माधवराव नानिवडेकर - सुबोध प्रभू
हे माझं नव लिखाण नम्रतापूर्वक सादर
------------------------------
माणसांबरोबर :
बाबा नानीवडेकर
डॉक्टर सुबोध प्रभू, कोल्हापूर
बाबा नानिवडेकर म्हणजे मिलिंदचे वडील. प्रख्यात वकील होते. अतिशय बुद्धिमान. सुदैवाने त्यांचा माझा संबंध हळूहळू दृढ होत गेला त्याच्याबद्दल आज थोडे.
बाबांची माझी पहिली भेट मी सातवीत असताना झाली. मिलिंद त्यावेळी गंगावेशमध्ये राहायचा. समोरच दुधाळी तळ होतं. तिथे ढोकरी मासे पकडायला मी आणि मिलिंद एकदा गेलो होतो. बराच वेळ खेळून मिलिंदच्या वाड्यावर परत आलो तर मिलिंदमध्ये अमुलाग्र बदल! एकदम सज्जन, एकदम सालस मुलात त्याचं रूपांतर झालेलं! हे अचानक कसं घडलं? असा विचार करतोय तर मिलिंद चे आजोबा भेटले. चेहऱ्यावरच करारी मुद्रा होती. मी पण अवघडून गेलो. तेवढ्यात बाबा आले. शिडशिडीत बांधा, मिश्कील डोळे आणि चेहऱ्यावर हास्य.माझी ओळख करून घेतली. वडील काय करतात? विचारल. "एलआयसी मध्ये आहेत* मी उत्तर दिलं. बाबांनी लगेच एलआयसीचे बोधचिन्ह हाताने तयार करून "म्हणजे लिव्ह इन कम्फर्ट" असा जोक मारला. त्याकाळी बँकेतली आणि एल आय सी नोकरी म्हणजे आरामाची समजली जायची. मला थोडं सात्विक संताप आला. मी म्हटलं "वडील खूप काम करतात. तेव्हा पैसे मिळतात. आराम करायला जात नाहीत" मग बाबा म्हटले "अरे विमा केला की आपल्या नंतर आपल्या लोकांची चिंता नाही म्हणून लिव इन कम्फर्ट" बाबा निघून गेले. ही माझी आणि त्यांची पहिली ओळख. सातवी मध्ये मला स्कॉलरशिप मिळाली. मिलिंदला ही मिळाली. तेव्हा एकदा घरी गेलो असताना त्यांनी कौतुक केलं होतं, ते एक एवढ आठवत.
ते एक प्रख्यात आणि अतिशय बुद्धिमान वकील आहेत एवढं ऐकून होतो. पुढची भेट बारावीचा रिझल्टनंतर झाली. मला मेडिकलला ऍडमिशन मिळणार होती. मी बाबांचे ऑफिसवर पेढे द्यायला गेलो. बाबा जूनियरला काहीतरी सांगत होते. त्यांनी जोक मारला," ए लेडी विदाऊट ब्रीफ इज ए सॉलिसिटर" मी फसकन हसलो. बाबांनी चमकून बघितलं. मला म्हटलं" काय समजलं तुला?" मग ब्रिफ म्हणजे अंतर्वस्त्र आणि कायदेशीर भाषेत क्लायंटकडून आलेलं एग्रीमेंट आणि सॉलिसिटर म्हणजे व्यवसाय करणारी आणि कायदेशीर भाषेत वकील असा शब्दांचा खेळ आहे, हे मी म्हटलं. बाबांना बरं वाटलं. इंग्रजी बरं आहे की तुझं, ते म्हणाले. एका बुद्धिमान माणसाने आपलं कौतुक केलं म्हणून माझी छाती फुगली. मग माझ्या वडिलांनी मला कसं इंग्लिश शिकवलं. रेन आणि मार्टीन मधून मी व्याकरण कसं शिकलो, मी बाहेरची पुस्तक कशी वाचतो, हे उगाच सांगितलं. ते पोरवय होतं. बाबांनी ऐकून घेतल. "वकील होतोस काय? तुला शिकवतो बरोबर" बाबांनी हा प्रश्न विचारला. मी ठामपणे नाही म्हटलं.
नंतर बरीच वर्ष आम्ही एकमेकाला भेटलो नव्हतो. माझं वैद्यकीय शिक्षण चालू होत. मी कोल्हापुरात नव्हतो. परत आल्यानंतर काही डॉक्टर मित्रांच्या कायदेविषयक सल्ला-मसलतीसाठी बाबांकडे जाण्याचा योग आला आणि जो काय ऋणानुबंध जुळला तो शेवटपर्यंत!
बाबा म्हणजे एक वल्ली होते. जेवढे ते अजब तेवढेच त्यांचे ऑफिसही अजब होते. जुन्या वाड्यात जिना चढून गेल्यानंतर एक लांबलचक खोली होती. त्याला मी बाबांचा दरबार म्हणायचो. अगदी चमत्कारिक इंटेरियर त्याचं होतं. बाबा पूर्वेकडे तोंड करून बसायचे. त्याच्या शेजारी एक पुरातन लाकडी आरामखुर्ची. त्याची पाठ अशा विचित्र आकाराची होती की त्याच्यावर पाठ टेकली की झोप यायची. मी जाडा असल्यामुळे या खुर्चीत बसलो की लवकर उठणं जमायचं नाही. हे बाबांच्या लक्षात आल्यावर दरवेळी मला मुद्दाम त्याच खुर्चीत बसायला आग्रह करायचे. गंमत पहायचे. समोर कपाटात ऑल इंडिया रिपोर्ट आणि इतर कायद्याची पुस्तके. डाव्या भिंतीलगत सात-आठ खुर्च्या. एकदम समोरच्या चार खुर्च्या. या खुर्च्यांची ही गंमत होती. दोन चार खुर्च्या प्लास्टिकच्या, दोन लाकडी, दोन संस्थानी काळातल्या असा मामला होता. अक्षरशा दरबार असायचा. म्हणजे बाबा राजे आणि खुर्च्यावर बसलेले आम्ही दरबारी! दरबारात कोण नसायचं? शेजारच्या खुर्चीत गगनबावड्याचं पाटील 'सून नांदत नाही' म्हणून तक्रार घेऊन आलेला असायचा. तर पलीकडच्या खुर्चीत बाबांच्या शेतातला मनुष्य शेतसारा द्या म्हणून रक्कम घ्यायला आलेला असायचा. समोर कोणतरी शिक्षिका 'मुख्याध्यापक त्रास देतो' ही तक्रार घेऊन आलेले असायची आणि तिच्या शेजारी कोणीतरी सरकारी खात्यातल्या इंजिनियर बदली टाळायला आलेला असायचा. त्यात आम्ही डॉक्टर बसलेलो असायचो. सब घोडे बारा टक्के याप्रमाणे बाबांच्या दरबारात भेदभाव नव्हता!!
