मधुमामा

 मधुमामा

 

*कमिन्ससारख्या मोठ्या कंपनीत आणि नंतर वल्कन टेक्नॉलॉजीसारख्या एका मल्टीनॅशनल कंपनीत जवळजवळ चाळीस वर्षं काम केल्यानंतर आणि बऱ्याच अनुभवांतून गेल्यानंतर असं जाणवलं की मधुमामाने आपल्याला कॉर्पोरेट लाईफबद्दल जसं सांगितलं ते सगळं अगदी १००% खरं होतं. पीटर ‌ड्रकर, जॉन केनेथ गिलब्रेथ इत्यादी नामांकित मॅनेजमेंट कन्सलटंट्‌सच्या गोष्टी मधुमामाने वाचल्या असणं काही शक्य नव्हतं. पण त्या सगळ्याचा अर्क त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येत असे.


मधुमामा माझा दोन नंबरचा मामा! म्हणजे मनोहरमामानंतरचा मधुमामा आणि उल्हासमामा सगळ्यांत धाकटा. मधुमामाचा जन्म……………साली झाला. तसंच त्याचा मृत्यू………….साली झाला. अवघ्या……..वर्षांचं आयुष्य त्याला लाभलं. त्यात ठळकमानाने असं वर्गीकरण करता येईल की १९८२ पर्यंत म्हणजे त्याचा अपघात होईपर्यंत त्याच्या सक्सेसचा सरळसरळ वर जाणारा ग्राफ होता. त्याच्या अपघातानंतर मात्र लौकिकार्थने सक्सेसचा खाली जाणारा ग्राफ झाला.


तो म्हणायचा, ‘‘कोणाचाही फायदा घ्यायला हरकत नाही; पण गैरफायदा मात्र कधी घेऊ नका. फायदा-गैरफायद्यातली सीमारेषा खूप पुसट असते. पण जो फायदा घेत असतो त्याला मात्र ती नक्की कळते आणि कोणाचा गैरफायदा घेतला तर त्याचा त्रास मात्र तुम्हाला पुढे नक्कीच होतो!’’ तसंच तो म्हणायचा, ‘‘शंभर वेळा माफी मागा, शंभर वेळा पाया पडा; काय फरक पडतो? पण त्याने मोठ्यांना बरं वाटतं ना; त्या गोष्टी करत जा, गोड बोलत जा.’’


‘इचलकरंजी मॅटॅलॉए’ या कंपनीत मी पहिली नोकरी जॉईन केली. ती पंडितकाकांचीच कंपनी होती. आईने फोन केल्यामुळे मला लगेच जॉईन होता आलं. तर तेव्हा मी इचलकरंजीला संध्याकाळी अनेकदा मधुमामाच्या घरी जायचो. तर तो लेक्चर द्यायचा की, ‘नोकरी काय करतोस? आधी नोकरी सोड, धंदा कर.’ ते ऐकून मला थोडीशी गंमत वाटायची. पण आईने सांगितलं की मधुमामाकडे जाणं बंद केलं. कारण त्याचं ते बोलणं प्रभावी असतं आणि तू खरोखर तसं करशील. काही दिवस खरोखर मी त्याच्याकडे जायचं सोडलं होतं. पण तो फार आग्रह करत होता की, ‘तू नोकरी करू नकोस. आयुष्यातली दोन-तीन वर्षं तरी माणसाने धंदा केला पाहिजे आणि त्या धंद्यामुळेच त्याला स्वतःची ओळख होते.आणि स्वतःच्या क्षमता कळतात.’


मधुमामाचं लहानपण फारच गंमतीशीर आणि घडामोडींनी भरलेलं गेलं. आजोबांची ‘कुल्को इंजिनिअरिंग वर्क्स’ नावाची मोठी फॅक्टरी होती. तिथून तो, प्रभाकरमामा हे वर्नियार मायक्रोमीटर वगैरे इन्स्ट्रमेंटस् कुंपणावरून बाहेर टाकत. नंतर ती बाहेर विकत. मुंबईला जाऊन तीन-चार दिवस सलग चित्रपट पाहत असत. तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बारा. त्या वेळेला घरी जवळजवळ पन्नास-साठ मुलं असायची. त्यामुळे हे दोघं गेलेलं कोणाच्या लक्षात यायचं नाही. कुणाला वाटायचं ही दोघं पोखल्याला म्हणजे आजोळी गेली असतील, कुणाला वाटायचं दोघं पंडिकाकांकडे गेली असतील. पण मनोहरमामाला सगळं माहिती असायचं. ते दोघं आले की मनोहरमामा त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचा; नाहीतर म्हणायचा मी तात्यांना सांगतो.


लहान असताना एकदा खेळताना त्याच्या अंगठ्यावर मोठं फ्लायव्हील पडलं होतं आणि त्याचा अंगठा तुटला होता. पण कोणीतरी लगेच जाऊन हळद लावून त्याला तो अंगठा तसाच बसवला. गंमत म्हणजे तो परत नीट बसला. पुढे कधीही त्याला त्याचा त्रास झाला नाही. ही लोकांना दंतकथा वाटते पण ही खरी घटना आहे.


