तात्या आजोबा -धवल रामतीर्थकर
Menu
Search
कृष्ण धवल
Life in Black & White
TAGGED WITH DHAVAL RAMTIRTHKAR
शिल्पकार मनांचे…
तात्या आजोबा उर्फ कृष्णाजी कुलकर्णी
कृष्णाजी कुलकर्णी उर्फ ‘तात्या’, हे माझ्या आईचे वडील आणि आमच्या पिढीच्या विचारांचे शिल्पकार. लहानपणीच्या ज्या सुखद आठवणी अजून मनात ताज्या आहेत त्या म्हणजे दर उन्हाळी सुट्टीत इचलकरंजीला तात्या आजोबांच्या घरी केलेल्या अनेक अद्वितीय करामती. दर सुट्टीत आम्ही सर्व भावंडं आजोबांनी खास विकसित केलेल्या दहा आसनी गाडीत बसून इचलकरंजीला मुक्काम ठोकायचो. इचलकरंजीच्या घरी पोहोचल्या क्षणापासून तात्या आजोबा आता काय काय नवीन आव्हाने समोर ठेवतील याची आम्ही आतुरतेने वाट बघत असू. मला अशी एकही सुट्टी आठवत नाही जेव्हा आजोबांनी आमच्या चिमुकल्या कल्पकतेला वाव देणारं काही जबरदस्त चॅलेंज ठेवलं नसेल.
तात्या आजोबा म्हणजे नवनवीन कल्पनांचे एक चालते फिरते स्त्रोतच होते. तसं पहायला गेलं तर आई सांगते त्याप्रमाणे आजोबा तिच्या लहानपणी खूप कडक होते. त्यांच्या पुढे कोणीही काही बोलायला धजावत नसे. पण आमच्या साठी तरी तात्या आजोबा नेहमी एका खेळकर रहस्य कथेसारखे असायचे.
घरापासून अर्धा किलोमिटर अंतरावर आजोबांची फॅक्टरी होती, कुल्को इंजिनीरिंग वर्क्स. त्यांच्या ऑफिस मध्ये एक लांबलचक टेबल होतं जेथे ते बसायचे. टेबलच्या बाजूने कपाटच्या कपाटं भरून पुस्तके होती. पण मला ती अडगळ वाटायची कारण त्या वेळी त्या खजिन्याची किमंत माझ्या बाल बुद्धीला कळण्याच्या पलीकडे होती. त्या टेबलाच्या खोलीच्या बाजूने आजोबांनी एक बोगद्याच्या आकाराची वाट केली होती. त्या अंधार्या वाटेत लाल रंगाचे लुकलुकणारे दिवे लावले असायचे. मध्येच कोठेतरी भिंतीवर हिंस्त्र प्राण्यांचा मुखवटा लटकव लेला असायचा. हे तर काहीच नाही, त्या सुरुंगरुपी खोलीच्या मध्यभागी जाण्यास आमच्यापैकी कोणी धजावत नसे कारण त्या भयाण वाटेने मध्यभागी पोचल्यावर समोर यायचा एक खरा वाटणारा हाडांचा सांगाडा! अशा या भीतीदायक वातावरणात आम्ही भावंडं एकमेकाचा हात घट्ट पकडून, रामरक्षा पुटपुटत (येत होती की नाही आठवत नाही) हळू हळू पुढे जात असू. असंच हळू हळू पुढे जाता जाता मनातली भीती कधी मागे राहून गेली कळलंच नाही. त्याची सवय झाल्यावर तर आम्ही त्या हाडाच्या सांगाड्याशी खेळूही लागलो. मला वाटतं हेच उद्दिष्ट होतं तात्या आजोबांचं… कुठल्याही भीतीने मन दुबळं होता कामा नये.