"पाटील सुनेला सोडचिठ्ठी द्यायचं बघू नका. जुळवून घ्या आणि परत आणा. नाहीतर सासूने अन्याय केला, हुंड्यासाठी छळ केला म्हणून तिने तक्रार केली तर तुम्हाला डबे पोचवायला गावाकडच्या माणसाना यायला लागेल तुरुंगात" शिक्षिकेला "मुख्याध्यापकांनी मानसिक त्रास दिला म्हणजे काय? त्यांनी काही गैरवर्तन केले तर सांगा. मग आपण अधिक कलमे लावू. म्हणजे कार्यालयीन वेळेनंतर एकटेच थांबवून घेतले का? तसं सांगा" बाबा म्हणायचे" इंजिनिअर साहेब कोल्हापूरच्या खुर्चीला चिकटून राहता आहात. जा की साताऱ्याला दोन वर्ष. एक वर्ष गेल्यानंतर तब्येत बिघडली म्हणून सर्टिफिकेट देऊन आणूया की परत. तुमचे सीनियर इंजिनियर आमच्या ओळखीचेच आहेत. त्यांचा लफडं मीच मिटवलं होतं. तेव्हा एक वर्षांनी त्यांना सांगू. आता मात्र बदली करून घ्या" फारच नाजूक प्रकरण असेल तर "शेवटी सगळे गेल्यानंतर बघू" असं बाबांचं चारी दिशेला मार्गदर्शन चालू असे. आम्ही डॉक्टर मंडळी अंग चोरून बसायचो. आणि हे चालू असताना मध्येच जूनियर्सना काहीतरी सांगणार, उद्याच्या कोर्टाच्या डायरी बघणार, आलेले फोन घेणार, फोनवरून कोणाचीतरी मापं काढणार. सगळं सुखनैव चालू असायचं. बाबा खरच मैफिलीचे स्टार होते.
आमचा नंबर शेवटी लागायचा. सगळे गेल्यानंतर बाबा म्हणायचे "थांबा सोळंकी मधून आईस्क्रीम मागवतो. नको नको म्हटलं तरी बाबा स्वखर्चाने आम्हाला आईस्क्रीम द्यायचे. वर "चमचे जास्त पाठव. भारतात चमच्यांना कमी नाही" हा जोक ठरलेला! डॉक्टरांना संध्याकाळी कन्सल्टींग असायची. मग ती संपून त्यांच्याकडे जायचं म्हणजे रात्रीचे नऊ साडेनऊ व्हायचे.
एकदा बाबांना म्हटलं ”बाबा लोक आपली खाजगी दुःख, तक्रारी घेऊन येतात. असं सगळ्यांसमोर प्रत्येकाची कोडी उलगडून टाकली तर त्यांना अस्वस्थ होत असेल. कोणाला आपले कमतरता, अडचणी इतरांच्या समोर उघडाव्यात असे वाटत ?तुम्ही एक चेंबर का बनवत नाही? आत क्लायंट ही मोकळेपणे बोलू शकेल, तुम्हालाही बरं" मी असे म्हणताच बाबा म्हणाले "डॉक्टरांकडे, वकिलांकडे काय लपवून चालत नाही. पॅन्ट काढावीच लागते. त्याच्याशिवाय दुखणं नक्की कुठे आहे ते कसं कळणार? इलाज योग्य कसा होणार?" याला मी उत्तर दिलं बाबा डॉक्टरांकडे पेशंट काय वेटिंग रूममध्ये पॅन्ट काढत नाहीत. डॉक्टर आधी त्यांची माहिती घेतात. तपासणीसाठी आणखीन दुसऱ्या जागी नेतात. पडदा ओढून घेतात. मग तपासणी करतात. तुमचं सर्व सर्व एकदम खुल्लमखुल्ला." बाबा हसले. म्हणाले "नाजूक भानगडी, घटस्पोट अशांसाठी मी वैयक्तिक वेळ देतो. त्यांच्या घरी जातो. बाकी सातबाराचे उतारे, सून नांदत नाही, प्रेम विवाह यासाठी कसली आलीये प्रायव्हसी."