तसेच एकदा लहान मुलांची पैज लागली होती.तात्यांचे वडील दाजी हे अतिशय कडक स्वभावाचे होते.पैज अशी होती की ते झोपलेले असताना कात्रीने त्यांची शेंडी कापायची ! आणि मामाने ही पैज जिंकून दाखवली आणि अर्थातच पुढच्या परिणामांना तोंड दिले.


तसंच लहान असताना आमचे तात्याआजोबा सगळ्या मुलांना नवनवीन गोष्टी दाखवायला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असत. तर ते आम्हाला ऊसाचं गुऱ्हाळ दाखवायला घेऊन गेले होते. हा इतका चळवळ्या आणि धाडसी होता की त्याने गरम काहिलीत उडी मारली. त्याला बाहेर काढलं तर त्याला पूर्ण भाजलं होतं. पण त्यातून तो बरा झाला. 

आई म्हणायचा, ‘धंदा करायला असा धाडसी स्वभाव असायला लागतो. भले त्यातून होईल ते होईल. पण धाडस मात्र करायला लागतं.


लहान असताना म्हणजे अकरावी-बारावीत असताना त्याला एक मोठी खोली तात्यांनी दिली होती. त्याने तिथल्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक केल्या होत्या. बाहेर आल्या आल्या म्हणजे पायपुसण्यावर पाय ठेवल्यावर बेल वाजायची; दार उघडायचं. नंतर झोपताना अलार्म लावला की एक हात येऊन त्याला उठवायचा. तो चहा पीत नसे, कॉफीचं मशीन आपोआप सुरू व्हायचं. अशा अनेक पूर्णपणे ऑटोमॅटिक गोष्टी होत्या. म्हणजे चार्ली चाप्लीनचं जसं ‘मॉडर्न टाईम्स’मध्ये जसं दाखवलं होतं; त्याप्रमाणे जेवणाचं नाही पण इतर खूप गोष्टी त्याने ऑटोमॅटिक केल्या होत्या. ते बघायला लांबून लांबून लोक येत असत.


तात्यांनी माझ्या मते १९६० साली प्रत्येक मुलाला प्रत्येकी शंभर रुपये दिले होते. सांगितलं होतं, ‘आपापली आवडती गोष्ट घेऊन या,’ तर त्याने मोठी बैलगाडी बोलावून पूर्णपणे भरून मटार विकत आणले होते. तो म्हणाला, ‘मला मटार आवडतात.’


तो मला म्हणे, ‘‘जर तू नोकरीच करणार असशील तर नोकरीत राहून धंदा कर. धंदा म्हणजे एकदा तू शब्द दिलास तर तो कुठल्याही परिस्थितीत पाळायला हवा. कागदपत्र इत्यादींना काहीही महत्त्व नाही. तू दिलेला शब्द पाळण्याला महत्त्व आहे.’’  तसेच धंदा करणार असशील तर धंद्यात राहून नोकरी कर .या सगळ्याचं महत्त्व मला आता पटतंय.


मी पाचवीत असताना तो आमच्या सर्व नातेवाईकांना येऊन महाबळेश्वरला म्हणजे ऐश करण्याकरता घेऊन गेला होता. १९७५ साली त्याचा टर्नओव्हर ४० ते ५० लाख होता. त्या वेळेला त्याने माझ्याकडे चाळीस हजार रुपये दिले आणि सांगतिलं, ‘‘तू सगळ्याचा हिशेब ठेव. कोणी मागितले तर दे.’’ १९७५ सालातले चाळीस हजार म्हणजे खूप मोठी रक्कम! लोकांनी महाबळेश्वरला जाऊन खूपच धमाल केली. जादूचे शो बघणं, पाणीपुरी, भेळेच्या, आईस्क्रीमच्या मोठ्या गाड्या बोलावून ते सगळ्यांनी खायचं. संध्याकाळी वडिलधारी मंडळी ड्रींक्स घेत बसायची. त्या मैफिली खूप चालायच्या. चाळीस हजार जवळजवळ संपले आणि अजून पैसे मागवायला लागले. तर ती एक ट्रीप सगळ्यांच्या हृदयात कायम अविस्मरणीय म्हणून कोरलेली आहे.


कारण त्या काळात आमची परिस्थिती चांगलीनव्हती. म्हण

जे  साद्या होटल मध्ये वर्षातुन एकदा कधीतरी जायचो ! त्या काळात एवढं लक्झरियस राहणं सर्वांच्या कल्पनेबाहेर होतं. पण त्याला हौस होती. आपल्या नातेवाईकांनी एन्जॉय केलं पाहिजे असं त्याला वाटायचं. सगळ्या मावश्या, त्यांचे मिस्टर, कामगार  अशा जवळजवळ चाळीस-पन्नास लोकांना घेऊन तो गेला होता.


