"टोळ साहेब"
टोळ साहेब
१९८७ मध्ये मी B E मेटलर्जी रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग जयपूरमधून पास झालो .इचलकरंजीला एका छोट्या फौंड्रीत काम करताना कामासाठी पुण्यात आलो होतो.वडील योगायोगाने तिथे होते.ते म्हणाले चल आपण कमिन्स मदत तुला नोकरी मिळते का बघुया; मोहन टोळ आपल्या चांगल्या ओळखीचे आहेत.
त्याच दिवशी आम्ही दोघे संध्याकाळी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. साहेब फॅक्टरीतून घरी येऊन अंघोळ करून उकडलेल्या शेंगा खात बसले होते. फॅक्टरीतून आल्यानन्तर पहिल्यांदा ते आंघोळ करायचे.चट्ट्यापट्टयाची अंडरवेअर आणि बनियन; गळ्यात जानवे.केस काळे कुळकुळीत,चोपडून भांग पाडलेला, देव आनन्द सारखा कोंबडा ! शेवटपर्यत त्यांचे केस काळेभोर आणि भांगाची स्टाईल तशीच होती! स्वयंपाकघरात हाक मारून त्यांनी सांगितले मु ज्या (माझ्या वडिलांचे नाव मुकुंद जनार्दन, हा त्याचा शॉर्ट फॉर्म) आला आहे त्याला पण शेंगा दे!आम्ही यावयाचे कारण सांगितले , ते म्हणाले कमिन्स मध्ये तर सध्या शक्य नाही पण नगर रोडला प्लांट टू नावाची फौंड्री आहे तिथे त्याची काम करायची तयारी असेल तर होऊ शकतं .त्या काळात कमिन्सचे फार मोठं ग्लॅमर होतं.तिथं जॉब मिळणं म्हणजे जणू स्वर्गात गेल्यासारखे होते. कंपनी गावात होते पगार खूप असायचं;कॅन्टीन अतिशय नावाजलेले, बोनस खूप मिळायचा. मी लगेच हो म्हटलं. ते म्हणाले हे बघ इथं पगार जास्त आहे पण वीस वर्षांनंतर तुझा जेवढा पगार असेल आणि तो बाहेर लहान कंपनीत काम आत्ता केल्यास इथल्या पेक्षा खूप जास्त पैसे आणि पोझिशन मिळवू शकशील. मी तुला इंटरव्ह्यूपर्यंत सोडतो, त्यापुढं तू आणि तुझे नशीब. नंतर मला कुठल्याही गोष्टीसाठी भेटायचं नाही ! आणि १९८८ ते २००२ पर्यंत मी कमिन्समध्ये नोकरी केली !
टोळ साहेब मॉडर्न हायस्कुल मधे असताना माझ्या आजोबांचे विद्यार्थी आणि माझ्या काकांचे क्लासमेट .लहान असल्यापासून मी त्यांच्याविषयी काही आख्यायिका ऐकत होतो. ते खूप वरच्या पोस्टला आहेत वगैरे.
कमिन्स मध्ये आल्यानंतर तर त्यांच्याविषयीच्या गोष्टी म्हणजे जणूकाही दंतकथाच होत्या . अरुण किर्लोस्कर, रामचंद्रन साहेब, टोळ साहेब नागपूरकर साहेब ह्यांच्या विषयीच्या अनेक गोष्टी चाविष्टपणे चघळल्या जायच्या.त्या प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचे वलय होते.
टोळ साहेबांचे सगळ्यात धाकटे बंधू श्री वसंतराव टोळ हे माझे सगळ्यात धाकटे काका श्री. चंद्रशेखर कुलकर्णी यांचे खास मित्र. ते व त्यांच्या पत्नी आमच्या काकांकडे बऱ्याचवेळा भेटायला येत असत .कमिन्स जॉइन करण्याआधी त्यामुळे मला टोळ साहेबांच्याविषयी बरीच माहिती होती .त्यातील काही:
टोळ साहेब कंपनीत राउंड घेताना रोज एक गीतेचा श्लोक पाठ करत अशा पध्दतीने सगळे गीता त्यांनी पाठ केली आहे असा एक समज होता.ही माहिती खरी असावे कारण ते बोलताना बऱ्याचदा संस्कृत सुभाषितांचा उल्लेख करीत .एक सुभाषित की प्रत्येक गोष्टीचं कुठे ना कुठे तरी उपयोग असतोच ह्याचा ते बऱ्याचदा रेफरन्स देत असत .योजकस्त दुर्लभहा अस ते एक सुभाशित आहे. तसंच त्यांची एका डिपार्टमेंट मधुन दुसरीकडे बदली झाली की ते म्हणत मी गीता जगणारा माणूस आहे मला कसलीही अटॅचमेंट नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा एकदा डिवॊर्स झाला होता.ही गोष्ट त्याकाळात खूप अनकॉमन आणि ग्लॅमरस होती. कंपनीप्रमाणेच त्यानी घरी पत्नीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आणि तीही हट्टी असल्यामुळे तिला ते सहन झाले नाही. आणि शेवटी त्याची परिणिती घटस्फोटात झाली असावी. पहिली पत्नी कोकणस्थ होती आणि त्यामुळे त्यांचा कोकणास्थानवर थोडासा राग होता, असे लोक म्हणत.हे कदाचित काही प्रमाणात खरे असावे.पार्टी मध्ये ते नेहमी टोमणे मारत की एक सुद्धा संत कोकणस्थ लोकात झाला नाही, त्यातल्या त्यात झाले काही माथेफिरू क्रांतिकारक!पण त्यांचे कंपनीतील निकटवर्तीय सहकारी बरेचशे कोकणस्थ लोकच होते!