मी थोडीशी तक्रार करताच बाबांनी आम्हाला घरी बोलवायला सुरुवात केली. हे तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखं झालं. म्हणजे आम्ही रुग्णसेवा करून जेवून वगैरे बाबांच्या घरी जायचो. तिथ हॉलमध्ये बाबा चर्चा करायचे. मग त्यात राजकारण, कोल्हापुरी रंगेल किस्से , बाबांच्या नकला सगळं काही चालू असायचं. घरची इतर माणसं वाट बघून कंटाळून जात. कधी एकदा आम्ही टळतो याकडे घरची माणसं कपाळावर आठ्या घालुन बघत. त्याच्यानंतर मग जोक्स. बाबा दोन किस्से सांगायचे. मग मला पण जोर यायचा. हे चुकीचं होतं हे कळायचं नाही. बाबांनी सांगितलेल्या विषयावर मी किस्सा सांगायचं. त्यावर बाबांचा परत. असा क्रम अकरा सव्वाअकरा रात्रीपर्यंत चालायचा. माणसं ताटकळून कंटाळायचे. मला एकदा चांगल आठवत. निरोप घ्यायला म्हणून दरवाजापर्यंत फाटक बंद करायला आलेले बाबा आणि मी तिथेच गप्पा मारत होतो. मिलिंदच्या भावाला ते अशक्य झालं. पटकन बाहेर येऊन तो करवादुंन म्हणाला "अरे घरी जा की. किंवा असं कर, बाबांना तुझ्या घरी घेऊन जा. मनसोक्त गप्पा मारा. तुझं लगीन नाही. तेव्हा तुझ्या आई वडिलांना काय होईल तेवढाच त्रास. बाकी कोण नाहीत तुला."
क्षणार्धात मी भानावर आलो. कोणीतरी चाबकाचा फटका पाठीवर उमटावा असं मला वाटलं. किस्से सांगायच्या गप्पिष्ट छंदात एका कुटुंबात मी उगाचच त्रास निर्माण करत होतो, हे लक्षात आल. कसलं बुद्धीच वैभव, जी बुद्धि
समाजानुकूल वर्तन करू शकत नाही, ती काय कामाची? असं वाटलं. त्या रात्री मी झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी सर्व मित्रांना मी सांगितलं "यापुढे मी तुमच्याबरोबर येणार नाही. बाबांच्या घरी जाणं पण आपण कमी केले पाहिजे. त्यांची मुलं सुना यांच्या जीवनात आपण अडथळे निर्माण करतो. आम्हाला ते पटलं. बाबांना पण आम्ही समजावून सांगितलं. मग शनिवार-रविवारी आमच्या मित्रांच्या घरी सकाळी दहा ते बारा आणि चक्क अजेंडा ठेवून म्हणजे हे पॉईंट्स आज चर्चा करू असे ठरवून, आणि त्याप्रमाणे वर्तन करून काही शिस्त आणली. सुदैवाने दोन्ही प्रकरण आमच्या साईडने आणि बाबांच्या बुद्धी कौशल्यामुळे व्यवस्थित मनासारखी निकाल देती झाली.
माणूस चुकांमधून शिकतो तसं मी त्यावेळी शिकलो. बाबांसारख मन मोकळं, उत्साही, अनिर्बंध जगायचं नाही. कितीही जवळचा मित्र असला तरी आपल्या घरच्यांना तो त्रासदायक ठरणार नाही ना हे पाहायचं. तसा मी व्यवस्थित होतो पण हे शिकल्यानंतर मी आणखीनच आखीव-रेखीव बनलो. ज्याचा मला पुढे परदेशात सहा वर्ष संशोधन करताना, तिथल्या लोकांच्या कुटुंबासोबत राहताना झाला, हे बाबांचे उपकारच!l
बाबा महामिश्कील होते. उत्तम नकला करायचे. निळू फुले आणि दारू पिलेला माणूस हे त्यांचे फेवरेट आईटम. कधीकधी फोनवरून कोणाला दारू पिलेल्या आवाजात उत्तर देत. ते बहुश्रुत होते. हजरजबाबी होते. त्यामुळे लोकात प्रिय होते. बाबांमध्ये एक लहान मूल दडलेलं होतं. बाबांना आइस्क्रीम आणि चॉकलेट प्रचंड आवडायच. अगदी लहान मुलासारखे कधीही, कुठेही, कितीही खायला तयार! त्यांच्या मनातील मुलाला कधी काय सुचेल आणि काय करतील याचा नेम नसे!
एकदा सकाळीच आठ वाजता आमच्या घरी आले. माझे वडील देवाची पुजा करत होते. आईने बाबांसाठी चहा आणला. बाबा काय येणं केलंत? मी विचारलं. "तुझ्याकडे नाही. आईकडे काम आहे" बाबा म्हणाले. मग आई अत्यंत आदराने बाबांना म्हणालीं "कसलं काम?" बाबा उत्तरले" तुमचा प्रश्न मी सोडवून टाकला. मुलाच्या लग्नाची काळजी होती ना? मी सुंदर स्थळ आणले. मुलगी देखणी, सिनेमा नटी सारखी, इंग्लिश काय फाडफाड बोलते, शिवाय प्रचंड श्रीमंत! सुबोधने एकही पैसा न कमावता जन्मभर संशोधन केलं तरी चालण्यासारख आहे. शिवाय ब्राम्हण जातीची" माझ्या लक्षात आलं. बाबांचा काहीतरी गंमत करण्याचा विचार असणार. आई आपली बिचारी. म्हणाली "तुम्ही बघितले ना? तुम्हाला सुबोधचा स्वभाव माहिती आहे. मग योग्य असली की झालं." बाबांनी भर घातली "फक्त एक प्रॉब्लेम आहे. थोडी जाड आहे आणि मराठी नाही." "आमचा सुबोध कुठे सडपातळ आहे? आणि भाषेचे म्हणाल तर दोघांचं पटलं म्हणजे झालं. बाकी काय आपल्याला करायचं?" आईने भाबडेपणाने उत्तर दिलं. बाबा म्हटले "मी बोलणे करू?" आई म्हणाली "मुलगी कोण?" बाबा उत्तरले." जयललिता दक्षिणात्य नटी आहे." आम्ही सगळेच हसत सुटलो. नंतर म्हणाले "ती जर नको असेल तर एकदम साधी, पायात स्लीपर घालणारी, खादीची वस्त्र वापरणारी ,मेकअप न करणारी मुलगी आहे, तिला बघू?" एव्हाना आईच्या लक्षात आलं होतं बाबांची गंमत चालली आहे. आई म्हणाली "कोण ममता काय?" आईसुद्धा त्याकाळात पेपर वाचायची. अर्धा घटका करमणूक करून बाबा नाहीसे झाले. जाता जाता म्हणाले "सकाळीच सुचलं म्हणून तुम्हाला सांगायला आलो" बाबांच्या अशा कीश्यामागे निखळ, निर्विष विचार असायचे. त्यामुळे कोणीच चिडत नसे!