मी दहावी पास झाल्यानंतर त्याने मला शंभर रुपये दिले होते. ही १९८० सालची गोष्ट. तेव्हा मला म्हणाला, ‘‘तू काहीही आण,’’ तेव्हा खरेदी करताना माझ्या नाकीनऊ आले होते. कारण त्या काळी तीन रुपयांना वगैरे ‘अमर चित्रकथा’ वगैरे मिळत असे. मी जवळजवळ पंचवीस-तीस पुस्तकं आणली होती. त्यात ‘रशियन राज्यक्रांती अशी थोड्याशा मोठ्या लोकांनी वाचायची अशी पुस्तकंही होती. चि.वि. जोशींची ‘चिमणरावांचे गुऱ्हाळ’, ‘आणखी एक चिमणराव’ इत्यादी पुस्तकं मी विकत घेतल्याचं मला आठवतं. त्यांतली काही परवापरवापर्यंत माझ्याकडे होती. त्या काळी शंभर रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्याने ते पैसे खर्च करायचं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.


माझ्या सगळ्यांत धाकट्या बहिणीच्या-वासंतीच्या पहिल्या वाढदिवसाला तो आवर्जून आला होता. तेव्हा त्याचा बिझनेस खूप जोरात होता. त्याने मोठा बिस्किटाचा डबा आणला होता. त्यात वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीट होती , त्यांतली काही तुटलेली होती. मात्र तो डबा इतका सुंदर होता आणि बिस्कीटंही चविष्ट होती!


आयुष्यात उमदेपणा, पॉझिटिव्ह थिंकिंग दोन लोकांकडून मी शिकलो. त्यांत पहिला म्हणजे मधुमामा आणि दुसरे माझे चंदूकाका! मधुमामा लहान असताना शाळेत फारसा कधी जायचा नाही. त्याची शाळा खूप लांब होती. शाळेसाठी ठेवलेल्या बसच्या पैशांनी तो गारेगार वगैरे खात असे आणि चालत शाळेत जात असे. शाळेत, पुस्तकी शिक्षणात त्याला फार रस कधीच नव्हता. रोज तो कुठले तरी लांबचे आधीच गेलेले नातेवाईक गेले असं शाळेत सांगून शाळा बुडवत असे. त्याला फॅक्टरीत काम करायला खूप आवडायचं.


एकदा आमचे तात्याआजोबा शाळेत भेटायला गेले. शिक्षकांनी विचारलं, ‘कोण मधुकर प्रभाकर कुलकर्णी?’ म्हणजे त्यांना त्याचं नावही माहिती नव्हतं. कारण तो वर्षभर शाळेत गेलाच नव्हता!


आमच्या वडिलांनी मामा अकरावीत गेल्यानंतर त्याला पुण्याला आमच्या आजोबांकडे वर्षभरासाठी आणलं. आमचे आजोबा अतिशय शिस्तप्रिय तरीही प्रेमळ असे होते. दिवसभर मामाला वेगवेगळे क्लासेस लावले होते. कशीबशी तो अकरावी पास झाला. नंतर तो पॉलिटेक्निकमध्ये एक-दोन वर्षं शिकला. पण त्याचा कॉन्फिडन्स इतका होता की त्याने शेवटची परीक्षा न देता व्यवसायात उतरायचं ठरवलं.


पहिल्यांदा त्याने आप्पा म्हणून तात्यांचे मोठे बंधू होते त्यांच्याकडे सहा महिने काम करायचं ठरवलं. ते प्रत्यक्ष हातांनी खूप काम करत. तिथे त्याने ठरवल्याप्रमाणे सहा महिने काम केलं. नंतर त्याने पंडितकाकांकडे काम करायचं ठरवलं. तो गेस्टहाऊसवर जाऊन राहिला. त्याने पॅटर्नमध्ये काम करून खूप सेव्हिंग केलं. तसंच त्याने सिलेंडर लायनर डेव्हलप केले होते. ते एक्सपोर्ट करत होता. पुण्यातल्या खडूस माणसांना निवडून त्याने लायनर्स चेक करायला दिले आणि इंग्लंडला पाठवले. ‘पूर्ण ऍक्सेप्टेड नाहीत पण चालू शकतील. पुढचा लॉट पाठवा.’ असा इंग्लंडहून रिप्लाय आला. पण त्याने, ‘पूर्ण ऍक्सेप्टेड का नाहीत ते कळवा. नाहीतरी आम्ही पुढचा लॉट पाठवणार नाही,’ असं कळवलं. मग तिथून आलं की, ‘हो, पूर्ण ऍक्सेप्टेड आहेत; पुढचा लॉट पाठवा.’ तर त्याची कामाची पद्धत थोडीशी वेगळी म्हणजे पर्फेक्शनकडे झुकणारी होती.


