आठल्ये कुटुंब

 आठल्ये कुटुंब

लहानपणापासूनच आमचा आठल्ये कुटुंबाबरोबर अगदी घनिष्ठ संबंध आला होता. डॉ. सुभाष आठल्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये आमच्या बाबांच्या वर्गात होते. तसंच डॉ. शरद आठल्ये माझ्या काकांच्या अरविंद यांच्या वर्गात होते. त्याचप्रामणे माझे नंतरचे साहेब आणि गॉडफादर टोळ साहेब यांच्या वर्गात होते. पण त्यापेक्षा सगळ्यांत उत्साही आणि जिंदादिल म्हणजे त्यांचे वडील बाबा आठल्ये! हे आमच्या वडिलांचे खास मित्र. ते अनेकदा आमच्या घरी गप्पा मारायला येत असत. पांढरेशुभ्र कपडे, धोतर आणि कॅन्व्हासचे पांढरे पॉलिश केलेले शूज हा त्यांचा पोशाख असे. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असे. ते संघाचे कार्यकर्ते होते.


बाबा आठल्ये मूळचे इस्लामपूरचे. त्यावेळेस ते मुंबईला जाऊन शिकून डॉक्टर झाले. तसंच त्यांनी एक्सरे संदर्भात कोर्स केला. त्यावेळेस एक्सरे टेक्नीक नव्याने आलं होतं. ते त्यातले स्पेशालिस्ट झाले होते. नंतर त्यांनी परत इस्लामपूरला येऊन स्वतः प्रॅक्टिस करायचं ठरवलं. त्यावेळेला इस्लामपूरमध्ये प्रस्थापित झालेले एक डॉक्टर त्यांना विरोध करत होते.

त्यांनी त्यांना सांगितलं, ‘‘तू मुंबईला जा. मी तुला चिठ्ठी देतो. तुला चारशे रुपये पगार मिळेल.’’चारशे रुपये म्हणजे त्यावेळेला खूपच पगार होता !

पण बाबांनी आपण तिथेच व्यवसाय चालू करायचा असा दृढनिश्चय केला आणि त्यांच्यासमोरच आपली स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. त्यांना अनेक प्रकारे त्रास झाला असावा पण संघाच्या व ब्राम्हण लोकांचा पाठिंबा असल्यामुळे ते तगून राहिले आणि पुढे नामांकित डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्धीला आले. नंतर त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यं केली. एक नवीन शाळा सुरू केली. त्यांचा मित्र परिवार अतिशय दांडगा होता.


बाबांना गोष्टी रंगवून रंगवून सांगायची खूप आवड होती. त्यांच्याकडे गोष्टींचा खजिनाही भरपूर होता. मुंबईचे एक प्रसिद्ध डॉक्टर बलिंगा त्यांच्या गोष्ट सांगायचे. एकदा त्यांच्याकडे जेवायला गेलेले असताना  सोन्याच्या ताटल्या, सोन्याच्या वाट्या आणि सोन्याची भांडी असा सगळा सोन्याचा सेट होता. स्वतः डॉक्टर बलिंगा मात्र बनियन आणि पँट घालून सगळ्यांचं स्वागत करत होते. ही गोष्ट बाबा खूप रंगवून सांगत असत.


त्यांना चालायची खूप आवड होती. ते बरेचदा आमच्या घरी चालतच यायचे. त्यांना कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आधी एकदा ते सात हजार पायऱ्या चढून देवळात गेले होते. त्यांचा फिजिकल फिटनेस जबरदस्त होता.


माझ्या मते त्यांचे कशाळकर नावाचे मित्र होते. त्यांचा बुक बायडिंगचा व्यवसाय होता. तेही कधी कधी त्यांच्याबरोबर आमच्याकडे यायचे. एकदा मी त्यांना काहीतरी बायडिंगसाठी देणार होतो. पण आप्पा म्हणाले, ‘‘तुला वेळेवर हवं असेल तर तू दुसऱ्या कोणाकडे तरी दे. जाऊन फक्त गप्पा मारायच्या असतील तर मात्र त्यांच्याकडे दे. कारण त्यांच्याकडून तुला कधी करून मिळेल हे काही सांगता येणार नाही.’’


त्यांच्या पहिल्या पत्नी ह्रदयाच्या झडपेचा काही प्रॉब्लेम किंवा अशा प्रकारचा कुठला तरी रोग होऊन लवकर गेल्या. त्यावेळी ह्या रोगावर इलाज नव्हता. 