बाबांना युनिफॉर्मबद्दल प्रचंड आकर्षण होते. बाबा स्वतः होमगार्डमध्ये जिल्हा निदेशक होते. एनसीसी सर्टिफिकेट मिळवलेले होते. कोणी सैन्याधिकारी, पोलिस अधिकाऱ्याला बाबा ताठ उभे राहून अभिवादन करत. माझ्या डॉक्टर रावराणे मित्राचे बंधू लेफ्टनंट कर्नल होते. एकदा त्यांची ओळख करून दिली. बाबा त्यांच्या वडिलांना ओळखत होते. एकदम सरळ कडक उभे राहून बाबांनी त्यांना सॅल्युट मारला. कर्नल साहेबांना कसेसेच झाले. म्हटले "मी युनिफॉर्ममध्ये नाही. तुम्हीही युनिफॉर्ममध्ये नाही. बरोबर नाही सॅल्यूट करणे" यावर बाबा उत्तरले "तुम्ही जी देशाची सेवा करताय त्याच्याबद्दल आहे हा स्यालुत". एकदा कोल्हापुरात लष्कर प्रमुख एका चौकाचे उद्घाटन करायला आले होते. तो चौक कोल्हापूरच्या एका हुतात्मा लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने बनवला होता. त्यावेळी लष्कर प्रमुखाच्या सन्मानार्थ टेरिटोरियल आर्मीमध्ये, 108 मराठा इन्फंट्री टी ए इथे पार्टी ठेवली होती. बाबांना निमंत्रण होते. बाबांनी
लष्करप्रमुखासोबत फोटो काढून घेतला. मोठ्या अभिमानाने तो सर्वांना दाखवायचे. मला वाटतं एक नानिवडेकर 1965 च्या भारत-पाक युद्धात हुतात्मा झाले होते. बाबांना त्यांचाही अभिमान होता. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे या देशात फक्त लष्करच देशप्रेमी आहे, बाकी सर्व पक्षांचे सर्व राजकारणी देश विकून खातील. आणि हे सांगताना रसवंतीला विशेष बहर येऊन बाबा शेलकी विशेषणे वापरत.
बाबा निर्भीड होते. कोणाचाही अचूक शब्दात लेखाजोखा मांडायचे. एक कामगार कोर्टाचे न्यायाधीश होते. आमचे पेशंट होते. एकदा चुकून मी म्हटलं" ते बरेच सभ्य आणि नॉन करप्ट वाटतात." यावर बाबांचे उत्तर होतं "ही इज टू इनकॉम्पितंत टू बी
करप्त. जराजरी धाडस असतं तर करप्शन केलं असतं"
बाबा फिजिकली फिट होते. संध्याकाळी रंकाळ्यावर फेरी मारायचे. इतक्या वेगात ताडताड चालायचे की लोकांना धाप लागे. प्रकृती शेवटपर्यंत शिडशिडीत होती. त्यामुळे कोणी जाडा दिसला की त्याचं कसं होणार? याची चिंता करायचे. बाबांच्या कारमध्ये बसणे हासुद्धा अनुभव असायचां. रस्त्यावरच्या सगळ्या ट्रॅफिकला अक्षरशः शिव्या घालत बाबा ड्रायव्हिंग
करायचे." तो बघ तो आला वनवे मधून. आईवडिलांचे पैसे उधळतो आहे मोटरसायकलवर" " तो बघ तो गेला रॉंग साईडने ओव्हरटेक करून. कोणी याला लायसन्स दिले" ड्रायव्हिंग करता करता बाबांची अखंड कॉमेंट्री चालू असायची. विशेषतः दुचाकीवरील मुलींच वाहन चालवणे त्यांना अस्वस्थ करायचं.' कशी ओढणी सोडून बसली आहे? अडकेल की चाकात" बाबा म्हणायचे. इतकेच नव्हे तर स्वतः अशा दुचाकीस्वाराच्याजवळ जाऊन समज देत. बाबांची तळमळ, सात्विकता आणि प्रश्नामागची मानसिकता लक्षात घेतं कोणीच त्यांना
दूरूत्तर करत नसे. कोल्हापुरात हे कठीणच, क्वचितच घडणाऱ्! कोणी ट्रॅफिकमध्ये सूचना दिली तर" तुमच्या पिताश्रींच् काय जातंय? जावा की बाबा सरळ! न शिकवता फुटायचं बघा" असं उलट उत्तर येण्याची दाट शक्यता!
प्रत्येक व्यक्ती गुणदोषांनी बनलेली असते. बाबांचा सर्वात मोठा दोष म्हणजे आपल्या कामाचे पैसे मागताना भिडस्तपणा! एरवी जिभेवर नाचणारी सरस्वती, कामाचे पैसे मागायची वेळ आली की जिभेवरून मुक्काम हलवून जणू वनवासात जाई.
तर सांगत काय होतो?.... बाबा आपल्या कामाचे पैसे मागायला भीडस्त. लोक याचा गैरफायदा उठवतील यात नवल काय? म्हणजे बाबांना परदेशातल्या पारकर पेन किंवा फ्रेंच सेंट भेट देऊन लक्षावधी रुपयांची कामं पूर्वी लोकांनी करून घेतलीत हे ऐकून होतो. पण प्रत्यक्ष बघितल्यावर खात्री पटली.