काकांकडे असताना त्याला सिलेंडर डेव्हलप करायचं होतं. तर तो आणि त्याचे एक-दोन मित्र वर्कर म्हणून म्हैसूर किर्लोस्करमध्ये नोकरीला गेले आणि तिथे शिकून आल्यानंतर काकांच्या इथे सिलेंडर हेड डेव्हलप केलं. तेव्हा कस्लंटंट म्हणून एक जण आले होते. त्यांनी सांगितलं, ‘फाऊंडरला फरशी घालायला पाहिजे तर ते ओके येतील.’ काकांनी लगेच फरशी घालून दिली. तर मधुमामा असे वेगवेगळे प्रयोग त्या वेळेला करायचा.


त्याने सर्व कॅस्टिंगचे मशिनींग अलाऊंन्स खूप कमी केले आणि काकांच्या मशिनींग टाईममध्ये खूपच बचत करून दाखवली. त्यामुळे काकांनी त्याला जवळजवळ २४ लेथ मशिन्स स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी म्हणून भेट दिली !

लोकं असं म्हणत की त्याने काकांचे २४ लेथ पळवले पण तसं काही नव्हतं. ते दोघांच्यातलं म्युचुअल  अंडरस्टॅंडींग होतं. काकांना कुल्कोने भरपूर मदत केली होती. त्याची थोडीशी परतफेड म्हणून काकांनी त्याला ही मदत केली असावी. पण त्याचा स्वतःचा धंदा करायचा हा दृढनिश्चय होता. ऍम्बेसेडर गाडी घ्यायची असंही त्याने ठरवलं होतं. त्या काळात ऍम्बेसेडर गाडी खूप महागडी होती; पण त्याने ती घेऊन दाखवली. काकांकडे असताना त्याने लायनर एक्स्पोर्ट करायचं पहिल्यांदा धाडस केलं. काका म्हणत होते, ‘तू एफआयइमधूनच कर सगळं.’ पण त्याने सांगितलं, ‘मी माझी प्रिसिजन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू करून त्यातून करणार आहे,’ त्याप्रमाणे त्यानं सगळं करून दाखवलं.


नंतर परदेशातली एक रॉकिंग चेअर त्याला कुठेतरी बघायला मिळाली. तर त्याच्या मनात ती चेअर  भरल्यानंतर लगेच त्याने त्याची कॉपी करून ती स्वस्तातल्या स्वस्तात कशी करता येईल, हे सगळं करून अतिशय सुंदरपणे ती डेव्हलप केली होती. अर्थात त्याचं मार्केटिंग त्याला फारसं जमलं नाही. त्याने बऱ्याच लोकांना त्या चेअर्स फ्रीच देऊन टाकल्या. गंमत अशी होती की एखादी गोष्ट डेव्हलप केल्यानंतर त्यातल्या त्याचा इंटरेस्ट लगेच संपून जात असे; आणि लगेच पुढचं काहीतरी करायचं म्हणून तो वेगळ्या काहीतरी गोष्टींकडे बघत असे.


त्या काळात इंडस्ट्रीयल विश्वात तो ‘एम.के.’ म्हणून ओळखला जायचा. त्याचं डोकं खूप अफलातून आणि ऍडव्हान्स चालायचं. काही कास्टींगबरोबर त्याला टेस्टींग साठी टेस्ट बार पाठवायला लागायचे. दर वेळेला कास्टींगबरोबर ओतलेले टेस्ट बार ओके येतीलच याची काही गॅरंटी नसायची. काही वेळेला मार्जिनली थोडेफार कमी  रिझल्टस यायचे. तर त्याने एक अख्खी टेस्टबारची हीट नीट लक्ष देऊन ओतून घेतली होती. दर वेळेला कास्टींग पाठवताना त्यातले दोन-दोन, चार-चार टेस्ट बार तो पाठवत असे.


त्याकाळी किर्लोस्कर न्युमॅटिक्स चे  मॅनेजिंग डायरेक्टर लेफ्टनंट जनरल थोरात होते. हा माणूस मोठा अवलिया होता. असं म्हणतात की त्याची गाडी यायच्या वेळेला हडपसर रेल्वे क्रॉसिंगवर तो गार्ड रेल्वे लेट करत असे आणि थोरात साहेबांची गाडी पहिल्यांदा जाऊ देत असे. एवढा त्यांचा दरारा होता. ते शॉपमध्ये फिरताना दोन अल्सेशियन कुत्रे त्यांच्या पुढे असत आणि ते मागून फिरत असत. दरवेळेला एखाद्या माणसाला ते खूप झापत असत. दुसऱ्या वेळेला ते शांत होऊन परत त्यांचा राऊंड चालू होत असे. त्या काळात थोरात साहेब म्हणजे ‘टेरर’ असं होतं; पण एम.के. आणि थोरातांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध!

एकदा एक बंगाली माणूस म्हणला की, ‘‘एम.के., तुमचा बिझनेस वाढतोय तर आमची पण काहीतरी ग्रोथ होऊ द्या,’’ इनडायरेक्टली त्या बंगाली माणसाने काही पैसे मागायचा प्रयत्न केला; पण एम.के.ने थोरातांना सांगितल्यानंतर थोरात भयंकर भडकले. दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्या माणसाला कमी करून टाकलं.


