"रोटीथोर बाई"

शाळेतील आठवणी
# रोटीथोर बाई
_  चारुदत्त कुलकर्णी

( On Thanks Giving day I will like to express my gratitude)

जर कोणी मला विचारले की विद्यापीठ हायस्कुल कोल्हापूर मधील तुमच्या शालेय जीवनातील सर्वात  उत्तम शिक्षक कोण,  तर मला हजार वेळा विचार आणि विचार करावा लागेल. कारण तेथे श्री आर.जी. कुलकर्णी सर ,देसाई सर, श्री  गो नि जोशी सर , श्री देवधर सर वगैरे महान शिक्षकांची  आकाशगंगा होती. म्हणून निवड करणे प्रत्येक कठीण होईल आणि बहुधा मी ते करू शकत नाही .पण जर कोणी मला विचारले की तुमचा  शाळेत सर्वात आवडता शिक्षक कोण  तर मी लगेच उत्तर देईन   श्रीमती रोटिथोर बाई.

 

रोटीथोर बाई आम्हाला पाचवी ते सातवी मराठी शिकवायच्या.त्या आमच्या वर्ग शिक्षिका होत्या.दहावी झाल्यावर पंचवीस वर्षांनी रियुनियन झाली, तेंव्हा त्या परत भेटल्या.तेव्हा एक मुलगी दुसरीशी कुजबुजत म्हणाली हा चारुदत्त, रोटिथोर बाईंचा आवडता विद्यार्थी!

रोटीथोर बाईंचे माहेरचे नाव पुष्पा पांडुरंग पाठक.त्यांचा वाढदिवस 2 ऑक्टोबर 1945.त्यांचे वडील भवानी स्कूल आटपाडी येथे गणिताचे शिक्षक होते. ती एकूण नऊ भावनडे.

दोन बहिणी आणि सात भाऊ.त्याचे वडील लहानपणीच गेले. बाई दिड वर्षाच्या होत्या.त्यांच्या आई, ताई पाठक पंचक्रोशीत  प्रसिद्ध होत्या. त्यांची सात  मुले क्लास वन ऑफिसर झाली. काही सुपर क्लास वन झाली. ताई आणि त्यांची मोठी दोन तीन मुले यांनी खूप कष्ट घेऊन सर्वाना पुढे आणले.त्यांना आदर्श माता हा पारखे प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला.

 त्यांचे शालेय शिक्षण  आटपाडीत झाले आणि एम इ एस कॉलेज पुणे मधून  बी ए पूर्ण केले . त्या भावाकडे रहात आणि  रोज बसने प्रवास करत.बी एड त्यांनी कोल्हापूरात नोकरी करत असताना केले.

 कॉलेजमध्ये  असताना मा का देशपांडे यांच्या कन्या वगैरे अशा मोठमोठ्या लोकांच्या मुली त्यांच्या क्लासमेट होत्या.  १२ मे १९६७ त्यांचा विवाह माधव रामचंद्र रोटिथोर यांच्याबरोबर झाला . त्यांचे सासरे हे सोलापुरात सरकारी नोकरीमध्ये सिव्हिल इंजिनिअर होते.  त्या गमतीत म्हणायचा की हल्ली लव्ह मॅरेज फॅड आहे पण आमच्या पिढीनं मॅरेज लव म्हणजे  लग्न करुन प्रेम केलं पण आमचं कुठे बिघडलं ?

त्यांचे मिस्टर सरकारी छापण्यात नोकरीला होते त्यांना बरेच वर्ष शिफ्ट ड्युटी होती .प्रमोशन घेतलं तर गाव सोडावे लागेल आणि बाईंना त्रास होईल म्हणून बरेच वर्ष त्यांनी प्रमोशन घेतलं नाही.त्यांना संगीताची अतिशय आवड आणि माहिती होती . ते स्वतः व्हायोलिन अतिशय उत्तम वाजवायचे आणि सर्व संगीत नाटके आणि कोल्हापुरात होणारे सर्व संगीताचे कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असायची

जावयाच्या पहिल्या दिवाळसणाला त्यांनी काहीतरी सतार भेट दिली होती.

