साळगांवकर

 Ramchandra Salgaonkar expired on 27th.

Tatya aajoba cha  khas manus.


वासांसि जिर्णानि यथा विहाय... 


मृत्यू हा ज्यांचा अगदी सहज विषय असे बाबा काल 27 ऑगस्ट 2020 रोजी त्याचे बोट धरून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. कोणाच्याही विरहाने मला वेदना व्हाव्या नि त्यांनी वासांसि जिर्णानि हे गीतावचन ऐकवावे असे कित्येकदा झालेले... मनुष्य जीर्ण कपडे बदलून नवे घेतो तसे देहाचे वस्त्र जीर्ण झाले की आत्म्याला ते फेकून नवे घेण्याची आस लागते, त्यात वाईट ते काय? हे तत्त्वज्ञान ऐकायला ठीक असले तरी मनुष्याच्या कपड्याशी एकतर सहसा त्याचा एकट्याचाच संबंध आणि तो ही तुलनेने कितीतरी कमी काळाचा असतो. इथे हे वस्त्र आत्म्याला तो नर जन्मल्याक्षणापासून चिकटलेले, त्याचे सगळे राग-लोभ त्या कपड्याशी निगडीत आणि त्यामुळे इतरांचाही त्या कपड्याशी घनिष्ठ संबंध आलेला असतो. नवे कपडे घातलेले शरीर पाहता येते तसा आत्मा भेटत नाही ना... ही ती तुटल्याची वेदना...


असो, पण जीव बोलला तसं वागला याबाबतीत... 14 ऑगस्टला फ़क्त आखडलेल्या गुडघ्यांना वाकतांना तोल संभाळता न आल्याने ते पडले आणि दंडाचे हाड मोडले. दुर्दैवाने पहिलीच नव्हे तर दुसरी सर्जरीही फ़ेल झाली आणि बहुतेक त्यामुळेच देहाचे हे वस्त्र जीर्ण झाले याची त्या आत्म्याला चाहूल लागली... नवे वस्त्र धारण करायला गेला तो आत्मा असे त्यांच्या शेवटच्या श्वासाची प्रत्यक्ष साक्षी असलेल्या त्यांच्या लाडक्या शैलाने आम्हाला सांगितले.  पण ते त्या माणसालाही नक्की अकल्पितच, म्हणजे केवळ चारच दिवसांपूर्वी त्यानी लवकरच म्हणजे शनिवारी 29 ऑगस्टला टाके निघाले की दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाऊन अनंतचतुर्दशीला लाडू करून खाण्याची स्वप्नं मला फोनवर सांगितली होती... 


सोडीयम कमी झालंय म्हणून मीठ, आणि त्यासाठी स्नॅक्स बिस्किट्स खायला घातल्याचे निमित्त, त्याने त्यांना खोकला यायला लागला तो बिस्किट्स बंद करून सलाईन लावल्यावर लगेच कमीही झाला. पण दवाखान्यात असलेल्या मिनिमम स्टाफ़ने खोकला हे कोव्हिडचे लक्षण आहे म्हणून आम्ही हात लावणार नाही असे बंड पुकारले आणि डॉक्टर, जे दोन दिवसांपूर्वी बरे वाटतेय त्यांना डिस्चार्ज द्या म्हणतांना शनिवारी टाके काढूनच सोडणार म्हणणारे, रातोरात पेशंटला कुठेही हलवा म्हणाले... 