त्याने त्या काळात आपटे रोडला म्हणजे पुण्यातल्या प्रसिद्ध जागेत एक टॉपचा फ्लॅट घेतला होता. त्या वेळेला त्या फ्लॅटमध्ये टबबाथ वगैरे सगळ्या सुविधा होत्या. गंमत म्हणजे हॉलच वरचं कव्हर पूर्ण काचेचं होतं; त्यावर एक कापडाचं कव्हर होतं. बटण दाबलं की ते बाजूला होई आणि वरती पूर्ण चांदणं दिसत असे. त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना असत. तो जिथे बसत असे ती खोली मात्र छोटीशी असे आणि त्याच्यात अनेक फाईल्स वगैरे ठेवायला जागा असे. त्या छोट्या खोलीची एक स्वतःची खोली असावी हे प्रत्येक ठिकाणी त्याचं होतंच.ती साधारण पायलट च्या केबिन सारखी दिसे.


जोशी वाड्यात असताना त्याचं जे ऑफिस होतं तिथे बिअरचे क्रेटच्या क्रेट होते. तिथे मी चौथीत असताना गेलो असता त्याने मला थोडीशी बिअर प्यायला दिली. म्हणाला, ‘‘पी पी काही होत नाही. हे गोमूत्र असतं. ते प्यायल्यानंतर माणूस शुद्ध होतो.’’


त्यानं जे लायनर एक्स्पोर्ट केले होते त्याला ‘पारखे पुरस्कार’ मिळाला होता. त्या काळी माणकापूरे घराण्यात कोणालाही काही पुरस्कार मिळाला नव्हता. त्यानेच पहिल्यांदा मिळवून दाखवला.


त्याचे विचार काळाच्या खूपच पुढे होते. मेकॅनिकल शॉप चांगलं चालू असताना त्याच्या लक्षात आलं की इथून पुढे कॉम्प्युटर हेच सगळं विश्व होऊन राहणार आहे आणि इथेच खरा स्कोप आहे. त्याने जवळजवळ साठ लाख रुपयांना एक एच.सी.एल.चा जवळजवळ खोली भरेल एवढा मोठा कॉम्प्युटर एवढा मागवला होता. त्या वेळेला त्याची किंमत साठ लाख होती. माझ्या मते त्याची क्षमता पाचशे एम.बी. एवढीच होती. ते मोठं अवाढव्य धुड आपटे रोडच्या एका खोलीमध्ये ठेवलेलं होतं. मामाने इंग्लंडहून कम्प्युटर मागवला नेमका तेव्हाच त्याचा अपघात झाला. त्यामुळे त्या साठ लाखांच्या कम्प्युटरचे बरेच हप्ते  भरायचे राहिले इत्यादी प्रकार झाले. त्याची मोठी पेन्लटी मधुमामाला भरावी लागली.


गंमत म्हणजे मेव्हण्यांसाठी अनेक गोष्टी करूनही अनेक मेव्हणे त्याच्याविषयी चांगलं बोलत नसत. ही गोष्ट मला नेहमी गंमतीची वाटे.


त्याच्याकडे त्या वेळेला जीवाला जीव देणारी अनेक माणसं होती. म्हणजे निंबाळकर, वाकणकर वगैरे. तशीच काही मंडळी थोडीशी चमत्कृतीजन्य असत. म्हणजे कुठे जॉब सोडलेला आहे, कुठे पटत नाही. पंडितराव म्हणून एक जण होते. डबल ग्रॅज्युएट बाहेगावकर म्हणून त्याचे जवळचे मित्र होते ते डॉक्टर होते. अशी नानाविध माणसं जमवायचा त्याला खूप छंद होता.


एकदा शॉप फ्लोअर गेला की काही वेळेला दोन-दोन, तीन-तीन दिवस तिथेच राहत असे. जेवण वगैरे तिथेच मागवून घेत असे. तिथेच येऊन न्हावी दाढी करत असे. सगळ्या वर्कर्सबरोबर तो जेवण शेअर करत असे.  नंतर एखाद्या हुशार माणसाला बोलावलं की त्याला आग्रह करून करून जेवायला घाल, तूप वाढ. आमरसात तूप घालून वाढायचा. त्याचा आग्रह थोडासा राक्षसी असे.


पैशांबद्दल त्याला कधीच आसक्ती नव्हती. एकदा पैसा फंडाचे ओगले  त्यांनी काच कारखाना उभारला होता. त्यांचा मुलगा मामाच्या चांगला ओळखीचा होता. तो एकदा मामाला म्हणाला, ‘मधु, एक काम कर. मला आत्ताच्या आत्ता चाळीस हजार पाठवून दे.’ मधुमामाने लगेच त्याला पैसे पाठवले. मामाच्या सोबतची माणसं म्हणू लागली, ‘अहो, त्यांनी परत नाही दिले तर?’