त्यांना पाच अपत्ये. डॉ. सुभाष एम.एस. ,  नंतर डॉ. शरद हे रेडिओलॉजिस्ट, नंतर सतीश हे बी ऐस सी! बजाजमध्ये ते खूप वरच्या पोस्टला गेले. ते पेंट टेक्नॉलॉजिस्ट होते. नंतरचे अशोक हे टेक्स्टाइल इंजीनियर. सगळ्यात धाकट्या जयश्री ताई. जयश्रीताईंचे पती भाभा ऑटॉमिक रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या पदावर सायंटिस्ट होते. आता रिटायर्ड आहेत.

बाबांच्या पहिल्या पत्नी लवकर गेल्यानंतर त्यांनी शांताताई यांच्याशी दुसरे लग्न केले. त्या वेळेला त्यांनी ठरवलं की आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही. याच मुलांचा आपण नीट सांभाळ करायचा. त्याप्रमाणे त्यांनी आपला शब्द आणि कर्तव्य पार पाडलं.


बाबा आठल्ये अजून एक गोष्ट नेहमी सांगायचे की एक माणूस खूप श्रीमंत घराण्यात जन्मलेला होता. त्याच्याकडे बरीच इस्टेट, कळशी भरून त्यावेळचे चांदीचे रुपये वगैरे असं होतं. पण त्याचे वडील लवकर गेले. ते गेल्यानंतर त्याला नीट मार्गदर्शन लाभलं नाही. त्याने पाच-दहा वर्षांतच ती सगळी संपत्ती उडवली आणि तो इस्लामपूरला कुठेतरी ड्रायव्हर म्हणून कामाला लागला होता.

ते म्हणायचे वडिलांचे कितीही पैसे असले तरी ते काही आयुष्यभर पुरू शकत नाहीत. स्वतःच्या कष्टाने जे मिळवू तेच कायम पुरतं.


तसंच प्रत्येकाला आयुष्यात एक संधी येते त्यात जर त्याने नीट काम केलं, नीट गुंतवणूक केली तर त्याचं आयुष्य सुखावह होतं.


मी लहान असताना मला काय करावं हे कळत नसे. म्हणजे आपण पुढे मोठं झाल्यावर काय करायचं? वास्तविक आमच्या घरी सगळे इंजिनिअर होते. मला मात्र इंजिनिअरिंगची अजिबात आवड नव्हती. बाबांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘‘तुला काही समजत नसलं तरी तू ज्या फील्डमध्ये आला आहेस हेच आपलं फील्ड असं तू समज आणि त्यात तू टॉपला जायचा प्रयत्न कर. एकदा टॉपला गेलास की तिथे खूप कमी काम आणि करता येण्यासारखं खूप काही असतं. तू असं गृहीत धर की जे आपल्याला मिळालं आहे तेच फील्ड आपलं आहे त्याच्यात आपण टॉपला जायचं.’’ याचा मला पुढे खूप उपयोग झाला.


तसंच एकदा गंमतीने म्हणाले होते, ‘‘चारु, तुला एक गंमत सांगतो-Most of the patients get cured inspite of doctor's medicine." म्हणजे डॉक्टरने कशीही वेडीवाकडी औषधं दिली तरी पेशंट बरे होतात. हे आमच्या धंद्याचं सिक्रेट आहे.


आठल्यांकडे सगळ्यांना आंबट ताक प्यायची सवय होती. सुनांना ते अजिबात आवडत नाही. 

अप्पांना अतिशय कडू कॉफी प्यायची आवड होती. सकाळी ब्रेकफास्टला ते कडू कॉफी प्यायचे.आम्ही त्यांच्याकडे ब्रेकफास्टला गेल्यावर आमचे बाबा म्हणायचे, ‘‘वहिनी, द्या एक जहर आम्हालाही!’’


कोणीतरी त्यांना चिकणी सुपारी आणून दिली होती. ते जेवण झाल्यावर जवळजवळ एक-दोन किलो चिकणी सुपारी  संपेपर्यंत खायचे. असा त्यांचा हौशी स्वभाव होता. लोकंही त्यांना अशा नावीन्यपूर्ण गोष्टी आणून देत असत.

दादा आठल्ये सर्जन आहेत. त्यांनी एम.एस. केलेलं आहे. त्यांचं आणि अप्पांचं गंगावेशेत हॉस्पिटल आहे. अप्पा रेडिओलॉजिस्ट आहेत. आता ते प्रॅक्टिस करत नाहीत. दादांचा स्वभाव मुळातच गंभीर आहे. त्यांचा फिजिकल फिटनेस वाखाणण्यासारखा होता. रोज फिरायला जाणं, व्यायाम करणं.