असेच खास अमावस्येची रात्र निवडून आजोबा प्रत्येकाच्या हातात एक टॉर्च, एक काठी आणि एक शिट्टी द्यायचे. कामगिरीही तशी खासच असायची… प्रचंड अशा इचलकरंजीच्या घराच्या आवारची गस्त घालायची. मग काय, आम्ही दोघा-तिघांचं टोळकं करून त्या घराभोवतीच्या निर्जन्य परिसराची फेरी मारायला निघायचो. ना लाईट, ना पक्का रास्ता, ना कोणी मोठे बरोबर. सोबतीला असायची तर फक्त भीती. हातातल्या काठीने धीर मिळण्यापेक्षा पळायची वेळ आली तर अडकून पडायला होईल याचीच जास्त धास्ती वाटायची. मध्येच कोठेतरी पत्र्यावर कुठला आवाज झाला की आमचे धाबे दणाणून जायचे. कशीबशी गस्त घालून परतलो की हुश्ययययय व्हायचं. पण तेव्हापासून अंधाराची भीती जी कमी झाली ती कायमचीच. तसं निर्जन ठिकाणी रात्री खुट्टं झाला की अजूनही धस्स होतं, नाही असं नाही.
तर अशा अनेक रंजक कार्यक्रमांतून तात्या आजोबा आमच्या कोवळ्या मनांना सतत घडवत राहायचे. यातूनच मला स्वतंत्र विचार करण्याची शक्ति प्राप्त झाली असावी. एकदा तर पुण्यात त्यांच्या डेक्कनला वैशाली हॉटेल समोरच्या घरी आलो असताना त्यांनी अतिशय अवघड असे आव्हान समोर ठेवले. खाली जाऊन कोणाकडूनही एक रुपया मागून आणायचा! लहान असलो तरी भीड मोठी होती, “असं कसं कोणाकडे काही मागायचं?” पण आम्ही काही जणांनी लाजत लाजत का होईना पण कोणा कोणा कडून, काही ना काही सांगून एक रुपया आणला तेव्हा तात्या आजोबा समाधानाने म्हणाले, “ही पोरं कधीही उपाशी मरणार नाहीत.” अशा अनेक रोमहर्षक पण बोधक घटनांमधून त्यांनी आमच्या बालपणाला एक वेगळी दिशा दिली. यात खेळणं होता, बागडणं होतं, मस्ती होती आणि त्याचबरोबर मिळणारं व्यवहार ज्ञानही होतं. नकळत आमच्यात आत्मविश्वास भरला गेला, कल्पनांना पंख फुटले.
असे होते तात्या आजोबा. त्या वेळी पंचहत्तरी ओलांडलेले, पण मनाने सदैव ताजे, टवटवीत,आनंदी. इतर आजोबांपेक्षा जरा वेगळे, दृढ निश्चयी आणि आपल्या नातवंडांनी सामान्य आयुष्यापलीकडे जाऊन एक वेगळे आयुष्य जगावे यासाठी सतत प्रयत्नशील.
हेच खरे आमच्या विचारांचे, आमच्या पिढीचे शिल्पकार.
धवल रामतीर्थकर
(सीवूड्स, नवी मुंबई)
tatya ajoba
काही अजरामर आठवणी…
आजोबांचा ‘कार‘नामा
त्यांच्या जिज्ञासूपणाचा एक किस्सा ज्याने हिंदुस्थानाची दिशा बदलली असती. कोणाकडूनतरी, कधीतरी ऐकलेली ही गोष्ट. बहुदा माझा जन्म होण्यापूर्वीच काळ होता. तेव्हा तात्या आजोबा तरुण होते व धंदा ऐन भरात चालू होता. त्यांचे डोके म्हणजे कल्पनांचे सुपीक जग. सतत धडपड आणि नवीन काहीतरी करण्याची ईर्षा याचा जेव्हा संगम होतो तेव्हा होते असे की जेव्हा हिंदुस्तानात निर्माण होणाऱ्या गाड्यांची गणना नगण्य होती तेव्हा यांनी स्वतःच्या कारखान्यात स्वदेशी गाडी तयार केली. विचार तर देशव्यापी होते पण जेव्हा तात्या आजोबांनी गाडीचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला तेव्हा काय आश्चर्य, तो चक्क नाकारला गेला. तसं बघितलं तर आश्चर्य करण्याचे काही कारण नाही, कारण तेव्हा सरकार होते काँग्रेसचे. गांधी गंजातील संजय गांधी यांचा ‘मारुती उद्योग’ हा गाडी बनवण्याचा कारखाना उदयास येत होता व त्यांना जपानची सुझुकी कंपनी हिंदुस्तानात आणायची होती.
तर अशा प्रकारे इचलकरंजीतील एका प्रामाणिक हिंदुस्थानी उद्योजकाचा हिंदुस्तानातील पहिला गाडी प्रकल्प खड्ड्यात घातला गेला व संजय गांधी व काँग्रेसच्या विद्यमाने हिंदुस्थानावर जपानी गाड्यांची मक्तेदारी सुरु झाली.