तो म्हणाला, ‘मग काय, गेले मग ते पैसे,’ खरोखरच त्याने फोन लावला की चाळीस हजार मिळाले का? खरं म्हणजे त्याच्या मित्राला पैसे मिळाले होते पण त्याने विचारलं, ‘कुठले चाळीस हजार?’

मधुमामा म्हणाला, ‘ठीक आहे, गेले ते!’


शाली मावशीचं लग्न त्याने फार थाटात लावून दिलं होतं. १९७० साल असेल. त्या वेळेला त्याने आलेल्या प्रत्येक माणसाला पाच-पाचशे रुपये खर्चाला म्हणून दिले होते. म्हणजे आताच्या काळातले जवळजवळ दहा-दहा हजार दिल्यासारखे आहेत. तसंच नंदा मावशीचं लग्न श्रीयुत मेढी रिअल इस्टेटमधले पुण्यातलं एक प्रसिद्ध नाव! त्यांच्याबरोबर जमवण्यात त्याचा खूप पुढाकार होता. त्याचा उत्साह मात्र कायम भरलेला असे.


विक्षिप्तपणा दाखवून द्यायची किंवा विसंगती करायची सर्व माणकापूर घराण्यातल्यांना सवय होती. लग्न झाल्या झाल्या हनिमूनला म्हणून तो पंडितकाका, सुधा काकू आणि ते दोघं काशीला गेले. तिथे सगळे गडू वगैरे सगळे संस्कार करून आले. नंतर तो कलकत्त्याला गेला होता. काकांकडून बाहेर पडल्यानंतर रमेशमामाबरोबर दोन-तीन वर्षं काम केलं. त्या वेळेला रमेशमामा एफआयचं काम करत होता. त्याने बाहेरचीही बरीच लोकांची कामं घेऊन एफआयचं काम कमी करायला सांगितलं. गणेश फाऊंडरही त्यावेळेला जगते का मरते अशा स्थितीत काकांनी ठेवली होती ती खूप प्रॉफिटमध्ये आणली; आणि दोघांनी म्युचल अंडरस्टॅडींगने सेपरेट राहायचा निर्णय घेतला. पण लोकांनी दोघांची खूप भांडणं झाली वगैरे पसरवलं. पण मधुमामाच्या प्रत्येक फंक्शनला म्हणजे आनंदच्या लग्नाला वगैरे, ते लग्न कोकणात झालं तिथेसुद्धा रमेशमामा आवर्जून आलेला होता.


काही दिवस रोज संध्याकाळी एम.के. आणि त्यांची मित्रमंडळी येत असत. रात्री उशिरा घरी येऊन, आरडाओरडा करून, घरच्या बायकांना पिठलं-भाकरी करायला लावत असत. पिठलं-भाकरीचा सगळ्यांनाच फार कौतुक! 


मधुमामा जेव्हा पुण्यात  शिकायला होता तेव्हाही त्याने, ‘मला रोज पिठलं-भाकरी मिळाली पाहिजे,’ अशी डिमांड केली होती.

त्या वेळचं पुण्यातलं सगळ्यांत पॉश रेस्टॉरंट ‘क्वालिटी’ म्हणून होतं. ‘ब्ल्यू डायमंड’ वगैरे सुरू नव्हती. त्यांना रोज पिठलं-भाकरी करून द्यायची म्हणून त्यांना ऑर्डर दिली होती. खास शेफ ठेवून ते रोज पिठलं-भाकरी देत असत. 


कुठल्याही फाईव्ह स्टारमध्ये गेल्यावर तिथे स्कॉच प्यायची आणि बाहेर पिठलं-भाकरी खायची असं सगळ्या मणकापूरकरांचा एक खाक्या असे.  


त्याच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वरच चालला होता. पण काय झालं कोणाला माहिती! तो रोज कोल्हापूरहून पुण्याला जायचं असे प्रवास करायला लागला. दिवसा कोल्हापूरला रात्री इचलकरंजी किंवा पुण्यात

वगैरे. एक दिवस तो आणि तीन-चार लोकं जात असताना त्याच्या गाडीला एक मोठा अपघात झाला. त्यात समोरचा आणि मागचा दोघं गृहस्थ गेले. तोही खूप जखमी झाला होता. त्याचा पाय मोडला आणि तो खूप गंभीर होऊन त्याला कराडजवळ ॲडमिट केलं. नंतर परत संचेतीमध्ये ॲडमिट केलं. जवळजवळ सहा महिने तो दवाखान्यात होता.

अर्थात, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. आपला सगळा व्यवसाय थांबवून तात्या*त्याच्याबरोबर राहायला आले. मात्र, त्याच्या पायात डीफेक्ट कायमच राहिला. त्यानंतर मात्र त्याच्या व्यवसायाने जसा म्हणावा तसा वेग परत घेतला नाही. त्याची टीम त्याला सोडून गेली असावी त्यामुळे चांगली लोकं पण राहिली नाहीत. पूर्वी त्याच्याबरोबर उल्हासमामा पण काम करत असे. डायरेक्टर म्हणून त्याला घेतलेलं होतं. तोही सोडून गेल्यानंतर विश्वासाचा एकही माणूस त्याच्याकडे राहिला नाही. जमवलेले पैसे भराभर खर्च व्हायला सुरुवात झाली. तो कागदाच्या एका कोपऱ्यापासून बारीक अक्षरात नोट्‌स काढत बसलेला असे.