लोकांना हवा असतो तोवर जीव त्या शरीरवस्त्राला धरूधरून ठेवतो, नकार त्याच्या कानावर पडला की जीवेच्छेचा अंत होतो. तसेच झाले, हलवा म्हणजे कुठे हलवा? अर्थोपेडीक झाले तरी दवाखान्यातून पेशंट घरी न्यायला राहो, दुसर्‍या दवाखान्यातही घ्यायला कोणी तयार नाही कोव्हिडकाळात... दुपारपर्यंत फ़क्त कुठे हलवता येईल याची शोधाशोध, मी सुचेल त्याला दवाखाना मिळवण्यात काही मदत करू शकता का असे मेसेजेस केले आणि प्रत्येकाने काही शक्यता सुचवल्या. शेवटी सीपीआरला कोव्हिड टेस्ट करून पुढे ते देतील ती दिशा असे ठरले. कोव्हिडयोद्धा वैशालीने अकल्पितपणे स्वत:हून पुढाकार घेऊन कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली तर रुग्णाला दाखल करून घेणारा मिळणे अवघड अशा सद्यपरिस्थितीत त्यासाठीही सोय केली. आमदार राजेश क्षीरसागर जुने शेजारी... स्वत:ला बरे नसताही केली धडपड त्यांनी, पण त्यांनी सांगूनही गणपती आणि अशाच कारणांनी ॲम्ब्युलन्स यायला चक्क संध्याकाळ झाली... क्षणाक्षणाने दुर्दैव ओढवत आहे हे दिसत असूनही काहीही करता येत नव्हते. वंदनाने तर मला, स्पष्टच दिसतंय परिस्थिती बिघडत चालल्याचं तरी काही वैद्यकिय हालचाल नाही तेव्हा बाबांनी तुला गीता वाचायला सांगितली आहे हे लक्षात ठेवायचं, असे दुपारनंतर सांगितले होते. सीपीआरमध्ये पोहोचायला रात्र झाली तेव्हा दगदगीने त्यांना धाप लागली होती. 


साधारणत: सर्वच वृद्धांची पोजिटिव्ह येते अशी कोव्हिड सस्पेक्टन्सी टेस्ट करून त्यांना सस्पेक्ट वार्डात दाखल करावं असा निर्णय झाला तेव्हा सकाळी उठून न खाता-पिता, कोव्हिडभयाने अगदी वॉशरुमलाही न जाता हॉस्पिटलसाठी दिवसभर वणवण करत आलेल्या वंदना नि शैला, भले भले पण आजार्‍यास दरवाज्यापर्यंतच सोडतात अशी स्थिती जिथे त्या सीपीआरमध्ये त्यांच्यासोबत होत्या. खूप कमी सामग्रीत खूप पेशंट्स हाताळणे चालू असल्याने अत्यवस्थ पेशंटबद्दल आशा बाळगण्यात अर्थ नव्हता. तरी तिथे त्यांची हिस्टरी नि स्थिती पाहून त्यांना तातडीच्या उपचारांसाठी कॅज्युॲलिटीमध्ये घेऊन खूप माणूसकीने वागवण्यात आले.


सगळे संपले काही एक तासांतच पण डॉक्टरांचे सौजन्य वादातीत! या माणसाचे सगळेच वेगळे, वाचवायला गेलो तर ॲम्ब्युलन्स मिळण्यास अक्षम्य उशीर झाला, गेले म्हटल्यावर शववाहिका लगेच तयार होती... कसोटी लागली ती त्यांच्या मापाचे रॅपर मिळवण्यात... तब्बल दोन तास गेले म्हणे सव्वासहा फूट लांबीचा देह बसेल असे रॅपर जमवण्यात. बाबानी जाता जाता धाकटीला एकदमच करेजिअस बनवण्याचा चंग बांधला होता बहुतेक. तिथल्या दोन मदतनीसांना तो लांब-रुंद देह झेपेना तेव्हा ती तिसरी मदतनीस म्हणून पुढे सरसावली तशी त्यानी थक्क होऊन विचारले, भीती नाही वाटत? ती म्हणते त्या क्षणी कसली हे ही मनात आले नाही. तिने मी करत आले आहे त्यांचे आठवडाभर, ॲम्ब्युलन्समधूनही आलो आम्ही त्यांच्यासोबत असे सांगितले. पण आज तिला वाटते बहुतेक त्यानी भीती अचेतनाला शिवण्याची... असे विचारले होते... तेव्हा रात्री एक वाजत आलेला,.. एकदाचे यांना त्यातून पाठवून आपण शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचे आहे हा एकच विचार होता डोक्यात त्यामुळे काय करतोयपेक्षा लागेल ते करायचं असंच झालं... 