माझा एक मध्यमवर्गीय मित्र होता. वडील त्याचे बँकेत
होते. ते अकस्मात निधन झाल्यावर मित्राला त्याच बँकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. त्यांचा ताराबाई पार्कमध सत्तरीच्या दशकात घेतलेला पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट होता. त्यांच्या शेजारी एक राजकीय वजन ,समाजात प्रतिष्ठा असलेले व्यक्तिमत्व रहायचे. ते सरकारी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. त्यांनी हळूहळू या दुर्लक्षित प्लॉटवर अतिक्रमण करून दीड-दोन हजार फूट जागा बळकावली. म्हणजे गॅरेज बनवून, जुने सामान वगैरे टाकून. मित्राला घर बांधण्याची इच्छा झाली तर प्लॉट एक चतुर्थांश गायब झालेला! माझ्या माध्यमातून त्याने बाबांशी संपर्क साधला. या शेजाऱ्याला तो प्लॉट विकत हवा होता. तेही जुन्या दराने. आपल्या जावयाला तिथे घर करून द्यायचे होते. जावई सुद्धा सरकारी खात्यात एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर. एकंदरीत मामला गडबड होता. बाबांनी सगळी कागदपत्र मागितले, तपासले. बाजू माझ्या मित्राची होती. बाबांनी केस घेतली. कुठलीही रक्कम सुरुवातीला न घेता बाबांनी केस लढवायला सुरुवात केली. अर्ज टायपिंग झेरॉक्स वगैरे करण्याचा खर्चसुद्धा बाबाच करायचे. कारण का? तर मित्र एकटा आहे, बँकेत क्लार्क आहे, नऊ ते सहा बिझी असतो, त्याला ही धावपळ करता येणार नाही!! 2--4 तारखा झाल्यानंतर शेजाराच्या लक्षात आलं की केस आपल्याविरुद्ध जाणार. पेपरात वगैरे बातमी येऊन अप्रतिष्ठा होणार. त्याने बाबांना तडजोडीचा मार्ग सुचविण्यास सांगितला. बाबांनाही तेच हवं होतं .तेव्हा तडजोडही ठरली. म्हणजे जो भाग आक्रमित केलेला आहे त्यात आणखीन भर घालून निमा प्लॉट शेजाऱ्याला विकायचा. ते पैसे घेऊन उरलेल्या प्लॉटमध्ये मित्राने घर बांधायचे. लागणारे थोडे वाळू सिमेंट सांमान या शेजारच्या कॉन्टॅक्टमध्ये पुरवठा करणाऱ्यांकडून, जावयाच्या इंजिनीरिंग मध्ये स्वस्तात मिळवायचं ,घर बांधायला मदत करायची. स्वस्तात मजूर द्यायचे, वगैरे....
जमिनीची केस पुढची वीस पंचवीस वर्षे चालली असती. दोन्ही बाजूंना मान्य होण्यासारखा तोडगा बाबांनी काढला होता. माझ्या मित्राला शेजाऱ्यांशी पंगा घेण परवडणार नव्हतंच. यथावकाश कायदेशीररित्या तडजोड झाली. मित्राला पैसे मिळाले. घर बांधायला मदत झाली. बाबांनी केलेल्या तडजोडीचे व केस चालवण्याचे पैसे मित्राने देणे अपेक्षित होते. मी त्याला दोनदा आठवण केली. तेव्हा अतिशय उत्साहाने येऊन अगदी अनुनासिक भोळ्या स्वरात तो म्हणाला "दिले ह बाबांचे पैसे" मी विचारलं किती दिलेस बाबा? तर म्हटला 3000" मी थक्क झालो. आजच्या किंमती प्रमाणे चाळीस-पन्नास लाख किमतीचा प्लॉट तो सोडवून मिळाला. निम्मे प्लॉटचे पैसे मिळाले. घर बांधायला मजूर वगैरे अत्यंत स्वस्तात मिळाले. शेजाऱ्यांशी भांडण टळलं आणि कन्सल्टिंग फक्त तीन हजार रुपये?? झेरॉक्स करायलाच हजार रुपये लागले असतील.
मी अस्वस्थ होऊन बाबांकडे गेलो." काय बाबा? तुम्ही रक्कम सांगायची नाही का व्यवस्थित?" मी व्यथित होऊन विचारलं. बाबांनी उत्तर दिलं "तो त्याच्या अकले प्रमाणे वागला. मी माझ्या संस्काराप्रमाणे वागलो. मी आजपर्यंत कोणापुढे हात पसरला नाही." मी निरुत्तर झालो. बाबांच्या अशा स्वभावाचा फायदा लोक घ्यायचे हे मात्र नक्की.
'चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा' कव्वाली प्रसिद्ध आहे. बाबांचा ढलता सूरज पाहण्याची वेळही माझ्यावर आली. बाबा कोर्टात युक्तिवाद करताना दोनदा ब्लँक झाले. बोलायचं बंद! न्यायाधीशांनी सहानुभूतीपूर्वक कोर्ट स्थगित करून बाबांना चेंबरमध्ये बोलवलं. वैद्यकीय तपासणी करून घ्या सांगितलं. पण बाबांचे हजार डॉक्टर ओळखीचे. कोणाकडेही ते कुठलाही सल्ला मागत. आमच्याकडेही आले होते. स्कॅन बरा होता. डायबेटिस, ब्लडप्रेशर कोलेस्ट्रॉल नव्हतं.' बाबा बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. नियमित तपासणी केली पाहिजे." आम्ही सुचवलं. बाबा गायब! पुन्हा लवकर आलेच नाहीत. कोर्टासमोर माझ्या मित्राचं ऑफिस होतं. बाबा एकदा फुटपाथवर विमनस्क अवस्थेत उभे असलेले त्याला दिसले. तो त्यांच्या जवळ गेला. काय बाबा? म्हणून विचारलं. बाबा म्हणाले "कुठे जायचं? घरी की मित्राकडे याचा विचार करतोय." बाबा महाबुद्धिमान होते. अशा माणसांना कदाचित संभ्रम होत असेल, त्यांची व्यवधाने खूप, असा माझ्या मित्राने विचार केला. त्याने सहज जाता जाता मला हा किस्सा सांगितला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. स्मृतिभ्रंशांचे लक्षणे नसतील ना? मला काळजी वाटली. मी बाबांना आणि मिलिंदला जाताजाता सुचवलं. पण बाबा 'काही नाही' म्हणून उडवून लावायचे.
