"इंगळे साहेब"

इंगळे साहेब  

    :चारुदत्त कुळकर्णी

व्हल्कन दोन हजार साली चालू झाली हाेती . स्टील कास्टिंगज बाहेर डेव्हलप करण्याचा बराच प्रयत्न करून शेवटी असे लक्षात आले की स्वतःची स्टील फौंड्री चालू करण्याची आवश्यकता आहे.  तेव्हा काही चांगल्या स्टील फौंड्री बघण्याकरता मिश्रा साहेब आणि मी काही कंपन्यांना व्हिजिट केली.  त्यामध्ये  मॅग्ना कास्टिंग ही कंपनी कुणीतरी आम्हाला सुचवली होती. तेथे गेल्यानंतर ती फौंड्री आम्ही बघितली. तेथे फाउंड्री मॅनेजर असलेल्या इंगळे साहेबांना बघून मला थोडासा धक्का बसला.   भरदार दाढी, पांढरे स्वच्छ मागे भांग पाडलेले  केस, चष्मा आणि आवाज अगदी खोलवर विचार करून आल्यासारखा. प्रत्येक प्रश्नाला  त्यांनी उत्तरे दिली. एखाद्या  जुन्या ऋषिमुनीशी बोलतोय असे वाटत होते.  एकदा दहा पंधरा मिनिटे या माणसाशी बोलल्यानंतर त्यांना विसरणे शक्य नव्हते.

त्या वेळी   एका सिल्वासाच्या मेटॅलर्गीस्टचा इंटरव्यू स्टील फौंड्रीसाठी झालेला  होता.जवळ जवळ फायनल झालं होतं.पण त्यांचे म्हणणे असे होते की त्यांना बराचसा सॅलरीचा पोर्शन टॅक्स लागणार नाही अशा स्वरुपात पाहिजे होता.  त्यामुळे मॅनेजमेंटला खूपच अवघड झाले होते. आणि मध्यंतरी  श्री. मिश्रासाहेबांवर इंगळे साहेबांच्या पर्सनॅलिटीचा प्रभाव बराच पडलेला होता,   त्यांनी मला चौकशी करायला सांगितली. इंगळे साहेबांना फोन करून आपल्याकडे जाऊन जॉईन होऊ शकतील का ते बघ.  मी  दुसर्या दिवशी घाबरत घाबरतच फोन केला,  पलीकडून धीरगंभीर आवाजात हॅलो  आले. मी त्यांना सांगितले की आमच्याकडे जॉईन व्हावं अशी आमच्या मॅनेजमेंटची  इच्छा आहे.  आणि सरप्राईज म्हणजे ते लगेच हो म्हणाले, त्यांनी विचारले , मी कधी भेटायला कधी येऊ ?

त्यांनी  अगोदर चार फौंड्री स्वतः  स्क्रॅचपासून उभ्या केल्या होत्या . त्यामुळे एका इनफॉर्मल इंटरव्यूनंतर ते लगेचच जॉईन झाले.  ते म्हणाले की आधिच्या कंपनीत  रिटायरमेंट एज हे लगेचच एका वर्षांनंतर होते,  पण त्यांना अजून जास्त वर्षे  काम करण्याची इच्छा होती, त्यामुळे ते व्हल्कन मध्ये जॉइन झाले.

साहेबांचे पूर्ण नाव मधुकर नारायण इंगळे.  जन्म खानदेशातील म्हणजे जळगाव जिल्ह्यातील दहिगाव  गावचा.   जन्मदिन सतरा मे एकूणिसशे सत्तेचाळीस.  साहेबांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. ती एकूण सात भावंडे ,चार भाऊ आणि तीन बहिणी. इंगळे साहेब तीन नंबरचे. चौथी पाचवीपर्यंत  गावात शिक्षण झाल्यानंतर ते पुण्यात शिफ्ट झाले.त्यांनी रास्ता पेठ हायस्कूल जॉईन केले .अकरावीत गणितात त्यांना शंभरपैकी शंभर मार्क्स होते. नंतर पुना इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बी. इ. मेटलर्जी केले. गणित हा पहिल्यापासून   त्यांचा अतिशय आवडीचा आणि हातखंडा   विषय. पंधरा जून एकोणीशे चौर्याहत्तर रोजी त्यांचा विवाह नाशिकच्या   कुमारी सुधा  चौधरी  यांच्याबरोबर झाला. त्यांच्या अनेक नातेवाईकांना त्यांनी शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले   दिले.बऱ्याच  नातेवाईकानी त्यांच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केले. कायम इतरांना मदत करायचा त्यांचा स्वभाव होता.