डॉक्टर भला माणूस अशासाठी की दिवसभर दवाखाने नि ॲंब्युलन्सना फोन करून हिचा फोन डिस्चार्ज झाला तेव्हा त्यानी तिने सांगितलेल्या नंबरवर स्वत:च्या फोनवरून निरोप दिला. लक्षण ठीक नाही तर घरी जाऊन गणपतीविसर्जन करून येणे भाग आहे म्हटल्यावर त्यानी तिला थांबवले नाही, अर्धातास स्वत: पेशंटशेजारी थांबेन, क्रिटिकल वाटले की करतो फोन असे सांगितले आणि त्याप्रमाणे केलेही. शववाहिका गेल्यावर दोघींना समजावले, तुम्ही जाऊ शकता स्मशानात, तसे डिटेल्स मी तुम्हाला देईन. पण इतक्या रात्री साडेबारा एक वाजता तुम्ही तिथे जावे असे वाटत नाही, ते काम हे कर्मचारीबंधू रोजच करतात, नीट करतील असा विश्वास ठेवा नि घरी जा. दीडवाजता त्या घरी पोहोचल्या तोवर आईचाच काय माझाही धीर सुटायला आला होता... 


दारातूनच तिने तिचा मोबाईल पडून फ़ुटलाय हे आईला दाखवले नि गेली शुचिस्नानाला. मी म्हटलं, किती दुर्दैव, आम्हाला काय करावे सुचेना, एक मोबाईल नीट असला असता तर विचारून कोणीतरी मदतीला पाठवू शकलो असतो, टेन्शन कमी झाले असते. तिने सहज सांगितले, तसं कसं? बाबा हिशेब चुकता न करता बरे जातील? मोबाईल वाजला की तो घ्यायला हात सरसावतात नि सर्जरी झालेय तर हालचाल नको व्हायला हाताची म्हणून हट्टाने मी त्यांचा काढून घेऊन सोबतच्या माणसाकडे ठेवायचा नि कामापुरताच त्याना द्यायचा असे त्यांच्या मनाविरुद्ध केले ना... त्यांनी पडल्यापडल्या केली जादू, गेला माझाही मोबाईल कामाच्या वेळी संपावर...


बाबांच्या मुलींनी त्यांचे तत्त्वज्ञान जगले आहे असे मनात आल्यावाचून राहत नाही. माणूस धट्टाकट्टा, सरस्वती मेंदूमध्ये वास करत होती नि स्वकष्टाने जोडलेली लक्ष्मी हातात. त्यांच्या शिक्षकांसह हे अनेकांचे मत. त्यामुळे कालपासून फोन येताहेत त्यात बहुतेक जण काकांच्या बुद्धिमत्तेने दीपून गेलेले, त्यांच्या शिकवण्याने करिअर घडलेले असेच आहेत. बहुविध क्षेत्रातील त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल दुमत नाहीच. जीवनाचे तत्वज्ञान मात्र विचित्र होते त्यांच्या. पण नियतीने मृत्यूनंतरही साथ द्यावी इतके त्यांचे संचित होते.


बिनलग्नाच्या मुलींचे काही करायचे नसते, मेल्यावर त्यांना भडाग्नी देऊन जाळून टाकायचे असेच शास्त्रात लिहिलेय असे म्हणायचे. अलिकडेच मी आणि आईने देहदानाचा फ़ॉर्म भरलाय त्यामुळे माझ्याबाबतीत तरी त्यांना तसे काही करता येणार नाही. मी शिक्षिका म्हणून जगले तर मरणोत्तरही मेडिकलचे विद्यार्थी, ती मुलेच करतील त्या देहाचे काय त्याना हवे ते, असे मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी हे सगळे देहविच्छेदनवगैरे शास्त्राप्रमाणे नाही आणि पर्यावरणपूरकही नाही म्हणून त्यांना तसले काहीही चालणार नाही असा त्रागा केला. बायकोला तर मीच मंत्राग्नी देणार असे त्या भरात बोलून गेले. आमच्याघरी आमच्या तुलनेत आईबाबा सशक्त नि त्यांच्यामध्ये बाबा तर मजबूत. त्यामुळे कोण कधी जाणार हे कुणाला माहित असा विचारही त्यांना शिवला नाही. मी फ़क्त आपल्या देहाचे काय करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे म्हटले. 