मधुमामा सिगरेटची सहा पाकिटं एकेकाळी रोज ओढायचा. दिवसांत ३०-५० सिगरेट्‌स ऍशट्रेत रोपण केलेल्या असायच्या. त्यांतली एकही २५% पुढे जळलेली नसायची! दोन-तीन झुरके आणि सिगरेट उलटी. ती एक स्टाईल होती. शरीर निकोटीन मागत नव्हतं. रिकामी पाकिटं टेबलावर ढीग लावून ठेवलेली असत.

पण त्याच्या मुलाने-आनंदने त्याला सांगितलं, ‘मी पण आता सिगरेट ओढेन तुमच्यासारखी,’ तेव्हा त्याने त्या क्षणापासून

सिगरेट पुर्णपणेबंद केली. एवढा त्याचा स्वतःच्या मनावर जबरदस्त ताबा होता.


‍नंतर कालांतराने सुजाताचं लग्न निनाद वाळिंबे या धडपड्या युवकाबरोबर झालं. त्याने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं होतं आणि तो कॉलेजमध्ये सर्व्हिस करत होता. त्यांचा अतिशय यशस्वी संसार झाला. सुजाताही  विशेष म्हणजे जगप्रदक्षिणा करून आली. ती योगामध्ये खूप एक्स्पर्ट आहे आणि ती बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये शिकवत आहे.

राहुलने आई-वडिलांची खूप सेवा केली. तो सध्या आईबरोबर राहत आहे. तसंच आनंदने बरेच प्रयत्न केले. वेगवेगळे धंदे करून बघितले; पण शेवटी तो राजकारण या क्षेत्रात स्थिरावला आहे आणि तो काँग्रेसच्या औद्योगिक सेलचा प्रमुख म्हणून झपाट्याने स्वतःचा विकास करून घेत आहे.


मधुमामा  म्हणायचा, ‘माझा पाय मोडला ही आयुष्यातली सगळ्यांत चांगली गोष्ट झाली. कारण मी आधी वाहवत जात होतो. पण या गोष्टीमुळे कुटुंबीयांबरोबर फोकस करता आला आणि खरी किंमत कशासाठी आहे, कुणासाठी आपण काम करतो हे मला समजलं.’

कधीही तो माझं असं झालं, माझं वाईट झालं असं बोलला नाही. तो कायम आनंदी, उत्साही असायचा. शक्य तेवढी इतरांना मदत करायची असं त्याचं धोरण होतं. मेघा वगैरे सांगते-तिला पुण्याहून कोल्हापूरला बसवून देताना तो तिला काही पैसे द्यायचा. खिशातले सगळे पैसे काढून तिला द्यायचा. तो मोजायचा पण नाही किती पैसे दिले ते! 


आपटेरोडवर अनेक गुणी लोकांना ते शिकत असताना त्यांची मोफत राहायची सोय केली होती; त्यांना संधी दिली होती. खूप लोकांनी तिथून शिकून चांगलं चांगलं करिअर केली. त्यातला एक म्हणजे त्याचा मेव्हण्याचा मुलगा राजेश, नंतर एक जण शेअर होल्डींगमध्ये एक्स्पर्ट झाला. अंबुजा नावाची एक मुलगी, साळगावकरांची मुलगी अशी खूप मुलं तिथे शिकायला राहून त्यांनी करिअरमध्ये चांगली झेप घेतली.

रॉयलपणा किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा इतरांना मदत करण्याची क्षमता त्याच्याकडूनच शिकावी असं लोकं म्हणतात. त्याच्या संपर्कात आलेली लोकं आजही त्याची आठवण आली की त्यांना आदराने झुकावेसे वाटतं. कारण असा माणूस कधी झाला नाही आणि पुन्हा होणार नाही!

दोन-तीनदा मरणाच्या दारातून तो बाहेर आला. अनेक लोकांनी त्याला फसवलं. त्याची जी सपंत्ती होती ती खूपच कमी झाली. त्याचा पाय दुखत असणारच. एक पाय थोडासा अधू होता, त्याची लांबीही कमी झाली होती. पण कधीही तो कोणाबद्दल निगेटिव्ह बोलला नाही आणि स्वतःबद्दल करुणासुद्धा त्याने कधीही दाखवली नाही. तो कायम पॉझिटिव्ह राहिला आणि इतरांना मदत करत राहिला.


तो स्वतःविषयीच विनोद करायचा. ते गंमतीशीर असायचं. तो स्वतःचा एक पांढरा केस काढला की एक पैसा द्यायचा. नंतर आपटेरोडच्या त्याच्या घरी आंब्याच्या पेट्याच्या पेट्या आणलेल्या असायच्या. सगळ्या मुलांना तो आंबे खायला बोलावत असे. 


