावावित अशी नव्हती  .त्यामुळे   त्यांना म्हणावा एवढा नावलौकिक पैसा मिळाला नाही. त्यांच्या कुटुंबियांचे विशेषतः पत्नीचे खूप हाल झाले  .पण विशेष म्हणजे त्यानी कोणाकडेही त्यांच्याबद्दल काहीही आणि कधीही तक्रार केली नाही ."

लोकांना जरी वाटत असले की त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला त्यांची कन्या  किरण   या बाबतीत म्हणते  
"शाळेत असताना आमच्या शिक्षणासाठी कुठे आर्थिक काटकसर नव्हती. त्यांचा निम्माधिक पगार हा पुस्तके,रंग,कॅनव्हास यावर खर्च होत असे. घर, बंगला, गाडी, चैन या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात स्थान नव्हत.पण आम्हा चौघां भावंडांना आम्ही गरीबीत वाढलो असे आजही वाटत नाही.आम्हाला शिक्षणात कोठेही तडजोड करावी लागली नाही"

एकदा मी सरांचा सहज हात बघितलं  .त्यावर तीनच स्पष्ट आणि लांब रांगा होत्या  .मी त्यांना म्हटलं केसर तुमच्या नशिबात पैसा खूप आहे भाग्यरेखा खूपच बळकट आहे  .तेव्हा ते हसले म्हणाले अजित दरेकर आलेलं नाही  अजून तरी काही आलेलं नाही  .त्याचं असं म्हणणं होतं की त्यांच्या चित्रांची कीर्ती त्याने काहीही प्रयत्न न करता प्रयत्न न करता सर्वत्र पसरली पाहिजे  .एकदा त्यांच्या एका शिष्याने त्यांना काही पैसे देऊन त्यांच्यासह चित्रांचे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीत करायला लावले  .चित्राचा विषय काय आहे त्याचा अर्थ काय आहे हे सरांनी कोणाला सांगितले नाही  .त्यांचे म्हणणे आहे की लोकांनाच जो पाहिजे असतील ते अर्थ घेतील  .एकोणीसशे ऐंशीच्या दशकात लोक ती दहा बारा हजार रुपये देऊन घ्यायला एकेक क्षेत्र घ्यायला तयार होते  .पण सरांच्या म्हणण्यानुसार त्याची किंमत खूपच जास्त होते त्यामुळे सरांनी एकाही चित्र विकले नाही  .परत येताना एसटीच्या टपावरून त्याचं पॅकिंग पडले आणि दहा बारा चित्रे रस्त्यात पडून वाटेत हरवली .पण सर स्थितप्रज्ञ होते  .

सर रिटायर   झाल्यानंतर भेटायला घरी गेलो होतो .त्यांच्या घरात  मधल्या खोलीत एका गादीवर बसले होते.शेजारी एक पानाचे तबक हाेते . त्यात कात चुना पाने सुपारी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवलेल्या होत्या  .सरांना म्हणलं की तुम्ही कधी पान खाताना कधी दिसला नाही. ते म्हणाले की आता रिटायर झाल्यानंतर ज्या गोष्टी आधी करायला जमल्या नाहीत त्या गोष्टी करायच्या असे ठरवले आहे.आणि रिटायर झाल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षापासून ते अखेरपर्यंत त्यांनी कुठलीही गोष्ट अर्थार्जनासाठी केली नाही. जी काही पेन्शन मिळत होती त्यात ते समाधानाने आणि आनंदाने राहिले  .आणि शेवटपर्यंत त्यांची बैठक त्या मधल्या खोलीत एक  गादीवर असायची .त्यांच्यावर त्यांच्या गुरुंचे म्हणजे पारनेरकर महाराजांचे त्यांनी काढलेले चित्र लावलेले होते  .


 सरांचे ज्योतिषशास्त्र-
सौ. किरण नेटके 
( कनिष्ठ कन्या, त्या चित्रकलेचे क्लासेस घेत आणि आता त्यांनी स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय चालू केला आहे.)