ते इंजिनिअर होतेच, अल्टरनेटीव्ह मेडिसिनचेही उत्तम उपयोजन करत. वैदिक संस्कृतही शिकलेले. संतवाङ्मयाची अभ्यासक म्हणून नाव कमावलेली पंडित आवळेकरांची शिष्या प्रा डॉ विजया तेलंग, आमची विजुमावशी, काल सांगत होती की तिला जी ज्ञानेश्वरी येते ती बाबांनी तिला चिद्विलासवाद समजून सांगितल्याने... हा म्हणजे मलाही धक्का होता... गणिती म्हणजे हायर मॅथेमॅटीक्सचे ॲप्लिकेशन्स त्यांच्याकडून शिकावे. शिवणकाम म्हणजे कोट-पॅंट अशा प्रोफ़ेशनल चीजा शिवण्यापर्यंत, स्वयंपाक म्हणजे पुरणा-वरणाचा किंवा मनात येईल त्या क्षणाला लाडू-बर्फ़ी करून खाणे, तसेच गवंडीकाम, लोहारकाम, सुतारकाम, बागकाम असे जगण्याला जे जे लागते ते ते सगळे त्यांना उत्तम दर्जाचे येत होते, त्याबाबत त्यांची तुलना करायचीच झाली तर माझ्या मनात हेन्री डी थोरोचेच नाव येते. 


कोणत्याही कामावर नेमलेल्या माणसापेक्षा यांची अक्कल जास्त, मग गड्याचे चुकले म्हणून वाद अशामुळे सर्व गोष्टी ते आजही लागतील तशा स्वत:च करत होते. या सगळ्यांत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, तशी कोल्हापूरला प्रथाच आहे मृतदेहाला गती देण्यात पुढाकार घेण्याची... त्यात हे पुढे. नातवाईकासाठी तर जातीलच, पण ओळखीतले, गल्लीतले कोणीही गेले की घरी सांगावा असे, मग रात्र-दिवस, सणवार असे काही नाही. ते लगेच काशीयात्रेला जाऊन येतो म्हणून निघायचेच. त्यांच्या शारिरीक उंचीला मॅचिंग जोडीचे मिळाले नाही तर त्यावेळेस खांदा देणे त्यांच्याकडे यायचे नाही. आल्यावर हे स्मशानगप्पा ऐकवणार... मला आणि आईला कसेसेच वाटायचे... म्हणजे अंत्ययात्रा हा काही नंतर बोलण्याचा विषय नाही, ते आवश्यककर्म म्हणून केले नि संपला तो विषय असे हवे. पण त्यांच्यामते एवढं काय त्यात? मेल्यावर लाकूड ते, जाळून यायचं... मडकं धरणार्‍याचा हात धरून कसं सगळं नीट शास्त्राप्रमाणे पार पाडलं हे सांगण्यात फार रस... मी तो विषय दु:खद आहे म्हणून टाळायचा असे म्हटल्यावर तर त्यांनी पुन्हा एकदा गीतेमधले काय काय उद्धृत करून मेलेल्या कोणाहीसाठी रडा-बिडायचे नाही, शांतपणाने गीतापठण करायचे हे अनेकदा वदवून घेतले होते. कधीतरी माझ्या प्रिय शिक्षकांच्या प्रस्थानानंतर मी प्रयत्न केला होता तसा पण तो पूर्णत्वास गेला नव्हता. काल बाबांची वेळ झाली तेव्हा मला नक्की डिटेल्स कळले नव्हते तरी ज्या घाईघाईत वंदनाने गणपती विसर्जन केले असे आईने सांगितले त्यावरून मी तयारी केली. मध्यरात्रीपर्यंत अगदीच न रडता असे म्हणता येणार नाही तरी धीराने संपूर्णगीतापठण केले. त्यांनी ते का सांगितले होते हे थोडेफार कळले असे त्या अनुभवावरून म्हणता येईल. 


स्वत:चे और्ध्वदैहिक वैदिकपद्धतीने व्हायला हवे आणि मुलगाच त्यांना गती देणार अशी समजूत असल्याने मुली हा काही त्यांच्यालेखी मोक्षास उपयुक्त विषय नव्हे :) नियतीने वंदनाला पुढे करून थोडी झलक दाखवली. सध्या सीपीआरमधून देह आला तर विद्युतदाहिनीतच मुक्ती असे मला वाटत होते. त्यामुळे वंदनाने चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो, त्यासाठी तयारीत असायचे असे म्हणत बाबांना जगवण्यासाठी टोकाची खटपट केली याबद्दल तिला सलाम केला, जे कोणी त्यांच्या आजारपणात झटले त्या अगदी दाहिनीपर्यंत त्यांची सोबत करणार्‍यांसह सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली नि सगळे संपले असे ठरवले. गीतापठण नि हा नमस्कार यात और्ध्वदैहिक संपले असे मला वाटले पण...