इंगळे साहेब व्हल्कनमध्ये जॉइन झाल्यानंतर पहिले एक दिड वर्ष त्यांनी नवीन बिल्डींग कशी बांधायची याचे पूर्ण सुपरव्हिजन केले . त्यावेळी   ते साइट मधल्या  लोकांच्या बरोबर पूर्ण मिक्स होत असत. जॉर्ज नावाचा एक सिव्हील इंजिनिअर व्हल्कन तर्फे काम करत असे,  तसेच  कुदळे आणि कुलकर्णी दोघे कॉन्ट्रॅक्टर बांधकामाचे काम बघत असत. बांधकाम चालू असताना साहेबांच्या हातात कायम मोठी ड्रॉविंग्स असत,आणि ते सिविल इंजिनिअरच असल्यासारखे वाटत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन हजार पाच मध्ये श्रीयुत उलरीच फॉल्स यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन झाले.   याचं वैशिष्ट्य म्हणजे फौंड्री पहिल्या  मजल्यावर असल्यासारखी वाटायची. 

योगायोगाने इंगळे साहेबांची केबिन  आणि माझी  केबिन  अगदी शेजारी शेजारी होती, आणि   मध्ये एक फक्त काचेची खिडकी होती. ती बंद आणि उघडता यायची.  असे  जवळजवळ आठ दहा वर्षे  आम्ही शेजारी शेजारी होतो!  साहेब सतत आपल्या कामात बिझी असत. वेळेवर येण्याबाबतची  त्यांची पंक्च्युऍलिटी विलक्षण होती.  कधी ते एकदाही ते लेट झालेले आठवत नाही .  तसेच उगाच  उशीरा थांबणे त्यांना आवडत नसे. सहसा  ते कोणालाही रागवत नसत,  पहिल्यांदा नीट समजावून सांगत . विशेष म्हणजे कोणालाही न विचारता कधी कुठलाही सल्ला देत नसत !

 कुठलीही गोष्ट वाया गेलेली त्यांना खपत नसे . अगदी चहा पिताना  चहाची बॅग  सुद्धा ते नीट पिळून घेत असत  आणि चहा वाया जाऊ देत नसत.  कोणाची एखादी चूक झाली तर मॅनेजमेंटला स्पष्टपणे सांगत की माझ्या हातून चूक झाली . त्यावेळी  सबोर्डीनेटना  नेहमी  संभाळून घेत असत . पहिल्यांदा नीट प्लॅनिंग करणे व त्याप्रमाणे एक्सेक्युशन करणे हे त्यांना आवडत असे .
 
कंपनीच्या  पार्टीज, गेट टुगेदरस, पिकनिक्स या सगळ्या गोष्टी ते अतिशय एन्जॉय करीत. त्यांचा फिजिकल फिटनेस वाखाणण्यासारखा होता.  

एखाद्या  कस्टमरनं कम्प्लेंट केली की तुमच्या कास्टिंगमध्ये सॅन्ड सापडली तर  चेष्टेत त्याला म्हणत  तू एवढे कमी पैसे देतोस  त्यात सोनं द्यायचंय का रे ? कस्टमर हसून गप्प बसत असे. तसंच कुठल्याही  कठीण प्रसंग आला तरी ते  अनुभवाच्या बळावर सहज निभावून नेत.

आणखीन एक आवर्जून नोंद करावी म्हणजे सर्व ऑपरेटर व त्यांचे अतिशय चांगले आणि वैयक्तिक संबंध असत.  संक्रांतीला तिळगूळ द्यायला ते घरून मोठा तिळगुळाचा पुडा घेऊन येत असत आणि सर्व ऑपरेटर येऊन त्यांना तिळगुळ  देऊन नमस्कार करत असत.   तसेच एखाद्या ऑपरेटरचे लग्न ठरले तर ते त्याला स्वत:च्या खर्चाने ताट, वाटी,पातेली, फुलपात्रे अशा काही संसारोपयोगी वस्तू  भेट देत.

इंगळेसाहेबांचे एकोणिसशे अठ्ठयाहत्तरपासूनचे स्नेही आणि सहकारी श्रीयुत एस एन देशपांडे म्हणतात " आम्ही पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये पेफको फौंड्रीत भेटलो.  अतिशय साधा,  सरळ मनाचा, हुशार मनुष्य . कमी बोलणारा मितभाषी पण काम मात्र कधी चुकवायचा नाही आणि मेटलर्जीकल नॉलेज खूप असलेला असा मनुष्य होता. आणि कंपनीबाहेर अतिशय  मित्रप्रिय ,माणसं जोडणारा ,पार्टीप्रिय माणूस होता. आणि त्यावेळी  दरमहिन्याला प्रत्येकाच्या घरी  पार्टी होत असे  तशी त्यांच्या घरी झाल्यानंतर ते खूप एन्जॉय करायचे , खूप बोलायचे. आपल्यापेक्षा वेगळे आहेत असे कधी वाटलेच नाही.  तेव्हा त्यानी दाढी वाढवले नव्हती.  पेफको मधला आमचा जवळजवळ दहा वर्षांचा सहवास .  किंबहुना माझे पहिले घर मी त्यांच्यामुळेच पुण्यात त्यांच्या घराजवळच बुक केले.   नंतर  काही दिवस त्यांनी इंदूरला नोकरी केली. साधारण १९८७ साली ते  इंदूरला गेले   तीन एक वर्षांनंतर ते पुण्यात एका कन्सल्टन्सी फर्मला जॉईन  झाले . मी त्यांना कधीच कुठल्या कामगारांवर चिडलेले  पाहिले नाही.  अतिशय शांत स्वभाव  कामापुरते काम आणि कामाच्या वेळात कुणाकडे जाऊन गप्पा मारत बसणं वगरे असं मी कधी त्यांना पाहिले नाही."पेफकोचे नानासाहेब परांजपे यांना ते गुरू मानायचे,आणि भेटले की त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करायचे.