पुढील लक्षणे दिसली. बाबा अडखळत बोलायला लागले. एकदा मी कळवळून सांगितले "बाबा हे बरोबर नाही आहे." त्यांनी उत्तर दिलं," माझा डेंटिस्ट मित्र आहे त्याने सांगितले की दातामुळे होते. सगळे दात काढून झाले की कवळी बसवली मी पुन्हा हा खणखणीत बोलायला तयार! त्याने मला गॅरंटी दिली" आता एक दंततज्ञ मेंदू विषयक सल्ला देतो त्याला मी काय करणार? बाबांना औषधांची खूप आवड. कुठलाही डॉक्टरला सल्ला विचारायचे. नंतर एकदा म्हणाले "एका ऑर्थोपेदिशियनने मला सल्ला दिला. पिंपळाच्या पानावर मध आणि थोडा चुना ठेवून ते पान चाटायचे म्हणजे अडखळणे कमी होईल." मी मनातल्या मनात बाबांना आणि त्या ऑर्थोपेदिशियनला कोपरापासून नमस्कार केला.
एकदा बाबा आमच्या ओपीडीतच अकस्मात आले. मला आणि माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना म्हणाले "माझी झोप कमी झाली आहे. चिंता वाढली आहे. मनात सतत विचार येतात. काहीतरी औषध द्या." माझे ज्येष्ठ सहकारी मोठे तज्ञ होते. "ठीक आहे. औषध देऊया" म्हटले. मी पटकन मान हलवली. त्यांच्या ते लक्षात आले. ते म्हणाले "बाबा आता ओपीडी जोरात चालली आहे. तुम्ही सावकाश या. आपण तुम्हाला व्यवस्थित तपासून मग औषध देऊया" बाबा मान हलवून बाहेर पडले. माझ्या वरिष्ठांनी विचारलं "तू मान का हलवली? तुला काय त्या कुटुंबातले ताण-तणाव माहिती आहेत का? मी म्हटलं "ताण-तणाव सोडा. बाबा याच कम्प्लेंट घेऊन चार डॉक्टरांकडून वेगवेगळी झोपेची औषधे घेतात. आपली त्याच्यात भर
टाकणे योग्य नाही. शिवाय ही चिंता नसून कुटुंबात व्यवस्थित सगळे चालू आहे. ही अल्झायमर्स किंवा फ्रोंतो टेंपोरल डिमेन्शियाची लक्षण आहेत. मग मी त्यांना इतर प्रसंग म्हणजे फुटपाथवर भांबावून उभ राहणे, बोलणं अस्पष्ट होणे, कोर्टात युक्तिवाद थांबणे, ही लक्षणे सांगितली. आम्हाला दोघांनाही चिंता वाटली. एवढ्या समर्थ बुद्धिमान माणसाला देवाने स्मृतीभ्रंश द्यावा? बाबा कोल्हापुरातल्या दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन आले. मिलिंदने त्यांना
पुण्यातल्या न्यूरोलॉजिस्ट कडे सुद्धा नेले होते. पण या आजारावर औषधे फार परिणामकारक नाहीत.
आम्ही दोघां डॉक्टरांनी बाबाबद्दल विचार केला. कारण क्लीनिशियन म्हणून आणि त्यांचे मित्र म्हणून आम्हाला काळजी होती. असं का झालं असावं? अशा निर्व्यसनी, दुसरे आजार नसलेल्या, शिडशिडीत, फिजिकली फिट असलेल्या माणसाचं असं का व्हावं?
बाबा उत्साही होते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भयंकर हायपरॲक्टिव असायचे. एकदा एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात वरच्या मजल्यावरून लिफ्टमध्ये गेले. लिफ्ट जुनी होती. लिफ्ट त्या मजल्यावर न पोचताच तिचा दरवाजा उघडला. बाबा लक्ष न देता वर्तमानपत्रातल्या
सहसंपादकाबरोबर जोक मारत सरळ आत गेले. तिथं कॅरेज नव्हतच! सरळ खालच्या पोकळीत पंधरा फुटावर बाबा पडले. डोक्याला फार लागले नाही. आमच्याकडे लगेच आले. तपासणी केली स्कॅन केल. पण थोडी तरी मेंदूअंतर्गत जखम झाली असणार. एकदा आपल्या पुतण्याच्या लहान मुलीला बघण्यासाठी म्हणून घाईघाईने इकडे तिकडे न बघता घराबाहेर पडले. आणि एका टेलिफोनसाठी खणलेल्या खड्ड्यात पडले. तेव्हाही आमच्याकडे आले होते. आम्हाला असं वाटतं की अशा छोट्या इंजुरी नंतर काही डेथ जीन्स मेंदूमध्ये कार्यरत होतात. त्यामुळे मेंदू झीजणे वाढते, मेंदूचे कार्य
ढासळत जाते. अर्थात ही केवळ तार्किक बाब. ट्रीटमेंट अशी नव्हतीच!