नियतीने मलाही झलक दाखवायचे ठरवले होते, किरण, बाबांचा आवडता नात्यातला हुशार मुलगा, तो किंवा खरे तर त्यांच्या घरातील सगळेच मदतशील आणि गुणी आहेत. बांबांवर अग्निसंस्कार करण्याची त्याची कमिटमेंट कोव्हिडकाळातही होती हे आम्हाला सकाळी त्याच्या फोनवरून कळले. विद्युतदाहिनीत नेले असते तरी तो पीपीई किट घालून तिकडे जाण्यास सिद्ध होता पण पहाटेपर्यंत वाट बघूनही त्याला निरोप मिळाला नाही... खट्टू झालेला तो सकाळी स्मशानभूमीत निदान अस्थी घेऊन पुढचे तरी करणारच म्हणून गेला तर आश्चर्याची गोष्ट किरणच्या हस्ते जे व्हायचे होते ते करून घेण्यासाठी तो देह अजून राख व्हायचा राहिला होता... आता तर आम्ही त्यात नसलो तरी तो त्यांचे रक्षाविसर्जन आणि काय काय करण्यासाठी आहे... शेकडो लोकांना निस्पृहपणे घाटावर पोहोचवून आलेल्या या माणसाला पोहोचवायला घरचे कोणी नसावे अशी काय ही परिस्थिती असे मनात आलेले, तो सल संपला...


नीट घर असावे, कपडे असावेत असे त्यांना वाटले नाही. पण लायब्ररी, टीव्ही, स्मार्ट फोन या चीजा ज्ञानार्जनासाठी गरजेच्या म्हणून होत्या. उत्तम पारंपरिक पदार्थ सणाला नि एरव्हीही करून खायची हौस असलेल्या या माणसाला शेवटच्या दिवशी उपाशी जावे लागले याचेच तेवढे दु:ख. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर ते गणपतीच्या आदले दिवशी दवाखान्यातून सुटले असते. दुसरी ठरली म्हटल्यावर, दवाखान्यात असलो तर काय झालं? डब्यातून मोदक पाठवा तीन-चार तरी, उगं नैवेद्य वाढल्यासारखं नको असे भाचेसुनेस म्हणालो आणि तिनं पाठवले, खाल्ले, दुसरी सूनपण संध्याकाळी पाठवू का म्हणाली तर दोन दिवसांनी पाठव म्हटलंय, इथंवर हौसेने फोन करून सांगितलेलं... मी म्हटलं त्यांना आवडतात तर लाडू वगैरे करवून घेूऊ म्हणजे दवाखान्यात खातील तर त्यावर मला कळलं की ऑलरेडी किरणच्या बायकोने आणि आईने डिंकाचे, रव्याचे लाडू, चिवडा, चकली असे सगळे पाठवले आहे आणि ते हौसेने त्यातून खातात. सुनांनी पण डब्यातून काय पाठवू ते सांगा म्हणून विचारलं, शेजारी बसून भरवलं, काही नाही म्हटलं नाही हे त्यांचं भाग्य. त्यांच्या घरातील अनेक ज्येष्ठांचा त्यानी कर्तव्यभावनेने प्रतिपाळ केला त्यात 102 वर्षे जगून अगदी दोनेक वर्षांपूर्वी गेलेले त्यांच्या मामीचे भाऊ ही होते. ती त्यांची पुण्याई फळली असावी...


किरणच्या सगळ्यात धाकट्या चुलतभावाचे नाव चारूदत्त हे त्यानी हौसेने ठेवलेले. त्याला तर ये म्हणून त्यानी दवाखान्यातून फोन केला तर गावाला गेलेला तो पाऊस म्हणूनसुद्धा न थांबता गाडीवरून दवाखान्यात हजर. अतिविद्वान आणि चार माणसांसारखे संसारात राहण्याची सवयच नसलेल्या या माणसाचे बोलणे अर्थातच आग्रही, तिरसट असे. तरी उत्तम चारित्र्य या एका गुणामुळे शेवटपर्यंत त्यांना माणसांची कमी पडली नाही. 