त्यांना सर्जरी करायची म्हणजे ताकदही खूप लागत असावी. ते जनरल प्रॅक्टिस करत असत. जी लोकं येतील त्यांना ते औषध देत असत. साध्या साध्या गोळ्या देत, ‘पाणी उकळून प्या,’ असा सल्लाही देत. दादांचे सगळे मित्र दहा किलोमीटर चालणारे वगैरे असे होते. प्रकाश गोळे आणि सलीम अली यांचा दादांवर प्रभाव होता. ते पक्षी निरीक्षणही करायचे.


मात्र, अप्पांचा स्वभाव याउलट होता. त्यांची मित्रमंडळी जॉली स्वभावाची होती. त्यांच्याकडे नेहमी पार्टीज वगैरे चालायच्या. लोकं आवर्जून पार्टीला उपस्थित राहायचे. अप्पांकडे पार्टीला जायचं हा बहुमानाचा विषय असायचा.

आशा काकू तिथे नुसत्या गप्पा ऐकत बसलेल्या असायच्या. त्यांना मी असंच एकदा म्हटलं की, ‘‘तुम्ही ‘संध्याकाळच्या गप्पा’ असं एखादं सदर लिहू शकता.’’

इतकी वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या हुद्द्याची, विविध अनुभव असलेली लोकं त्यांच्याकडे यायची. त्यावर एक छान पुस्तक नक्कीच तयार झालं असतं. अप्पांचा लोकसंग्रह खूप विलक्षण होता. हॉस्पिटलमध्ये सहा वाजता चहाला जाणं म्हणजे मोठी पर्वणी असे. गंगावेशेतून ताजं दूध घेऊन अप्पांच्या केबिनमध्ये सगळे चहा प्यायला जमत असत. त्यांमध्ये डॉ. अविनाश जोशी नेहमी असायचे. खूप गप्पा चालत. काही लोकं हौसेने वडा मागवत.


तो एक मोठा उत्सवच असायचा. बऱ्याच गरीब पेशंट्‌सकडून अप्पा पैसे घेत नसत किंवा त्यांना, ‘‘तुम्हाला पाहिजे तेवढे द्या,’’ म्हणत. मग पेशंट्‌स त्यांना त्यांच्याकडचे आंबे पाठवत किंवा भेटवस्तू पाठवत असत. तसंच डुनुंग नावाचे अप्पांचे एक मित्र होते. त्यावेळी बजाज स्कूटर हवी असेल तर ती कामं त्यांच्याकडून करता यायची. त्यांचे नंबर लागलेले असायचे आणि ते लगेच आपल्याला स्कूटर मिळवून द्यायचे.


अप्पांच्या पत्नी आशा काकू शिरा खूपच छान करायच्या. विशेष म्हणजे त्यात त्या आंब्याचा गर घालायच्या. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारची पातळ बर्फी असायची. हे पण त्यांच्याकडचं एक वैशिष्ट्य होतं. आम्ही एखादा पिक्चर बघून नंतर कित्येकदा त्यांच्याकडे ब्रेड ऑम्लेट खायला जात असू. 

अप्पा आणि दादा दोघांनीही कालांतराने नागाला पार्कमध्ये मोठेमोठे बंगले बांधले.

दादांकडे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे एक मांजर आणि तिची पिल्लं वंशपरंपरागत असातो. अप्पांकडे एक ‘मार्शल’ नावाचा कुत्रा होता. अनेक वर्षं त्यांच्याकडे कायम एक कुत्रा सोबतीला असतो.

आठल्ये कुटुंबीयांचा म्हणजे दादा आणि अप्पा यांचा आम्हाला कोल्हापुरात असताना खूपच आधार होता, मदतही होत होती. कोणी आजारी पडलं की दादांकडे जायचं. दादांची मुलं म्हणजे वैशाली, राहुल आणि आसीत आणि अप्पांची मुलं अनिकेत, अदिती आणि अमला आमच्याबरोबर खूपच मिळूनमिसळून राहायची. खूपच मैत्रीपूर्ण संबंध होते.

