मनोहरमामा
मनोहरमामा
मनोहरमामा माझा सर्वात मोठा मामा . लहानपणी खूप बाळसेदारआणि देखणा होता आणि त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे मुलं शांत झोपावीत म्हणून दुधात थोडंसं अफू घालून त्यांना सांभाळायला ठेवलेल्या बायका झोपवत असत. मनोहरमामाला पण तसं करायचे असं सांगतात. मनोहरमामाचं आणि आमच्या तात्याआजोबांचं अजिबात पटायचं नाही. त्याला विचारलं असता तो म्हणायचा की,‘‘कुठल्या मोठ्या मुलाचं आणि वडलांचं पटलं असेल ते मला दाखवा,’’ आणि ते काही अंशी खरंच होतं. इचलकरंजीला एकत्र कुटुंबात सर्व जण बरेच वर्षं राहत असत. मनोहरमामाचं काम म्हणजे तो दर रविवारी भाजी घेऊन येत असे. भाजी इतकी असे की दोन-चार गडी माणसं दहा-वीस टोपल्या भरून घेऊन येत असे. त्याला भाजी आणायची फार आवड होती.मी नंतर कधीच कुठेच एवढी भाजी आणलेली बघितलेली नाही.
तसंच आम्ही लहान असताना मुलांना भेळ खायची असेल तर तो भेळीची सगळी गाडीच खरेदी करत असे. त्या माणसाला विचारे की, ‘या सगळ्या गाडीची, मालाची किंमत काय?’ त्या काळी, म्हणजे १९८० साली वगैरे ५०० रुपये; १००० रुपये असं देऊन तो सबंध गाडी बोलावत असे किंवा गारेगार आईस्क्रीमची सबंध गाडी बोलावून ते सगळ्या मुलांना मनसोक्त खायला देणं हा त्याचा आवडता कार्यक्रम होता.
भल्या पहाटे उठून तो चुलीवर गरमगरम पिठलं तयार करायचा आणि बाहेरून पाव आणत असे. त्याच्या हातचं पिठलं-पाव खाणं खूप आनंदाची पर्वणी असायची आणि पिठलं-पाव नंतर मी कधीच खाल्ला नाही. पण तो इतक्या प्रेमाने देत असे की सर्व जण कौतुकाने त्याच्यावर तुटून पडत असत. आजोळी जाऊन पिठलं-पाव खाण्याचं आम्हाला फार अप्रूप होतं.
तसंच दर दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या सुटीत सर्व मुलं जमली की तो आजुबाजूची तीन-चार लाकडं गोळा करून तीन-चार बॅट बनवून देत असे. एकदा एक बॅट जड झाली म्हणून त्याने बॅटवर ठरावीक आकाराची गोल भोकं पाडली होती.
आमची शैलामामी मूळची सांगलीची. तिचे वडील पोस्टमास्तर होते.त्यांच्या लग्नानंतर त्यांना तीन अपत्यं झाली. मेघा ही सगळ्यांत मोठी मुलगी. वर्षा ही त्यानंतरची आणि चित्रा ही सगळ्यांत धाकटी.
मनोहरमामाने मूळ घराच्या बाहेर आपली छोटीशी खोली बांधली होतीआणि त्याला छप्पर वगैरे पत्र्याचं होतं. अतिशय साधी खोली होती; तो काही वर्षं तिथेच राहत असे. त्याचे मित्रमंडळी त्याला भेटायला तिकडेचयेत असत.
जशी सर्वसामान्य जोडप्यांची मिड लाईफमध्ये खूप भांडणं होतात तशी त्याची आणि शैलामामीची खूप भांडणं होत असत. पण तो चिडला की शैलामामीला 'देव तुम्ही असं करा,’ म्हणत असे. म्हणजे आपल्या तोंडातून अपशब्द जाऊ नयेत म्हणून तो ही युक्ती योजत असे.
माझी मुंज पुण्याला आमच्या घरातच झाली होती. आजोबांनी बाहेर मंडप घातला होता. त्यावेळी आमरसाचा बेत केलेला होता. पण मनोहरमामाने बाहेरून गारेगारची एक गाडी बोलावली. गारेगार म्हणजे कांडीवर फ्रूटज्यूस म्हणजेच ऑरेंज वगैरे असं लावून केलेल्या चोखायच्याआईस्क्रीमचा प्रकार होता. सगळी मुलं पळतपळत तिकडे गेली; आणि घरातले सगळे भयंकर भडकले. त्याने ती गाडीच खरेदी केलेली होती. मुलंमात्र त्याच्यावर नेहमीच प्रचंड खूष असत. तो नेहमी बोरगावला जात असे आणि जमिनी खरेदी करत असे. कुठल्याही एका मुलाला बरोबर घेऊन जात असे. तो गेला तेव्हा त्याच्या जवळजवळ पंधरा-वीस जमिनी होत्या.