अर्थात ही ऐकीव गोष्ट आहे, याला पुरावा आता काहीच नाही. परत, आश्चर्य वाटण्यासारखेही काही नाही…
गाडी, डोसा आणि टिळा
चल मेरी गाडी
उन्हाळ्याच्या सुट्टीची जेवढी आम्ही आतुरतेने वाट बघत असू तेवढ्याच आतुरतेने तात्या आजोबाही वाट बघत असणार. कारण काही दिवसातच, कधी कधी तर परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी इचलकरंजीहून आजोबांची रुबाबदार अँबॅसिडर, नाहीतर राखाडी रंगाची खास बदल करून घेतलेली गाडी यांपैकी कोणती ना कोणती गाडी पुण्यात दाखल व्हायची. मग एक एक करून त्यांच्या मुलींना व त्यांच्या पिलावळांना आत बसवून इचलकरंजीच्या दिशेने मार्गस्थ व्हायची. ती पांढरी, क्रीम रंगाची अँबॅसिडर अजून डोळ्यासमोर आहे. कसे तिचे हेडलाईट म्हणजे दोन सुजलेले डोळे, मोठाले स्टीअरींग चक्र, आणि विशेष म्हणजे आतमध्ये डाव्या बाजूला दरवाज्याला एक चिंटू पंखा जो मुंबईच्या लोकल प्लॅटफॉर्मवरच्या पंख्यांसारखी नुसती घर घर करत राहतो पण हवेची एक झुळूक काही सोडत नाही. पण त्या वेळी या सगळ्या गोष्टींचे व गाडीचे एवढे कौतुक होते की सर्व आलिशान वाटायचे.
लाल टिळ्याचा थरार
अशी आमची पुणे ते इचलकरंजी सफर सुरु व्हायची. त्या काळी आजच्यासारखा कोल्हापूरला जायला बायपास रस्ता नव्हता आणि कात्रजचा घाट हा एकमेव पर्याय उपलब्ध असायचा. अशा घाटातून जाताना कोणीतरी सांगितलेली गोष्ट इतकी मनात घर करून बसली की कात्रजचा बोगदा आपल्याला खातोय की गिळतोय असे वाटायचे. तर ही गोष्ट अशी की कधी काळी कात्रजचा जो काळा कुळकुळीत बोगदा आहे जो असंख्य गाडयांना आपल्या पोटात गुडूप करतो आणि मर्जी असते म्हणून दुसऱ्या बाजूने सोडून देतो, त्या बोगद्यात कोणीतरी एक बाईला मारून टाकून दिले. तेव्हापासून लाल डब्बा, म्हणजे S.T. बस जेव्हा जेव्हा बोगद्यासमोर येते तेव्हा एक अक्राळविक्राळ चेहरा असलेली, मोठ्ठा लाल टिळा लावलेली बाई प्रकट होते व हात पुढे करते. तो हात लांब लांब लांब होत जातो आणि S.T. मध्ये शिरून हवा त्याचा गळा धरतो.
ही गोष्ट ऐकल्यापासून किती तरी वर्षे कात्रजचा घाट म्हटलं की बोगदा आलाच आणि त्याचबरोबर लाल टिळ्याची बाई हे समीकरण डोक्यात पक्के झालं आणि प्रवास आणखी रोमांचकारक होत गेला.
राजेशाही डोसा
त्या काळी रस्ता आताच्या पुणे-कोल्हापूर सरळसोट महामार्गासारखा नव्हता. त्यामुळे साताऱ्याला पोचायला ३ तास तरी लागायचे. मग साताऱ्यात थांबा ठरलेला, तो म्हणजे प्रसिद्ध अजिंक्यतारा हॉटेल. आमच्यासाठी खास आकर्षण म्हणजे तिथे मिळत असलेला लांबसडक डोसा. आणि आजोबांकडे जायचे म्हटलं की आम्हाला तेवढी मोकळीक असायची, आईही तिच्या बहिणींबरोबर बोलण्यात मग्न असायची. पुण्याहून इचलकरंजीला जायच्या वेळीही अजिंक्यतारा हॉटेल आणि तो लांब डोसा आणि परत पुण्याला येतानाही अजिंक्यतारा आणि लांब डोसा हा हक्काचा आणि ठरलेला. ज्या अर्थी हे लिहिताना मला डोळ्यासमोर तो डोसा आणि त्याची चव तोंडात आहे त्या अर्थी २५-३० वर्षांपूर्वी तो थांबा आणि तो डोसा स्वर्गरूपीच असणार.