अनेक अवघडलेले किंवा समस्या असलेले लोक सरांच्याकडे ज्योतिषविषयक सल्ला घेण्यासाठी येत  . सर कधीही पैशाच्या पाठीमागे नव्हते .वएकदा एक गृहस्थ पत्नीची तब्येत बरोबर नाही म्हणून तिची पत्रिका दाखवायला आले.सर खूपच गंभीर झाले आणि म्हणाले की तुम्ही एक काम करा घरातून आठ दिवस बाहेर जाऊ नका ,घरातच नीट विश्रांती घ्या  .ते गृहस्थ जरा वैतागले आणि म्हणाले की पत्नीच्या बद्दल काहीतरी सांगा ना  .सर म्हणाले की पत्नीची काळजी करु नका फक्त तुम्ही आठ दिवस नीट विश्रांती घ्या.आणि दुर्देवाने आठव्या दिवशी ते गृहस्थ हृदयविकाराच्या झटक्याने गेले. सरांनी सांगितले की त्या माणसाचा मृत्यू दिसत होता पण त्याला तो कसा सांगायचा आणि तो टाळू शकेल असे काही लक्षणे नव्हती.त्याच्या पत्नीने  सरांचे  येऊन पाय धरले  आणि सरांनी तिला पुढच्या आयुष्यभर मार्गदर्शन केले  .अगदी तिच्या मुलीचलग्न ठरवण्यापर्यंत.

असेच एकदा एक श्रीमंत वयस्क कुटुंब मुलाचं लग्न जमत नाही म्हणून सरांकडे भेटायला आले. मुलगा मुंबईत होता ,खूप पैसे मिळवत होता .त्यातील बाईंची नजर सरांच्या मुलीच्या फोटोवर पडली  आणि त्या म्हणाल्या की हिलाच आपण सून का करून घेऊ नये ? पाचच मिनिटांत सरांनी रुद्रावतार धारण केला आणि दोघांना घरातून हाकलून दिले.घरातील लोक आश्चर्याने थक्क झाले. सर शांतपणे म्हणाले यांचा मुलगा मुंबईमध्ये कुठल्यातरी अंडरवर्ल्ड च्या टोळीमध्ये काम करतो आहे  आणि पंधरा दिवसांतच त्याला मृत्यूचा योग आहे. आणि पंधरा दिवसांनी  त्या मुलाचा मुंबईमध्ये खून झाल्याची बातमी पेपरमध्ये वाचायला मिळाली  !


 उपसंहार
सरांची चारही मुले व्यवस्थित शिकली आणि आपापल्या आयुष्यात आत्मविश्वासाने स्थिरावली.

आपला अंत होण्यापूर्वी एकवीस दिवस  अन्न पाणी सोडून द्यावं अशी सरांची इच्छा होते  .आणि काही प्रमाणात नियतीने तसेच घडवून आणले.  त्यांची शुगर वाढली आणि त्यांना काही खाणे अशक्य झाले आणि नंतर थोडंसं दिसेनासे झाले  .त्यांच्या मृत्यूची दिवस आणि वेळ हे त्यांनी आधी लिहून ठेवली होती  . आणि त्यानी सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता आपला देह सोडला  . नंतर त्यांच्या मुलीला त्यांनी लिहिलेला कागद सापडला आणि त्यावर तारीख होती पंचवीस जानेवारी सकाळी नऊ वाजता  !

तसेच शेवटच्या आजारात ऍडमिट झाल्यानन्तर  ते किरणला म्हणले की तू माझ्या खोलीतून दूर जा, असे दोन तीन वेळा दोन तीन दिवस झाले. किरणन विचारलं "मामा असं का म्हणताय तुम्ही ?"तर  ते म्हणाले "मी आता एका यंत्रात जाणार आहे आणि तेथे मी गोलगोल फिरणार आहे  तू जर माझ्याबरोबर असशील तर तुला त्रास होईल ,म्हणून तू माझ्यापासून दूर जा."
 किरण म्हणतायत थोडंसं असंबंध वाटणारे असे हे एकच वाक्य ते अख्ख्या आयुष्यात बोललेले मला आठवते  !

मला असे वाटते की सरांची सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणजे त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांच्याविषयीचे आदराचे   अढळ असे स्थान ही आहेत  .कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या विद्यार्थी किंवा त्यांच्या संबंधित अनेक लोक त्यांच्याकडे विश्वासाने जात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत.

 सरांच्या  असंख्य आठवणींचा नंदादीप त्यांच्या  विद्यार्थ्यांना   सदैव मार्गदर्शन करत राहिल....

त्यांचे कुठलेही चित्र विकू नये अशी त्यांची इच्छा होती.त्याप्रमाणे  त्यांच्या सर्व चित्रांचे प्रदर्शन नगर जवळ पारनेरला केलेले आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻




Comments

Popular posts from this blog

"रामचंद्रन साहेब"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"देवधर सर"