आणि इतर काही गोष्टी .त्यांची देवावर अमाप श्रद्धा होती .ते रोज मनोभावे पूजा करत असत .दर संकष्टी ला तळ्यातला गणपतीला जात असत.त्यांच्या अख्ख्या करिअरमध्ये एकदाही कंपनीत ते कधी उशिरा गेले नाहीत. तसेच एकदाही त्यांनी सिक लिव्ह घेतली नसावी.प्रत्येक गोष्ट घड्याळाच्या काट्याप्रमाणे आखून नियमितपणे आणि रेखीव आणि नेटकेपणाने करण्याचा त्यांचा शिरस्ता होता .टोळसाहेब म्हणजे शिस्त असं जणू सर्व कंपनीत समीकरण आणि दरारा होता. या सर्व गोष्टी खऱ्या निघाल्या.सकाळी फिरायला जाताना सुद्धा ते ठराविक वेगाने ठराविक अंतर जात. नाडीचे ठोके ठराविक वाढले की वेग कमी करत.
आणि टोळ साहेबांना घरी संध्याकाळी जेवताना पहिल्या वाफेचा भात लागायचा. म्हणजे कूकरचे झाकण पडल्यानंतर लगेच वाफाळलेला भात असते तो!ही माहितीही नंतर खरी निघाली .
मी जॉईन झालो त्यावेळी किलोस्कर कमिन्स म्हणजे एक जणू मोठे कुटुंबच होते. आत असलेला जवळ जवळ प्रत्येक माणूस कुणाचा तरी नातेवाईक किंवा निकटवर्तीय असायचा! अर्थात त्याची बॅकग्राऊंड , क्वालिफिकेशन आणि योग्यता ही पहिली जायची.आणि वातावरण अतिशय खेळीमेळीचे आणि घरगुती असायचे.
जॉईन झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी मी धाडस करून त्यांना भेटायला केबिन मध्ये गेलो. मेन बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला रिलायबिलिटी डिपार्टमेंट होते. तेथे बाहेर त्यांचे पी. ए. ; श्री. एस. टी. सबनीस आणि इतर बरेच लोक बसत असत. श्री.मालखरे साहेब हे मॅनेजमेंट रेप्रेसेंटटीव्हीव (ISO चे ) तसेच श्री.एस के जोशी साहेब हे दोन ठळक आठवतात. पुढे मला M R हा रोल अनेक वर्षे निभवायला लागला,अगदी अजूनसुद्धा....ते बसायचे त्यापाठीमागे ASTM चे सर्व खंड व्यवस्थित लावून ठेवले होते. इतर काही टेबलांवर नको असलेले लोक साहेब आणून बसवत. लोक त्याला गमतीने वृद्धाश्रम म्हणत!
कौटुंबिक पार्श्वभूमी
टोळ साहेबांचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे चाळीस चा. त्यांचे जन्मस्थान म्हणजे कर्नाटकातील गोकाक. वडिलांचे नाव श्री बाबुराव टोळ , आईंचे नाव सौ राधाबाई टोळ. घराणे वैष्णव ब्राम्हण, त्यामुळे घरात देवाची पूजा अर्चा तसेच सोवळे ओवळे कडक असावे. देवावर श्रद्धा ठेवणे, देवाची पूजा करणे हा साहेबांच्या जीवनातला शेवटपर्यंत अविभाज्य घटक होता.
एकूण पाच भावंडातले ते तीन नंबरचे. सगळ्यांत मोठी बहीण सौ सुधाताई. त्यांनी स्वतः नोकरी करून भावनडांच्या शिक्षणाला काही दिवस हातभार लावला.
दोन नंबरचे प्रभाकर पंत, ते बंगलोर ला बांधकाम व्यवसायात होते.साहेब हे तीन नंबर.
चार नंबरचे डॉ वामनराव, त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे.
श्री वसंतराव पाच नंबरचे , ते एक प्रथितयश उद्योजक आहेत.
घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यांचं शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले.लहानपणी त्यांचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म असायचे .मॅट्रिकला ते बोर्डात आले होते .
व्यवस्थितपणाचे बाळकडू त्यांच्या अंगात लहानपणापासूनच असावेत . सर्व भावंडांचे एकमेकांच्यावर अतिशय प्रेम .अतिशय कठीण प्रसंगात सुद्धा या सर्वांची एकमेकांना साथ कायम राहिली .किंबहुना साहेबांना त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या कुटुंबाला साहेबांचा सदैव खूप आधार वाटला . त्यांनी कधीही कुटुंबातील व्यक्तीबद्दल वाईट शब्द काढलेले ऐकले नाहीत .एका बंधूंना व्यापारात खोट आली, तसेच एका बंधूंना नवीन कारखाना काढताना संप वगरे याचा सामना करावा लागला, त्यांना आपल्या राहत्या घराचा काही भाग विकार विकावा लागला तरी त्यांनी आनंदाने सर्व गोष्टी केल्या.आयुष्यातील अप्स आणि डाउन्समधून सर्वजण व्यवस्थित बाहेर पडले आणि सर्वांनी घवघवीत यश मिळवले .
एकदा मी त्यांच्या घरी गेलेले नसताना एका कुठल्यातरी त्यांच्या मित्रांची मृत्यू झाला होता. ते कुणाला तरी सांगत होते की तो आता मजेत आहे उर्वशी टकलावर तेल थांपते आहे, रंभा पंख्याने वारा घालत आहे !
घरात ते अतिशय कुटुंबवत्सल प्रेमळ आणि सर्वांना मदत करणारे असे होते तरीपण त्यांचा एक प्रकारचा दरारा सर्व सगळ्यांच्या वर कायम असायचा .
तो साहेबांना एकूण तीन अपत्य .मनीषा ही डॉक्टर असून ते ऑस्ट्रेलियात असते .माधवी ही एक यशस्वी उद्योजक असून ते पुण्यातच असते .मंदार हा महालक्ष्मीचा फाउंड्री अतिशय व्यवस्थितपणे सांभाळत आहे.तसंच मंदारची व्यायाम आणि बॉडीबिल्डिंग ही एक आवडती हॉबी आहे . त्यांच्या नवसह्याद्री सोसायटीतील बंगल्याचं नाव लक्ष्मीछाया हे आहे तेथे मंदार त्याचे कुटूंब त्यांची आई या राहतात .
त्यांची कन्या सौ माधवी लाहिरी , ज्या स्वतः एक यशस्वी महिला उद्योजक आहेत ,यांनी वाडिलांविषयी फार छान माहिती दिली आहे,ती तशीच येथे देतो आहे.
"
लेख वाचले, तुम्ही तुमचे अनुभव आणि माहिती छान लिहिली आहे... परंतु 'मोहन बाबुराव टोळ' या व्यक्तिमतवाची खोली प्रचंड आहे, आजही आम्हाला जाणवते... त्यांच्या संदर्भातल्या प्रत्येक लहान-मोठ्या अनुभवाला त्यांच्या आगळेपणाची आणि मोठेपणाची किनार असायची... ते शब्दांत सांगणे हे अथांग सागराची खोली मापण्याएवढे कठीण... अश्या महाभागाची मुलगी होण्याचे भाग्य मिळणं यात माझी किती जन्मांची पुण्याई आहे हे परमेश्वरासच ठाऊक!
भगवद्गीतेसह असंख्य स्तोत्रे त्यांची मुखोद्गत होती आणि ते शेवटपर्यंत नवीन श्लोक पाठ करत राहिले, त्यामुळे बुद्धी तल्लख होती 80व्या वर्षीही. गीतेचा रोज एक श्लोक सकाळी कागदावर लिहून खिशात ठेवत आणि रात्रीपर्यंत तो पाठ होत असे. अशी 700 श्लोकांची गीता 2 वर्षात केली वयाच्या 45व्या वर्षी! त्यांच्या विषयी खूप संगण्यासारखे आहे, योग आला आपला तर नक्की बोलू... धन्यवाद, तुम्ही वेळ काढून त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहिले यासाठी..."
वाडीलांविषयी त्यांना अमाप आदर आहे,तसेच स्वकर्तुत्वाविषयी अभिमान, त्या म्हणाल्या,
"I am an entrepreneur and I have built my own engg manufacturing company without taking a single rupee from my husband or father or didn't take loan. I take my decisions single handedly and I do not share my problems with others as I find my own solutions. My company is 5.5 years old and I have received 4 awards so far as a Woman Entrepreneur of first generation and creating employment. The latest award was honoured to me as "Udyogini 2020" from West Maharashtra and was handed by Mr. Nitin Gadkari. I am my father's daughter and my own achievements say it all ."
Comments
Post a Comment