 १९७५ मध्ये त्या विद्यापीठ हायस्कूल मध्ये जॉइन झाल्या .आम्हीही  चौथीतून पाचवीत  हायस्कुलात गेलो.पाचवी ते सातवी त्या आमचा क्लास टीचर होत्या आणि आम्हाला मराठी शिकवायच्या.त्यांच्यामुळे आम्हाला मराठीची गोडी लागली .

मध्यंतरी त्यांना मेघा आणि मकरंद दोन अपत्ये झाली होती  आणि त्या वात्सल्यरसात  पूर्ण बुडाल्या .मराठीतील कुठलाही धडा किंवा कविता शिकवतांना मकरंदची मेघाची एखादी गोष्ट यायचीच .वर्गात अतिशय जिव्हाळय़ाचे  प्रेमाचे आणि खेळीमेळीचे वातावरण असायचे .

बाईंची शिकवायची स्वत ची अशी एक विशिष्ट शैली होती.त्या कायम उत्साहाने भरलेल्या असायच्या.  वर्गात आल्यानंतर त्या खडूने धड्याचं नाव फळ्यावर लिहायच्या.  नंतर पुस्तकातील एका एखाद्या धड्याचे किंवा कवितांचे एखादे कडवे स्वत वाचून दाखवायच्या किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला वाचायला सांगायच्या.  नंतर त्या मुलांच्या कडे तोंड करून खुर्चीवर बसायच्या  आणि मग व्यवहारातील किंवा घरातील अनेक  उदाहरणे देऊन त्याचे स्पष्टीकरण  करायचच्या  .प्रत्येक मुलाला त्या आपल्याबरोबर संवाद साधत आहेत असे वाटायचे. कुठल्याही  कुठलाही विषय त्या खूप मनोरंजक करायच्या.गोष्टीच्या तासाला  बसलो  आहोत असे वाटायचे  .

 वर्गावर त्यांचे पूर्ण नियंत्रण असायचे. कोणाची दंगा करायची किंवा  त्रास द्यायची टाप नव्हते .रोजच्या व्यवहारातील उदाहरणांमुळे सर्व खूप सोपे वाटायचे.कोणालाही कसलीही शंका विचारायला पूर्ण मुभा असायचे  .

एकदा मुलांनी विचारले की बाई रोटीथोर या नावाचा अर्थ काय तर त्या म्हणाल्या मी ही सासऱ्यांना हा प्रश्न विचारला होता . त्यांच्या पूर्वजांनी एकदा दुष्काळ पडलेला असताना गरीब लोकांना मोठ्या आकाराच्या रोट्या करून वाटल्या म्हणून ते नाव पडले .

 दर संक्रांतीला तिळगूळ द्यायला  आणि दसऱ्याला सोनं द्यायला लाटकर आणि मी त्यांच्या घरी जात असू आणि त्या कधीहि काहि ना काहि खाऊ दिल्याशिवाय सोडत नसत.

मुलांना नोकरी आणि मुलींचे लग्न योग्य त्या वयात झालीच पाहिजेत असं त्या म्हणत.

त्यांच्याबरोबर आम्ही महाबळेश्वरला पिकनिकला गेलं होतं त्या रम्य आठवणी अजूनही बऱ्याच लोकांच्या लक्षात असतील .मुलं मुली गाण्याच्या भेंड्या खेळत होते नंतर मुलींनी आणि मुलाने असं ठरवलं की आपण वर्गात फारसं बोलत नाहीत  आता आपण बोललं पाहिजे असे ठरले. दीपा देशपांडे ,सुनील सहरसबुद्धे यांनी छान गाणी म्हणली.

इको पॉइंट्ससाठी तिथल्या गाईडने सांगितले की कुठले तरी नाव सुचवा तर भांबुरे सर थोडेसे मिश्कील होते ते म्हणले की मंजिरी हे नाव घ्या. तेव्हा त्या थोडय़ाशा चपापल्या होत्या पण त्यांनी  ते स्पोर्टिंगली घेतले .