त्याला पान खायचा एक शौक होता. त्याच्याकडे बॅगमध्ये कायम सुपारी,पानं, अडकित्ता, चुना आणि काही वर्ष किमाम असा सगळा लवाजमा असे. कुठेही बसला तर सातत्याने पान खात असे. तिथून गेल्यानंतर आजुबाजूला सुपारीची खांडकं वगैरे पडलेली असत. त्याच्यावर आमच्या घरात लग्नात द्यायच्या-घ्यायच्या वर्षभराच्या सुपाऱ्या असतात त्या साठत असत; वेगळ्या आणायला लागत नसत.
मोठपणी त्याला ‘कात्री’ असं नाव पडलं होतं. तो एखादी जमीन घेऊन तिथे खड्डा खणून ठेवत असे. त्याचे चुलतभाऊ वगैरे कोणी आलं तर त्यांना दाखवून त्यांच्याकडून पाच हजार रुपये घे असे भरपूर पैसे गोळा करत असे. तसा त्याच्याकडे खूप पैसा होता; पण तो अजिबात दाखवत नसे.त्याची राहणी अतिशय साधी होती. वापरून झालेले सगळे कपडे तो नेहमी काढून ठेवत असे. मग त्यातल्यात्यांत कमी खराब झालेले परत वापरत असे आणि सगळ्यांत शेवटी सगळे कपडे भट्टीला टाकत असे.
असेच लहानपणी त्याचे वडील म्हणजे तात्या आपल्याला शिकायला लावतात म्हणून तो घरातून पळून जात असे; आणि आजोळी पोखल्याला जात असे किंवा धाकट्या काकांकडे-पंडित काकांकडे जाऊन राहत असे.पंडितकाका फक्त खादीचा शर्ट आणि लेंगा घालत असत; आणि त्यांच्या कपाटात एकाच रंगाचे पाच-पन्नास कपडे कायम असत. कुणीही गेलं तरीत्यांना काकांचे कपडे घालून राहायची परवानगी होती. नंतर पश्चाताप झाला म्हणून मनोहरमामा चमनगोटा करून घरी परतत असे.
मनोहरमामा शेवटी किडनीचा आजार होऊन सोलापूरमध्ये असताना गेला.त्याला हॉस्पिटलमध्ये जायची फार भीती वाटत असे. कुणीही आजारी असलं तरी हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणं तो टाळत असे.
त्याच्या तिन्ही मुली मेघा, वर्षा आणि चित्रा आता त्यांच्या त्यांच्या संसारात व्यवस्थितपणे मग्न आहेत. सर्व जणी अतिशय चांगल्या घरात आणि चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. मनोहरमामाने आयुष्यभर काय कामं केली तर-तात्या आजोबांनी त्याला एक फाउंड्री काढून दिली होती. पण त्याला काही त्याच्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. नंतर तो जुन्या मोटारी घेऊन त्या रिपेअर करून विकायचा. त्यात त्याने बऱ्यापैकी पैसे मिळवले असावेत. नंतर त्याने खूप जमिनी घेऊन ठेवल्या. त्या व्यवहारात त्याने खूप पैसे मिळवले असावेत; पण त्याचा पोशाख आणि राहणीमान अतिशय साधं! सर्वांसाठी तो अतिशय प्रेमळ होता. मनोहरमामाला वेगवेगळे गॉगल्स जमा करायचा खूप शौक होता. कुठेही गेला तरी तो एखादागॉगल खरेदी करून वापरत असे. त्याच्याकडे गॉगल्सचं खूप कलेक्शन होतं.
विजया कुलकर्णी
मनोहरमामाची बहीण
मनोहरमामा लहानपणी दिसायला खूपच देखणा होता. त्यामुळे त्याचं नाव ‘मनोहर’ ठेवलं होतं. तसंच त्याने बरीच वर्षं एक पॅटर्न शॉप व्यवस्थित चालवलं होतं.
त्याने आमच्या आईला यड्राव साखर कारखान्याचे काही शेअर्स घेऊन दिले होते. त्यामुळे आईला दोन रुपये किलो दराने पन्नास किलो साखर बरीच वर्षं मिळत असे. तरी ती जाऊन आणणं आणि सगळ्यांना वाटणं हे बरीच वर्षं एक मोठं काम होतं.
आता त्याच्या जन्माकडे बघताना असं वाटतंय की त्याची मॅच्युरिटी लेव्हल खूपच जास्त होती. लोकांना वाटे तो काही काम करत नसे पण कमीत कमी श्रमांमध्ये जास्तीत जास्त पैसा कसा मिळवायचा हे त्याच्या कुशाग्र बुद्धीने ओळखलं होतं.
आता त्याच्याबद्दल आठवतंय की पाव-पिठलं प्रेमाने आग्रह करून वाढायचा, बॅट करून द्यायचा, सुपारी अन् पान खाण्याची सवय, गाड्याच्या-गाड्या खरेदी करून भेळपुरी, आईस्क्रीम वगैरे सर्व मुलांना खाऊ घालतानाचं अखंड प्रेम, सर्व मुलांवरचं त्याचं निर्वाज्य प्रेम, त्याची वीस-पंचवीस टोपल्या एकदम भरून भाजी आणायची पद्धत…
त्याच्या स्मृतीला वंदन करून माझे हे दोन शब्द संपवतो.
Comments
Post a Comment