इंगळे साहेबांचे १९९९ पासूनचे   सहकारी आणि आणि त्यांना गुरू मानणारे  श्री. लक्ष्मण वाघमारे म्हणतात  "इंगळे साहेबांना प्रथम १९९९ मध्ये मॅग्ना कास्टिंगच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला भेटलो. इंटरव्हिवच्या वेळी ते खुप कोऑपरेटिव्ह होते.   त्याच्या दाढीमुळे फाउंड्रीमध्ये  एखादा साधू माणूस काम करतोय असे वाटायचे.  काम करताना ते पुस्तकं वाचायला द्यायचे आणि वाचन करायला लावायचे.  ते सोल्युशन रेडिमेड देत नसत. तू  वाच आणि तो सोल्युशन काढ असे म्हणायचे .

त्यावेळी एकदा आम्ही एक ट्रायल घेत असताना मेटलचा एकदम स्फोट झाला. मेटल सगळ्यांच्या अंगावर उडाले. आणि साहेबांनाही  भाजल. तरीपण साहेबांनी धीराने ती हिट पूर्ण केली   नंतर   ड्राइव्ह करून वांबोरीहुन पुण्यापर्यंत गाडीतून सर्वांना आणले आणि मगच स्वतः ऍडमिट झाले.व्हल्कन मध्ये  असताना फक्त एकदाच ते खूप चिडले होते. कॉन्ट्रॅक्टरला तीनतीनदा बजावूनसुद्धा त्यांनी फरनेसखाली सेफ्टी साठीम्हणून ड्राफ्ट दिला नव्हता,  तेव्हा मात्र त्यांनी रुद्रावतार धारण केला होता . 
एरवी कामात कधी चूक झाली तर ते चिडायचे नाहीत, फक्त म्हणायचे अरे जरा बघून काम करत जा, न बघता कशी काम करता रे? "

इंगळे साहेबांचं  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना शेअर मार्केटची चांगल्यापैकी जाण होती   तसेच ते काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये नियमितपणे गुंतवणूक करत असत . वल्कन  हा साहेबांचा सातवा जॉब होता, आणि ते नेहमी म्हणायचे हा शेवटचा!फौंड्री अतिशय चांगली चालू असताना  २०१२   मध्ये वयाच्या  पासष्टाव्या वर्षी इंगळे साहेबांनी रिटायर व्हायचं ठरवलं. तेव्हा व्हलकन चे M D श्री. राजेश  मिश्रा  म्हणाले   " श्री. इंगळे यांचासारखा माणूस योग्य वेळी मिळणे हे कंपनीचे भाग्य असे म्हणावे लागेल. त्यांनी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची फौंड्री उभी करून सर्व कस्टमरना समाधानी  करून दाखवले." 
रिटायरमेंटनंतर फौंड्री इंडस्ट्री रिलेटेड कुठल्याही गोष्टीशी त्यांनी संबंध ठेवला नाही  किंबहुना आधीच त्यांनी तसे ठरवले होते . नंतरचा वेळ त्यांनी  पूर्णपणे  कुटूंबासाठी दिला. आपल्या संसारातील पत्नीचे ऋण ते मोकळेपणे मान्य करत,काही काळ नोकरी नसताना त्यांच्या नोकरीवर घर चालले असे ते सांगत. नातवाबरोबर  पोहायला शिकले. रोज  सकाळी उठून फिरायला जाणे, ध्यानधारणा, पोहणे,वाचन, संध्याकाळी परत फिरायला जाणे हे, त्यांचे रुटीन त्यांनी आनंदाने फॉलो केले.देश विदेश यात्रा केल्या. त्यांचा मुलगा राहुल इन्फोसिसमध्ये  व  मुलगी दीप्ती L & T मध्ये  काम करते. आपल्या  परिवारात ते पूर्णपणे गुंतून गेले. आणि ......

रविवार  ७ फेब्रुवारी  २०२१ रोजी   सकाळी नियमित जायचे तसे  फिरायला गेले होते, चार जिने चढून परत  आले आणि शेवटच्या पायरीवर  बसले  आणि  आडवे झाले. लगेचच त्यांची प्राणज्योत मालवली. एका कर्तृत्ववान, अध्यात्मिक आणि सर्व क्षेत्रात आदर्श ठेवावा  अशा कृतार्थ जीवनाचा अकस्मित हूरहूर लावून जाणारा अंत झाला. साहेब शेवटपर्यंत कार्यरत राहिले, दिनचर्या चुकवली नाही आणि कोणावरही आपला भार पडू दिला नाही. ईश्वराने त्यांना नक्कीच चिरशांती दिली आहे!

Comments