हक्काचा स्विमिंग पूल
हल्ली कुठेही जायचे म्हटलं की आधी त्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल आहे की नाही हे बघतात. आम्ही तर नशीबवान होतो कारण आमच्या लहानपणीच तात्या आजोबांनी त्यांच्या नातवंडांसाठी त्यांच्या इचलकरंजीच्या घराच्या मागे एक स्विमिंग पूल तयार करून घेतला होता. आता आजोबांनी केला आहे म्हणजे हा कोणता साधारण पूल तर नसणार. साधारण पूल हे आयताकृती असतात पण या पुलाची बांधणी चक्क गोलाकार होती. का गोलाकार? त्या मागेही कल्पना होती. पुलाच्या मध्यभागी एक चौथारा उभा केला होता आणि त्यावर एक लोखंडाची सळी लावली असायची. या सळीला एक दोरी बांधलेली जी खाली पूलमधल्या पाण्यापर्यंत पोचायची. याच दोरीला मग आमच्यापैकी ज्याला कोणाला पोहता येत नाही त्याच्या कंबरेला ही दोरी बांधली जायची आणि पाण्यात सोडले जायचे. त्या सळीमुळे आणि दोरीमुळे बुडण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही मग हात पाय मारत राहायचो, पण तेव्हाही पाण्याची एवढी भीती होती की केव्हा ती कंबरेभोवतीची दोरी सुटती आहे आणि बाहेर जमिनीवर पाय टेकतात याचीच मी वाट बघत असे.
पुढे पुढे ही यंत्रणा निकामी झाली. मग मामांपैकी कोणीतरी, हातात भक्कम काठी धरायचे, तिच्या एका टोकाला दोरी बांधायचे आणि दुसऱ्या टोकाला आम्हाला बांधून पाण्यात सोडायचे. नंतर जशी उंची वाढत गेली तसे आम्ही दोरीविना तसेच पाण्यात उतरू व दंगा मस्ती करू लागलो.
आम्हा लहान मुलांची संख्या जास्त असल्यामुळे पूलमध्ये जातोय म्हटल्यावर आयांचे अँटिना लगेच वेध घ्यायचे आणि धडाधड सूचनांचा पाऊस सुरु व्हायचा. “जास्त वेळ डुंबू नका रे. आजूबाजूला जे पोहतायत त्यांच्याकडेही लक्ष द्या की कोणी बुडत तर नाही ना” वगैरे वगैरे. कारण पुलाची खोली साधारण ३, साडेतीन फूटच होती, पण आम्ही टिल्लू पिल्लूही जेमतेम त्याच उंचीचे होतो! आणि झालेही तेच ज्याची सर्वांना सतत भीती असायची. आम्ही मुले पाण्यात दंगा करत होतो आणि अचानक माझ्या पायाला कोणाचातरी हात लागला. आता पाय लागला तर समजू शकतो पण पाण्याच्या ३ फूट खाली हात लागला म्हणजे काहीतरी गडबड आहे हे माझ्या बालमानालाही लगेच कळाले. मी लगेच आरडाओरडा सुरु केला आणि आजूबाजूलाच असलेल्या सर्वांचे लक्ष वेधले.
कोणीतरी खाली डुबकी मारून तो हात पकडला आणि पाण्याबाहेर काढला. बघतो तर काय तो माझा लहान मावसभाऊ राघवेंद्र होता जो उंचीने माझ्यापेक्षा कमी होता आणि चक्क पाण्यात बुडाला होता. नशीबाने तो पाण्याखाली जाताच माझ्या पायाला लागला म्हणून वाचला नाहीतर काही खरं नव्हतं.
ते निमित्त झालं आणि पूलमधलं पाणी आटवलं गेलं. तेव्हापासून तिथला स्विमिंग पूल नाहीसा झाला आणि फक्त एक गोलाकार खड्डा राहिला. पण ती काही वर्षे आम्ही इतके मनसोक्त डुंबून घेतले की ते कायमचे माझ्या आठवणींना पुरले आणि आजही तो सिमेंटचा गोलाकार स्विमिंग पूल जसाच्या तास डोळ्यासमोर उभा आहे, पाण्यासकट.