अप्पा खूपच रॉयल आणि पॉझिटिव्ह होते. त्यावेळी ‘कोल्हापुरात सगळ्यांत पॉझिटिव्ह माणूस कोण?’ असं मला कोणी विचारलं तर मी अप्पा आठल्येंचं नाव घेईन. अप्पा म्हणायचे, ‘‘तुम्ही गाव सोडलं पाहिजे त्याशिवाय तुमचा विकास होणार नाही,’’ असा ते खूप अनौपचारिक सल्ला द्यायचे.तसेच ते म्हणायचे व्यवस्थित  व निटनेटक असल पाहिजे आणि दिसल पाहिजे.ते स्वतःचे रिपोर्टस स्वतः टाईप करायचे. त्यांचा हातरुमाल खूप मोठा असायचा,कारण त्यानी नंतर सांगितल की कोणी लहान मुलाने शु वगैरे केली तर लगेच पुसायला काहीतरी लगेच हातात असावे!तसेच कपिलतीर्थ मार्केट मधून ते भाजी आणायला हाऊसेने जायचे , सर्व भाजीवाले त्यांच्या चांगल्या ओळखीचे होते. 

दवाखान्यात ते बरेचदा त्यांचा एक जाळीजाळीचा बनियान असायचा त्यावर ऍप्रन चढवून काम करत असत, व संद्यकाली सर्व रिपोर्ट्स स्वतःच टाईप करत असत. दवाखान्यात पांढरा शर्ट व एखादी डार्क रंगाची पँट असा त्यांचा पेहराव असे.

आठल्ये कुटुंबीयांमुळे आम्हाला वेळोवेळी खूप मदत झाली आणि आमचं आयुष्य खूप समृद्ध झालं असं म्हणायला हरकत नाही.

दादा आठल्ये पहिल्यापासून खूप इंट्रोवर्ट आणि संवेदनशील वृत्तीचे! ते कधीही दारु पीत नसत, सिगरेट ओढत नसत. तरीही त्यांची बायपास सर्जरी झाली होती. त्यांच्या पेशंट्‌सची त्यांना खूप काळजी वाटायची. त्यामुळे ते झालं असावं असं त्यांचं म्हणणं होतं.

ते परखडपणे मत मांडत. एकदा त्यांनी टॉनिकांचे बासळे बालकांना का कंपन्यांना असा एक मोठा लेख लिहिला होता. त्या वेळेला जी निरनिराळी टॉनिक्स बाजारात मिळायची त्यांचा काही उपयोग होत नाही आणि घरगुती पदार्थांचा बाळांना कसा फायदा होतो असाही एक लेख त्यांनी लिहिला होता.

कोल्हापूर कॉर्पोरेशनने एक हत्तीण पाळली होती. तिला अन्नही नीट मिळत नव्हतं; तिची उपासमार होत होती. तर त्या हत्तीणिला मारावं असं ते म्हणाले आणि त्यांच्या वक्तव्यावर मोठा गदारोळ माजला होता-गजलक्ष्मीला मारावं असं डॉ. आठल्ये कसं म्हणू शकतात?? वगैरे वगैरे.

नंतर नंतर पर्यावरणातले बदल या विषयाला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी स्वतः एक इलेक्ट्रिक स्कूटर घेतली. पर्यावरण रक्षणाविषयी ते सगळीकडे प्रचार करतात. त्यांना त्याविषयी मनापासून कळकळ आहे.

एकदा आप्पांच्या लाल टपच्या पांढऱ्या बोडीच्या गाडीला अपघात झाला. आमचे वडीलही त्यात होते. डॉ. आठल्येंचा अपघात झाला असं म्हणत अनेक लोकं मदतीला धावून आली.  


अप्पा पहिल्यापासून खूप जॉली आणि मित्रमंडळींत रमणारे होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या स्तरांतली अनेक मित्रमंडळी होती. त्यांच्या घरात आतमध्ये एक लॉन होती. तिथे अनेकदा लोकं पार्टीला येत. १ जानेवारीला त्यांची ठरलेली मित्रमंडळी पार्टीला येत असत. एरव्हीही बरीच लोकं त्यांच्याबरोबर गप्पा मारायला नियमित येत.

माझ्या मते १९८५-८६ ते एकदा जयपूरला कॉन्फरन्ससाठी आले होते. त्यांनी मला फोन करून बोलावून घेतलं. मला जेवायला घातलं शिवाय मला एक बॅग भेट दिली होती. ती बॅग त्यांना सेमिनारमध्ये मिळाली होती. ती बॅग अनेक वर्षं मी वेगवेगळी सर्टिफिकेट्‌स ठेवायला वापरत असे.

ते एकदा मला म्हणाले, ‘‘तू तुला हव्या त्या पिक्चरचं तिकिटं काढ.’’