[एकदा पाचवीत असताना स्त्री श्रेष्ठ का पुरुष असे दिबेट चालू होते. त्यात मी असा युक्तिवाद केला होता की मुलं होण्यासाठी स्त्री आवश्यक आहे, पुरुष नसले तरी चालतील,( आमचे नॉलेज अगदीच बेताचे होते!)तेव्हा त्या खूप हसल्या होत्या.स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत  असा काहीसा त्यांनी समारोप केला होता .

त्यांना प्रिन्सिपल व्हायची संधी आली होती पण  शाळेतील राजकारणामुळे  त्याना  ती   घेता आली  नाही . तसेच त्यांना तब्येतीचे थोड्या तक्रारी होत्या त्यामुळे त्यांनी लवकर रिटायरमेंट घेतली. ज्यात्च्यामुळे त्यांची ती संधी हुकली त्यांच्या मुलीच्या लग्नाला अनुपस्थित राहून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला

 त्यांच्यामुळे मला शाळा आवडू लागली .तसेच मराठी लेखनाची आणि वाचनाची आवड निर्माण झाली .त्यांच्या बरोबर एक अकृत्रिम जिव्हाळा तयार झाला .खूप वर्षांनी त्यांना भेटायला गेलो असताना स्वतः त्यांनी गरम गरम कांदे पोहे करून दिले. त्यांच्या काही सहकार्यांबरोबर त्यांचे संबंध दुरावले ,त्यांची काही चूक नसताना ,ही त्यांना थोडीशी  खंत वाटते .पण त्यांनी कुणाचाच दुस्वास  केला नाही . आहे त्या परिस्थितीत मजेत कसे रहावे  आपल्या कुटुंबियांचा अभिमान कसा बाळगावा  हे मी त्यांच्याकडून शिकलो .मकरंद मकरंदने त्याला जयपूर दिल्ली आग्रा ही गोल्डन ट्रायंगलची  ट्रिप करून आणली .विशेष म्हणजे आमच्या मुलीचं आभाचा वाढदिवसही दोन ऑक्टोबर! त्यामुळे मी दर दोन ऑक्टोबरला न चुकता त्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा  देतो!

 त्यांना मुलगा सून , मुलगी जावई ;दोन नाती एक नातू आणि दोन पणती  असा परिवार आहे .त्या आलटून पालटून मकरंद आणि मेघा कडे राहत असतात   आता सुद्धा कधी फोन केला तर आमच्या तासभर तरी गप्पा होतात, त्या कुठल्याही विषयावर मोकळेपणे बोलतात. त्यांची स्मरणशक्ती, विनोदबुद्धि; आकलन शक्ती; सामान्य ज्ञान अफाट आहे. जीवेत शरद: शतम अशी मी त्यांचासाठी देवाकडे प्रार्थना करतो.

त्रुणनिर्देश: मकरंद, गबाले सर आणि स्वतः बाई ह्यांचे ह्या लेखासाठी खूप सहकार्य मिळाले.

P.S.
सोशल मिडीयामुळे जग खूप लहान झालेले आहे  .बाईंची एकनाथ चैत्राली हिने मेसेज पाठवला की तुमच्यामुळे मला आजीची ही बाजू कळली मला माझ्या आजीचा धडाडीचा  आणि कर्तृत्वाचा खूप अभिमान होताच  !
lबाईंची दुसरी नात सौ धनश्री हे माझी  बायकोकडून नातेवाईक निघाली.तिच्याबरोबर गप्पा मारताना काही नवीन माहिती कळली  .सर्व पातळ भाज्या विशेषतः अळूची भाजी बाई खूप छान करतात  .दिवाळीच्या फराळाचे सर्व पदार्थही त्या खूप छान करायच्या  .स्वयंपाक करताना जजमेंटने सर्व पदार्थ  घालायच्या आणि कधी तोलून मापून कधी स्वयंपाक करायच्या नाहीत  .जेव्हा खरे धाडसी निर्णय घ्यायची वेळ येते त्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहायच्या.तेजश्री चा फ्लॅट घेताना त्यांनी प्रसंगी दागिने गहाण ठेवूया पण चांगला फ्लॅट घे ही तयारी दाखविली होती, त्यामुळे चांगला फ्लॅट कोल्हापूरला घेतला.

Comments

Popular posts from this blog

"रामचंद्रन साहेब"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"देवधर सर"