अजून एक आठवण अशी की, आम्हा मुलांना दुनियादारीशी ओळख असावी म्हणून तात्या आजोबा आम्हाला एक फोन नंबर द्यायचे आणि तिथे फोन करून पाण्याचा टँकर मागवायला सांगायचे. टँकर का? अर्रे, आमच्या स्विमिंग पूल मध्ये पाणी कुठून भरते असे तुम्हाला वाटले!
ड्रीम मर्सडीस
आधी सांगितल्याप्रमाणे सायकलच्या काळात तात्या आजोबांकडे अनेक गाड्या होत्या. एक अँबॅसिडर, एक राखाडी सुधारित गाडी. पण याहून सर्वात जास्त आकर्षक आणि आमच्यासाठी स्वर्गीय म्हणजे त्यांची मर्सडीस गाडी. त्या काळी जेव्हा गाडी असणे हे मोठे भाग्याचे लक्षण असायचे तेव्हा आजोबांकडे आलिशान, श्रीमंतीचे निशाण असलेली साक्षात मर्सडीस होती. आम्ही त्या वेळी बिबवेवाडीत रम्यनगरी सोसायटी मध्ये राहत असू. कधी संध्याकाळी आजोबा मर्सडीस घेऊन घरी यायचे. ते वरती आणि सगळी मुले खाली गाडीभोवती हे ठरलेलं. साहजिकच माझ्याही अंगावर मूठभर मास चढायचं. मला ती गाडी फारशी आतून आठवत नाही कारण मी कधी त्यातून प्रवास केला नाही.
पण समीरने, माझ्या मोठ्या भावाने तर कमालच केली. तो गाडी पहिल्यांदा शिकला ते ही हीच मर्सडीस चालवून. आजोबांच्या नकळत तो खाली यायचा आणि चालकाला फूस लावून गाडी शिकायचा. आजोबांना नंतर ही गोष्ट कळली असणार पण ते कधीही त्याला रागावले नाहीत की काही बोलले नाहीत. त्यांच्यासाठी त्यांची नातवंडे काहीतरी वेगळे, नवीन करत आहेत यातच सगळे मिळवले!
अन्न म्हणजे पक्वान्न
तात्या आजोबांच्या नवनवीन कल्पनांपैकी एक कल्पना होती की जेव्हा सगळे इचलकरंजीला सुट्टीत जमलेले असतील तेव्हा प्रत्येक दिवशी एका व्यक्तीच्या आवडीचा एक पदार्थ करायचा. अर्थात याचा जास्त ताण पडायचा तिथे राहणाऱ्या माम्यांवर कारण मुख्य काम त्यांनाच करावे लागे. पण आमच्यासाठी ते ना भूतो न भविष्य असे होते, कारण आई-बाबांच्या रोजच्या जरबेतून मुक्त होऊन आपल्याला आपल्या मनासारखा आणि मनाएवढा आवडीचा पदार्थ खायला मिळणार यासारखे दुसरे सुख कोणते. मग कोणी गुलाबजाम सांगे, कोण श्रीखंड, कोण पुऱ्या, कोण आणि काही पक्वान्न. अशा प्रकारे रोजचे अन्न म्हणजे पक्वान्न व्हायचे. त्याशिवाय मे महिना असल्याकारणाने आजोबा आंब्यांच्या पेट्यांचा ढीग रचायचे. हवा तेवढा आणि पचेल तेवढा आंबी खावा, कोणाला मनाई नाही.
एक गोष्ट, एवढे खाऊन कोणी आजारी पडले आहे असे आठवत नाही, कारण धावपळच एवढी असायची.
ऊसाचे बोट
अशा प्रकारे पौष्टिक अन्नाची रेलचेल चालू असताना एक दिवस आम्ही ऊस खायचे ठरवले. पण अक्खा ऊस खाता येतोय कोणाला. आम्ही पडलो नाजूक शहरी! मग त्याचे तुकडे करायचे ठरले. कसे? कोयत्याने नाही, तर यंत्राने. हो हो, आजोबांकडे ऊस कापायचे यंत्रही होते. पण त्याची पाते एवढी धारधार होती की आम्हा मुलांना त्या यंत्राच्या जवळपासही जाण्याची परवानगी नव्हती. पण पोरं ती पोरं. आम्ही ऊस कापताना तिकडे गेलोच.