Incredible Melting man नावाचा चित्रपट ‘उमा टॉकीज’मध्ये लागला होता. त्या वेळेला हिंदी चित्रपट फक्त ‘उमा’ आणि ‘पार्वती’ टॉकीमध्येच लागायचे. तर तो पिक्चर आम्ही सगळे बघायला गेलो होतो. तो पिक्चर बेताचाच होता. पण त्यांनी तो पूर्ण बघितला. मात्र मलाच थोडं ओशाळल्यासारखं झालं होतं.

अजूनही कोल्हापूरला गेलं की अप्पांकडे जाणं आणि सगळ्या मित्रमंडळींना बोलावून त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसणं हा माझ्या कोल्हापुरूच्या कार्यक्रमाचा अपरिहार्य भाग आहे!

 

 

 

डॉ.वैशालीकडून काही इन्पूट्‌स मिळाले-

बाबा आठल्ये ही सहा भावंडं होती. सगळ्यांत मोठी बहीण होती. बाबा आठल्ये दोन नंबरचे. त्यांच्या पाठीमागे चार भावंडं होती. त्यांचे वडील लवकर गेले. या सर्व भावंडांच्या शिक्षणाची आणि त्यांना सेटल करायची जबाबदारी बाबांनी समर्थपणे उचलली आणि त्याप्रमाणे पूर्ण करून दाखवली.

तसंच त्यांची मुलं-दादा, अप्पा, सतीश, अशोक आणि जयश्री यांनाही व्यवस्थित शिक्षण देऊन त्यांना चांगल्या पद्धतीने आयुष्य जगायला त्यांनी शेवटपर्यंत मदत केली. दादा, अप्पांना दवाखाना काढायला मदत केली. सर्वांच्या शिक्षणाची काळजी घेतली. इस्लामपूरला असताना त्यांनी मुलांना मुंबई-पुण्यात शिकायला ठेवलं होतं.

त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं तेज असायचं. त्यांना अफाट व्यवहारचातुर्य आहे. सगळ्यांना त्यांच्याबद्दल कायम आदरयुक्त दरारा वाटायचा. ते सगळे चुलत, मामे, आत्तेभाऊ, सहकारी, मित्रमंडळी असे सगळे अडचणीच्या काळात त्यांच्याकडून सल्ला घ्यायचे. ही योग्यता त्यांनी कमावली होती आणि शेवटपर्यंत ते तसेच राहिले.


शांताताईंबद्दल वैशालीने सांगितलं-

त्यांचा आधी लग्न झालं होतं; त्यांना एक मूलही होतं. आजारी पडून ते गेलं आणि नवराही गेला. त्यांची सासू मोठ्या मनाची आणि पुरोगामी विचारांची होती. तिने त्यांना पांढरे कपडे न घालता, केशवपन न करता राहायची परवानगी दिली. साताऱ्याच्या आयुर्वेदिक रसशाळेतून डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळी साताऱ्याची रसशाळा खूप प्रसिद्ध होती. त्यांनी जिद्दीने त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्या संघाच्या कार्याकडे वळल्या. त्यांनी अनेक वर्षं समितीच्या शाखा घेतल्या. माझ्या मते जवळजवळ वीस-तीस वर्षं रोज त्यांनी अनेक महिलांना बोलावून त्यांच्याकडून व्यायाम करून घेणं इत्यादी करत होत्या.

जिद्दीने त्यांनी आपला मेडिकल व्यवसायही चालू केला. त्या समितीच्या मेडिकल कॅप्सना जात. त्यांच्याबद्दल असं म्हणतात की त्या घरी आल्यावर पहिल्यांदा आंघोळ करून, कपडे बदलूनच घरात येत. त्यांनी शेवटपर्यंत मेडिकल प्रॅक्टिस सुरू ठेवली. त्यांचा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाताखालून शेकड्यानी महिला गेल्या असतील. त्यांचा बऱ्याच जणांवर प्रभाव पडला. काही महिला डॉक्टर, इंजिनिअर झाल्या; काही मोठ्या पोस्टला गेल्या. त्या सगळ्या समितीचं काम करतायत.

माझ्या मते ही त्यांची फार मोठी अचिव्हमेंट असावी. बाबांच्या निधनानंतर त्या नागपूरला जाऊन राहिल्या. त्यांनी समितीच्या कामात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. कुणावरही त्या अवलंबून राहिल्या नाहीत. त्यांना तेजस्वी व्यकितमत्त्व म्हणता येईल!

Comments

Popular posts from this blog

"देवधर सर"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

मनोहरमामा