2007 ला मी फ्रान्सला गेलो. वर्षातून एकदा कोल्हापूरला यायचो. एकदा बाबांनी 'नवे ऑफिस पाहायला ये' सांगितलं. बाबांचा वाडा पाडला होता. नवे ऑफीस त्यांनी जवळच एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये थाटले होते. मी गेलो. अंधाऱ्या बेसमेंटमध्ये चार पायऱ्या उतरून आत गेलो. चित्र पाहून अक्षरशः गलबलून गेलो. 30 बाय 30 चा हॉल. बाबांनी थोडं ऐकून, एक चेंबर स्वरूप कोपरा तयार केला होता. उरलेल्या जागेत एकासारख्या खुर्च्या. कपाट. यांच्या पलीकडे जूनियर बसण्याची जागा. अंधार असला तरी सगळं वरकरणी ठीक होतं. एक विचित्र गोष्ट बघितली. बाबा ज्या खुर्चीवर बसले होते, त्याच्याबरोबर वर मोठा ॲल्युमिनियमचं नळकांडे वळत वळत बेसमेंटला असलेल्या व्हेंटिलेटर कडे नेले होते. "बाबा हा ॲनाकोंडा इथे काय करतोय?" मी विचारलं. बाबा म्हंटले 1-2 फॅन बसवलेत आत. माझं डोकं थंड राहत." "एयर कंडीशन नाही का करायचं?"मी विचारलं. बाबा म्हटले "क्लायंट्स डोकं गरम असल तरी चालेल माझा थंड हव"
पण खूप उदास वाटत होतं. मैफिलीचा राजा आता एकटा होता. अशिलांची संख्या खूप रोडावली होती. ज्युनियर वकील गायब झाले होते. एकटेच बाबा त्यांच्या खुर्चीत बसले होते, त्याच्या शेजारी मी! मागे वर्णन केलेली पुराणकालीन आरामखुर्ची. "समोर बस. नवीन खुर्च्या आहेत" बाबा म्हणाले. मी मुद्दामहून त्या परिचित विचित्र आरामखुर्चीत बसलो. बाबांनी हात हातात घेतला. अगदी भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. दहा-बारा वर्षांपूर्वी असच आम्ही जवळजवळ बसायचो. "कसं चाललंय? फ्रान्समध्ये मैत्रीण मिळाली का?" बाबांनी नेहमीच्या विनोदी पद्धतीने विचारले." मी माकडांवर संशोधन करतो बाबा" "मग कोणतरी माकडीण मैत्रीण कर" बाबांनी हजरजबाबी उत्तर दिले. त्यांच्यातील विनोदाची वृत्ती अजून शाबूत आहे हे पाहून मला बरं वाटलं. पण बाकीच्या बाबतीत काही खरं नव्हतं. विस्मरण होतं. बोलताना अडखळणे वाढलं होतं. त्याच त्याच गोष्टी पुन्हा सांगत होते." चल तुला खोली दाखवतो" बाबा मला बेसमेंट मध्येच असलेल्या खोलीत घेऊन गेले. आत टॉयलेट, पलंग, फ्रीज होत." कधीकधी एकटाच बसतो इथे मी. माझ्या समाधीची गुंफा" बाबा म्हणाले. काळजावर चरा ओढत ते वाक्य गेल. सतत माणसांच्या गर्दीत असणारा मनुष्य एवढा एकटा ?निरोप घेऊन मी बाहेर पडलो. रंकाळ्यावर गेलो. बराच वेळ कट्ट्यावर बसून राहिलो. सूर्य मावळेपर्यंत! एक बुद्धिमान सूर्य माझ्यासमोर मावळत चालला होता आणि मलाच काय, कोणालाही त्याविषयी काय करता येत नव्हतं! याची उदासीनता मला ग्रासत गेली.
2014 ला मी भारतात परत आलो. तोपर्यंत बाबा पूर्ण ग्रस्त झाले होते. मिलिंद त्याची पत्नी, इतर भावंडं सर्वजण त्यांची एखाद्या बाळाप्रमाणे काळजी घेत होते. बाबांचं बोलणं बंद झालं होतं. नेहमीचे अंघोळ वगैरे विधीसुद्धा कोणीतरी दुसरे जण मदत करून पार पाडायचे. जेवताना बसले तर मनात असेल तर खायचे. नाहीतर उठून जायचे. मेंदूचं कार्य बिघडलं तरी आपल्याला पूर्वीसारख जगता येत नाही याची आत कुठेतरी जाणीव असायची. डोळ्यातल्या रागातून तो असहाय्य भाव ते व्यक्त करायचे. बोलणं थांबलं होतं. शरीर घट्ट झालं होतं. दिवसभर झोपून असायचे.
मिलिंद मात्र आपल्या बायको मुलांसह त्यांच्या सेवेत सतत व्यस्त असायचा. मिलिंद कारखान्यासाठी बाहेर गेला तर त्याची पत्नी, दोन मुलांबरोबर बाबा हे तिसरे मुल सांभाळायची. त्यांना अंघोळ घालायची. कपडे बदलायची. त्यांना आवडणारे पदार्थ करायची. हे सगळं पाहून मी आतून सुखी व्हायचो. आपल्या सुदृढ वृद्ध आईबापांना शेवटच्या क्षणी टाळणारे असंख्य माणसे मी पाहिली होती. पण अपंग बनलेल्या वृद्ध पित्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारे मुल व सून विरळाच! 'देव त्यांना पुण्य देवो' मी मनोमन प्रार्थना करायचो.