आता ते यंत्र असे होते की त्याला तीन मोठी पंख्याच्या पात्यांच्या आकाराची धारधार ब्लेड होती. त्याला मागे एक हॅन्डल होते जे आपण फिरवायचे म्हणजे ते धारधार पाते फिरत आणि त्याखाली ठेवलेल्या उसाचे एका फटक्यात दोन तुकडे होत. आता जायचे नाही म्हटलं की हमखास मुले तिकडे जाणार. आणि अशा भयानक यंत्राजवळ कोणी मस्तीखोर मुलगा गेला तर काय होते, तेच झाले.
शाली मावशीचा राघवेंद्र ऊस कापण्यात सामील झाला आणि कधी त्याचे बोट जरा पुढे गेले आणि कधी पाते खाली आले हे कळायच्या आधीच त्याची किरंगळी हातावेगळी झाली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. एका कारखान्यात अपघात व्हावा आणि सगळी यंत्रे थांबविता तसेच इथे झाले. बोंबाबोंब सुरु झाली, त्यात राघवेंद्रचे रडणे मिसळले आणि अक्खे घर तिथे जमा झाले. मग गडबड करून ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले आणि किरंगळीला बँडेज बांधून काही वेळाने तो परत आला. बघता बघता काही वेळातच आमच्यात सामील होऊन जणू काही झालेच नाही, त्याची किरंगळी कायमची गेलीच नाही, अशा भावात तो सगळे विसरून खेळायलाही लागला. आणि तेव्हापासून ते ऊस कापायचे यंत्र इतिहासजमा झाले.
Kulko ad.
त्या काळी दिलेली कुलको इंजिनीरिंग ची जाहिरात. आजही असे काही त्या काळातले वयस्कर आहेत ज्यांना कुलको स्पष्ट आठवते व आठवण म्हणून सांगतात की त्या काळी फक्त किर्लोस्कर आणि कुलको या दोन कंपन्यांचीच मोटार इंजिन डोळे झाकून घेण्यालायक असायची. एकदा घेतले की काम करत राहते, बाकी देखभाल वगैरे सर्व विसरून जायचे!
कुल्कोत अजगर!
नुसतं साप म्हटलं तरी लोक लांब पळायला लागतात. इथे तर तात्या आजोबांनी चक्क अजगर पाळला होता. कुल्को इंजिनीरिंग वर्क्स ही त्यांची फॅक्टरी जिथे ते रोज जायचे आणि बसायचे. इथेच त्यांनी तो हाडाचा सांगाडाही ठेवला होता, आणि तिथेच पण बराच लांब अजगरही ठेवला होता. ती एक लहान खोली होती ज्यामध्ये पाऊल ठेवायला आम्हा चिंटू पिंटू मुलांना अजिबात परवानगी नव्हती. खोलीच्या जवळपास गेलो तरी त्यांनी नेमलेला आणि सक्त ताकीद देऊन ठेवलेला कारखान्यातील माणूस आम्हाला हटकायचा आणि तिथे फिरकण्यास मनाई करायचा. वास्तविक कुल्कोच्या भल्या मोठ्या मुख्य दरवाज्यातून आत गेल्या गेल्या उजवीकडे ही खोली होती पण आम्ही सरळ मान करून सरळ चालत जात असू.
जसे जसे मोठे होऊ लागलो तेव्हा एक दिवस कोणा मोठ्या माणसाबरोबर अजगराच्या खोलीत जायची परवानगी मिळाली. आत काय असणार याची काहीच कल्पना नव्हती. आत शिरताच निमुळती वाट दिसली. थोडे पुढे जाताच उजवीकडे एका भल्या मोठ्या काचेच्या पेटिट एक भाला मोठा, जाडजूड अजगर निपचित पडलेला दिसला. एवढ्या जवळून एवढा मोठा अजगर पहिल्यांदाच बघत होतो. त्या लठ्ठ अजगराच्या तोंडापेक्षा मोठे आ वासून मी बघताच राहिलो.