बाबांच्या मालकीची अनेक घरे आणि दुभत्याचा धंदा त्यांच्या आवडीचा असूनही आमच्या नशिबी आईच्या पगारात बसेल त्या भाड्याच्या घरात राहणे आणि दुकानातले दूध असेच होते. लौकिकार्थाने त्यांनी आम्हाला काय दिले? यावर, बाबांच्या ज्ञानाचा प्रकाश इतरांना आणि त्यांच्या दीप्तीची झळ आम्हाला असे तू कितीही म्हणालीस तरी सरासरीपेक्षा पुष्कळच चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण आपल्या क्षेत्रात टिकून आहोत, पटले नाही तर पटत नाही हे सांगण्याची आपल्यात धमक आहे, भरपूर गोष्टी, कला, विद्या सहज आत्मसात होत असल्याने आणि त्याहीपेक्षा ऐहिकाचा सोसच नसल्याने अमूकच इतक्याच पगाराचीच नोकरीच टिकवलीच पाहिजेच असेच काहीच नाहीच. या आणि अशा अनेक चीजा रामचंद्र साळगांवकर जीन्समधून आपल्याला मिळालेल्या आहेत त्या त्यानी देऊ म्हणता दुसर्‍या कोणाला देता येणार नव्हत्या त्यांना... त्या चीजांसाठी आपण त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे, इति वंदना. 


अतिपारंपरिक विचार, घरच्यांचे ऐकून बायकोचा छळ किंवा मुलगाच हवा असा अट्टाहास, कोर्टप्रेम या नि अशा दोषांपायी त्यांच्यासारख्या बहुगुणसंपन्न मनुष्यास साधा संसार करता आला नाही. एका बुद्धिमान, सालस आणि खेळाडू स्त्रीच्या सर्व स्वप्नांना लग्नाने चूड लागली. तरी आईने त्यांना केव्हाच क्षमा केली आहे, त्यांच्या धाकट्या लेकीनेही... माझ्याकडे त्या दोघींइतका मोठेपणा नाही. आईने कैक वर्षे स्वत:चे आयुष्य पणाला लावले, वंदनाने बाबांच्या बहुतेक पहिल्या नि शेवटच्या ठरलेल्या दुखण्यात... त्या दोघींना सलाम म्हणून मला मोठे बनायचे आहे. मरणान्तानि वैराणि हे बाबांच्या लाडक्या गीतेतले वचन स्मरून त्यांच्या मला न आवडणार्‍या अतिरेकी गुणांशी असलेले माझे वैर मी आज मिटवून टाकले आहे. बाबांचे चांगले गुण घेऊन त्यात आपल्याकडचे चांगले मिसळून ते पुढे नेऊया...  


नैनं छिन्दन्ति शस्त्राणि हे त्यांचे आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान मी चारूदत्तला सांगितले तसे ते माझ्यासह सर्व वाचकांसाठीही आहे.  बाबा याच जन्मी संसारातून मुक्त होते, त्यांच्या अढळ श्रद्धेनुसार ते त्यांच्या लाडक्या भगवंताकडे पोहोचले असतील... आत्म्याच्या अविनाशित्वावरच्या बाबांच्या श्रद्धेचा आदर म्हणून कोणीही त्यांच्यासाठी श्रद्धांजली, सहवेदना, सांत्वन अशासारख्या भावना प्रकट करू नयेत अशी नम्र विनंती. जगाचे मला माहिती नाही पण ते ज्यांच्या सहवासात आले त्यांना तरी सभोवतीचा सरासरी बुद्ध्यांक कमी झालाय हे नक्की जाणवणार आहे, ती कमी भरून काढण्यासाठी आपण ज्ञानाची साधना करूया. 


सर्वे भवन्तु सुखिन:। सर्वे सन्तु निरामया:।

-अंबुजा

28/09/2020

Comments

Popular posts from this blog

"देवधर सर"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"रामचंद्रन साहेब"