एक प्रसंग माझ्या मनात ठसा उमटवून आहे. बाबांना नीट चालता येत नसलं तरी मिलिंद त्यांना इकडे तिकडे न्यायचा. तेवढेच त्यांना बरं वाटावं म्हणून! एकदा बेंगलोरवरून मी कोल्हापूरला आलो असताना मिलिंद बाबांना घेऊन, माझ्या बरोबर गोकुळ हॉटेलला गेला. गोकुळ मधले सगळे बाबांना अर्थात ओळखत होतेच. आम्ही टेबलावर बसलो. बाबा काय खाणार? मिलिंदन विचारलं. बाबा उत्तर देतच नव्हते. इकडे तिकडे पाहत होते. शेवटी मिलिंदन विचारलं शिरा खाणार? बाबा हसल्यासारखे वाटले. मिलिंदने त्यांना स्वतःच्या हाताने शिरा भरवला. बाबांच्या डोळ्यात हसू होतं. शेजारपाजारचे लोक आमच्याकडे कुतुहलाने बघत होते. पण मिलिंदला, मला त्याचं काहीच वाटत नव्हतं. पितृऋणातून मुक्त होता येत नाही हे मिलिंदला माहिती होतं. काही क्षण का होईना पित्याच्या चेहर्यावर हास्य फुलंवू शकलो, याचं खूप समाधान मिलिंदच्या देहबोलीत मला दिसत होतं......
मिलिंद आणि त्यांच्या बहिण भावंडांनी शेवटच्या क्षणी बाबांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये न्ययचं नाही, असं माझ्याशी चर्चा करून ठरवलं होतं. त्याप्रमाणे शेवटी आम्ही त्यांना घरीच नर्स उपलब्ध करून दिली. थोडेसेच उपचार जे डॉक्टर म्हणून करणे आवश्यक असतं, तेवढे दिले. गॅस बंद करावा तसं कोणाची जीवनज्योत तर येत नाही ना मालवता? वैद्यकशास्त्राच्या नीतिमत्तेत बसत नाही आणि मनुष्य म्हणून ते शक्यही नाही!
बाबा गेले. मिलिंदचे काका मला म्हणाले एवढ्या बुद्धिमान भावाचं असं कसं झालं असेल हो? अति वापरल्यामुळे मेंदू झीजून गेला का? मेंदू सुकला म्हणजे काय? त्यांना काय उत्तर देणार ?अल्झायमर कोणाला ही होउ शकतो. त्यावर अजून तरी प्रभावी इलाज नाही एवढेच म्हणून मी वेळ मारून नेली.
बाबांना अनुभवताना मी नकळत शिकत गेलो बालकासारखे उत्स्फूर्त, निष्कलंक चारित्र्याने जगायचं. बाबा कोर्टात वाघ होते. पक्के बेरकी होते. पण आपले नातेवाईक, मित्र या बाबतीत कमालीचे हळवे आणि मृदू. त्यांनी त्रास दिला तरी बाबा उलट वार करत नसत. तेव्हा नातेवाईकांना, मित्रांना गुणदोषांसकट स्वीकारायचं. लोक आणि अफाट वाचन हे सोडले तर बाबांना दुसरे छंद नव्हते. कधी नाट्यसंगीत ऐकलं असेल, कधी सिनेमाला गेले असतील, कधी चित्रप्रदर्शन पाहिले असेल, असं मला वाटत नाही. गगनबावड्याला फार्म हाऊस बांधलं होतं. तिथे चार पाच दिवस निवांत राहिले असतील असं मला वाटत नाही. ते फार्म हाऊस मित्रच जास्त वापरायचे. बाबा सतत घोळक्यात असायचे. कोल्हापूरला, बावड्याला, कुठल्या समारंभात गेल तरी बाबा भोवती वर्तुळ निर्माण व्हायचं. बाबा त्यांचे मॅग्नेट होते.......
पण कदाचित म्हणजे कदाचितच, हे सतत एक्स्टरनर्लिझेशन उपयुक्त ठरत नसेल. काही काळ अगदी स्वतःसाठी काढणे गरजेचे आहे. 'आपुला संवाद आपणाशी' असं व्हायला हव. भोवतालच्या कोलाहलात, गर्दीतून, सतत कर्म करण्याच्या अनावर क्रियेतून, थोड् काही काळतरी बाजूला होऊन चिंतन घडले पाहिजे. इतर खूप छंद पाहिजेत. म्हणजे कदाचित स्मृतीभ्रंश सारखा आजार पूर्णपणे नाही, तर थोडाफार टळू शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटते. गर्दीचा केंद्रबिंदू होण्यापेक्षा निसर्गातल्या अफाट कॅनव्हासवरील एक सूक्ष्म बिंदू होऊन राहावे असं मला वाटतं. आत्मसुखाय, अलिप्त राहिलं पाहिजे हे मी बाबांच्या जीवनाकडे पाहून पुन्हा पुन्हा स्वतःला समजावत राहतो. कारण बाबा तर्कशुद्ध असले तरी ते कोर्टात! वैयक्तिक जीवनात भयंकर इमोशनल होते. ुसर्याचे दुःख दुसऱ्यांची अडचण जणू स्वतःचीच आहे असे समजून त्यात भावनिकरित्या गुंतून जात. हे फार उत्तम नव्हतं.
बाबा ना हे समजत होतं, नव्हतं मला माहीत नाही. बुद्धिमान मनुष्याला ते कळतही असेल. पण बाबांनी एक जीवन पद्धती स्वीकारली होती. आणि जीवनात इतर क्षेत्रात जसे ते प्रामाणिक राहिले तसेच आपल्या या जीवनमूल्यांशी,
निष्ठांशी प्रतारणा न करता, प्रामाणिक राहिले. हे समजून घेतल्यावर माझे हात आपोआप नमस्कारासाठी जुळतात.
कैवल्य रुपी कैसे जगणे
कोणी ज्याचे त्याचे ठरवणे
आपण कैसे ते मोजणे
काय काम? सुबोध म्हणे
© सुबोध प्रभू
खाली बाबांचे दोन फोटो दिलेत. व्यक्तिमत्व कसे होते यासाठी.
I
Comments
Post a Comment