मनात आले की हा अजगर एवढा मोठा आहे की सहज आपल्याला गिळू शकेल आणि म्हणूनच बहुतेक तात्या आजोबांनी आम्हाला त्यापासून वाचवून ठेवले असणार. तो दिवस आणि तो क्षण एवढा विलक्षण होता की आज २५ वर्षांनीही मला स्पष्ट आठवतोय. धन्य ते आजोबा आणि धन्य तो अजगर ज्यामुळे मला लहानपणीच एक मोठ्ठा अनुभव मिळाला.
रस्त्यावर दुकान
तात्या आजोबा कुल्को इंजिनीरिंग वर्क्स मध्ये फक्त यंत्र आणि यंत्राचे भाग यांची निर्मिती नाही करायचे. त्या बरोबरच वेगवेगळे प्रयोगही करत. त्यातल्याच एका प्रयोगातून निर्माण झाले रबराचा आपटबार व अशाच अनेक वस्तू. दुसरी एक अनोखी विकसित केलेली वस्तू म्हणजे आराम खुर्ची. आता रबरी आपटबार कसा होता?एक लाकडी दांडी होती ज्याच्या एका टोकाला एक अर्धवर्तुळाकार रबरी कप लावला होता. त्याचे झाकण उघडायचे, मध्ये वर्तमान पत्राचा तुकडा ठेवायचा आणि झाकण बंद करायचे. मग लाकडी काठीला पकडून वर उचलायचा आणि धपकन खाली आपटायचा… फटाक! परत दुसरा वर्तमानपत्राचा तुकडा लोड करायचा आणि परत फटाक! अगदी स्वस्त आणि परत परत वापरणे शक्य अशा दोन जमेच्या बाजू असलेला आपटबार. तो त्या काळाच्या पुढचा होता आणि त्याचे ढीग कारखान्यात पडले होते.
मग आजोबांनी आमच्यासमोर एक आव्हान ठेवले. या वस्तू विकून दाखवायच्या. कुल्को कारखाना इचलकरंजीच्या मुख्य रस्त्यावरच होता. तेथून थोडे पुढे गेले की एस. टी. स्थानक लागते. अशा मोक्याच्या ठिकाणी आम्ही सगळी भावंडे ते आपटबार आणि खुर्ची आणि इतर अशा अनेक वस्तू घेऊन बसलो. सकाळची वेळ होती आणि आम्ही गिऱ्हाईकांची वाट बघत ते ढीग समोर ठेवून संकोचलेल्या स्थितीत बसलो.
एक एक करून लोक यायचे आणि आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचो. कोण ते स्वतः करून बघायचे, कोणी नुसते पुढे जायचे आणि कोणी ते विकतही घ्यायचे. जसा जसा दिवस पुढे सरकू लागला, लोकांची सवय व्हायला लागली, भीड नाहीशी झाली. आम्ही सर्वजण ओरडून ओरडून लोकांना बोलावत होतो. किती विकले गेले, किती पैसे जमा झाले, उरलेल्या वस्तूंचे काय झाले हे आता आठवत नाही. काही आठवत आहे तर ते काळ्या वस्तूंचे ढीग, आणि त्यामागे बसलेली मुले, म्हणजे तात्या आजोबांची आम्ही नातवंडे.
आजोबांचा उद्दिष्ट यशस्वी झा ले होते. त्यांच्यासाठी साठा संपवणे किंवा पैसे महत्वाचे नव्हते तर नातवंडांनी मार्केटिंगचे मूलभूत मंत्र शिकणे अधिक प्रिय होते. आणि स्वतः विकून बघणे आणि आत्मविश्वास कमावणे यापेक्षा महत्वाची शिकवण काय असू शकेल.
दुधाचे ‘अ‘माप क्षण
इचलकरंजीत आजोबांच्या घराच्या मागे एक मोठे पटांगण होते जिथे आम्ही पकड पकडी, आंधळी कोशिंबीर वगैरे खेळ खेळात असू. त्यापलीकडे होता तो गोलाकार स्विमिंग पूल. आणि दोन्हीच्या डाव्या बाजूने एक मातीची वाट जायची. दोन्ही बाजूला छान काटक्यांचे कुंपण होते. थोडे पुढे गेल्यावर एक छोटासा दरवाजा लागायचा जो पार केल्यावर यायचे मनोहर मामा आणि शैला मामीचे घर.