त्याचं सीमामामीशी लग्न ठरलं, तेव्हाही तो हाफपॅन्टच घालत असे. तो म्हणे, ‘पहिली फूलपॅन्ट मला बायकोने पैसे वाचवून शिवली.’ तो तिला लग्नाच्या आधी भेटायला गेला होता. सीमामामीच्या घराजवळ आल्यानंतर गाडीचं एक चाक गटारात गेलं. नंतर बाळूशा म्हणजे सीमामामीच्या भावाने आणि इतरांनी ते बाहेर काढलं. मात्र तो या घटनांवरही विनोद करत असे, ‘मी इंप्रेशन मारायला गेलो आणि काय झालं…..!’


मधुमामा म्हणायचा, ‘‘नोकरी जर करणारच असशील तर कुठल्याही प्रमोशन, फॉरेट ट्रीप या सगळ्याच्या भानगडीत पडू नको. सगळ्यांना ते दे. तू दिलेला शब्द मात्र पाळत जा. तुझ्याकडे एवढी पॉवर येईल की वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यायला लागले तरी विचार करून घे. एखाद्याला काढायचं असलं तरी आधी विचार करून ती गोष्ट कर, जेणेकरून त्या व्यक्तीचं फारसं नुकसान होणार नाही.’’ 

कॉर्पोरेट क्षेत्रातला हा त्याने दिलेला शेवटचा सल्ला होता.


त्याने जेव्हा तात्या आजोबांना सांगितलं की त्याला पुढे न शिकता व्यवसायात उतरायचं आहे तेव्हा तात्यांचे त्यामागचे विचार आणि मूल्यं काय होती माहिती नाही पण ते त्याला म्हणाले, ‘तू आता लग्न कर आणि नंतर जरूर व्यवसायात उतर.’ त्या आधी त्याला कोल्हापुरात उद्यमनगरात एक घर बांधायचं काम दिलं होतं. त्या वेळेला मामा रेल्वेने सगळीकडे फिरायचा. त्यामुळे त्याने रेल्वेचे पार्ट्‌स वापरून  तस घर बांधलं होतं. बरीच वर्षं ते घर वेगळा नमुना म्हणून होतं. त्याला जाळीजाळीच्या भिंती! त्यात वेणूताईंचा मोठा फोटा होता.


त्याचा ग्राफ एकदम चढत गेला आणि हळूहळू उतरणीला लागला. मला वाटतं त्यापेक्षा तो स्टेडी राहिला असता तर त्याने पैसे साठवले असते. तर तो अगदी आरामात राहू शकला असता. पण का कोणास ठाऊक, व्याजावर राहायची कल्पना त्याला अजिबात आवडत नसे. तो म्हणायचा, ‘‘चारु, तू पैशांवर पैसा मिळवू नको. बुद्धीवर पैसा मिळव.’’ आता तात्त्विकदृष्ट्या ते बरोबर असलं तरी आजकालच्या जगात ते अवघड आहे. कारण परिस्थिती सारखी बदलत असते. तुमचं नशीब कायम साथ देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे पैसे साठवून ठेवून राहणं हेच सगळ्यांत महत्त्वाचं! ज्याला कोट्यवधी मिळतात त्याला असे पैसे बाजूला काढून ठेवणं अतिशय सहज शक्य होतं.


मामा मात्र कधीच स्वार्थी नव्हता. जे पैसे आले त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याने खर्च केले. इतरांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. तो आठवला की त्याचा उमदेपणा, सगळ्यांना मदत करायची इच्छा, आपल्याबरोबर सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे ही भावना, आपल्या नातेवाईकांना अडचणीत न ठेवता मदत करायची त्याची इच्छा! त्याची कॉर्पोरेट लाईफमधली फिलॉसॉफी जी आजही म्हणजे जवळपास चाळीस-पन्नास वर्षांनंतर आजही वॅलिड आहे.

त्याच्या तरुणपणातले गुण, गोष्टी जास्त रंजक असल्या तरी मी त्याला जास्त काळ त्याच्या उतारवयात पाहिलं. तेव्हाही त्याचे टिकून राहिलेले गुण म्हणजे उत्तम मेमरी, माणसांत रमणारं कोमल मन, अनुभवांची शिदोरी, प्रचंड मित्रपरिवार, (जवळपास प्रभाकरमामाइतकीच) क्रॉसथिंकिंग…


त्याच्याबद्दल जेवढं लिहू तेवढं कमीच! त्याच्याविषयी मी अजून चौपट लिहू शकतो. बऱ्याचशा गोष्टी यात कव्हर झाल्या असाव्यात असं मी गृहीत धरतो. आणि त्याच्या स्मृतीला वंदन करून मी माझं लिखाण  आवरत घेतो.


💐💐🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

"देवधर सर"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"रामचंद्रन साहेब"