घर छोटेसे होते पण त्यात एक मोठ्ठा खजाना होता व तो मला कायम हवाहवासा वाटायचं. का कोणास ठाऊक त्यांच्याकडे दुधाची अल्युमिनियमची वेगवेगळी मापे होती. अगदी छुटकुल्या १०० मिलिलिटर मापापासून ते मोठ्या १ लिटर मापापर्यंत सगळी मापे. आणि त्या मापाचे मला प्रचंड वेड होते.
मी त्यांच्या घरी जाऊन ती मापे घेऊन बसायचो, मग शैला मामी मला एका भांड्यात पाणी आणून द्यायची आणि मी किती वेळ त्या मापात पाणी घेऊन एका मापातून दुसऱ्या मापात भरणे असे खेळात बसत. त्यात मला काय आनंद मिळत होता ते आता कळणे शक्य नाही. पण मला कोणी टोकले नाही, कोणी हसले नाही की काहीतरीच करतो हा मुलगा, की कोणी चिडवले नाही. जे मला करायचे मन झाले ते मी करत बसलो. ही भावना आणि हा स्वछंद्पणा कोणत्याही मापात मोजणे केवळ अशक्य!
रात्र वैऱ्याची
तात्या आजोबांचे घर आगगाडीच्या डब्यासारखे लांबलचक होते. त्या घराभोवती प्रचंड जागा होती, ज्यात अनेक यंत्रे, लेथ मशीन वगैरे ठेवलेले असे. बाकी यंत्र बंदिस्त पत्र्यांच्या खोल्यात ठेवली असे. हा परिसर अनेक एकर पसरलेला. दिवसाही एक फेरफटका मारला तर निरव शांतता एवढेच जाणवायचे. या अशा ठिकाणी, खास अमावस्येची रात्र निवडून आजोबा प्रत्येकाच्या हातात एक टॉर्च, एक काठी आणि एक शिट्टी द्यायचे. कामगिरीही तशी खासच असायची… प्रचंड अशा इचलकरंजीच्या घराच्या आवारची गस्त घालायची. मग काय, आम्ही दोघा-तिघांचं टोळकं करून त्या घराभोवतीच्या निर्जन्य परिसराची फेरी मारायला निघायचो. ना लाईट, ना पक्का रास्ता, ना कोणी मोठे बरोबर. सोबतीला असायची तर फक्त भीती व काठी आणि सर्वात महत्वाचे बरोबरच्या
भाऊ-बहिणीचा आधार. हातातल्या काठीने धीर मिळण्यापेक्षा पळायची वेळ आली तर अडकून पडायला होईल याचीच जास्त धास्ती वाटायची. मध्येच कोठेतरी पत्र्यावर कुठला आवाज झाला की आमचे धाबे दणाणून जायचे. कशीबशी गस्त घालून परतलो की हुश्ययययय व्हायचं.
दुसरे आव्हान असायचे ते कुल्को हा त्यांचा कारखाना. रात्री ठीक बारा वाजता सर्व कारखान्याच्या मुख्य दरवाज्यापाशी जमायचो. मग क्रम तोच, हातात एक काठी, एक टॉर्च आणि एक शिट्टी. एवढे घेऊन त्या अजस्त्र दरवाज्यातून आत आत जायचे आणि अख्या कारखान्याची एक फेरी मारून परत यायचे. आत गेल्यावर मुख्य दार बंद केले जायचे. मी तर कधी ते धाडस करू शकलो नाही, कारण इचलकरंजीच्या घराचा परिसर तरी थोडा परिचयाचा होता पण कारखाना म्हणजे अगदीच भयाण वाटत असे. मोठ्या मुलांपैकी, म्हणजे हर्षद, राहुल वगैरे कोणीतरी जाऊन यायचे. पण दरवाजा बंद केल्यावर तिथेच थांबून रामरक्षा म्हणत थांबलेत की खरंच कारखान्याची चक्कर मारली आहे हे कोणालाच कळायचे नाही आणि शंकेची पाल नेहमी चुकचुकत राहायची आणि मजेत भर घालायची.
पण तेव्हापासून अंधाराची भीती जी कमी झाली ती कायमचीच. तसं निर्जन ठिकाणी रात्री खुट्टं झाला की अजूनही धस्स होतं, नाही असं नाही.
मला वाटतं हेच उद्दिष्ट होतं तात्या आजोबांचं… कुठल्याही भीतीने मन दुबळं होता कामा नये.
असे बालपण आणि असे तात्या आजोबा सर्वांच्या नशिबी असू दे रे देवा…
Comments
Post a Comment