आशिष भीडे चारुदत्त कुलकर्णी

*आशिष भिडे*
  
2023 मे च्या शेवटच्या आठवड्यात मी  आशिषला जोशी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो . त्याची लिव्हर खराब झाली होती दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या . दाढी आणि केस खूप वाढलेले होते ,मी त्याला म्हणले अशिष तू लवकरच बरा होशील... त्याने हसून शांतपणे उत्तर दिले आता तसे काही वाटत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक समृद्ध आणि कृतार्थ जीवन जगल्याचे समाधान होते.

 आधी जवळजवळ महिनाभर तो पुण्यात एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या ICU मध्ये ऍडमिट होता . आमची भेट झाल्यानंतर तीन-चार दिवसातच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवसांमध्ये त्याने कंपनीतील आपल्या सर्व सहकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले, सगळ्यांशी मनमोरात गप्पा मारल्या, कामात सुधारणा कशी करता येईल याविषयी चर्चा केली. त्याच्या दृष्टीने त्याने  शेवटचे सर्व दिवस अतिशय  आनंदात घालवले.

साधारण चार वर्षांपूर्वी त्याची  एक  क्रीटीकल सर्जरी यशस्वी झाली होती . त्याच्या वागण्यात परत पूर्वीचा जोश दिसू लागला होता. पण नंतर कोणाची दृष्ट लागली,कोण जाणे . सर्व कामांचा ताण स्वतःवर ओढवून घ्यायची त्याला सवय होती.... त्याची तब्येत  परत ढासळायला लागली. जवळजवळ महिनाभर तो जुपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमीट होता. घरच्यांनी उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. पण शरीराने  असहकार पुकारला होता. परत ट्रान्सप्लॅनट करायला  दुसरा दाता मिळाला नाही.दोन्ही किडन्या निकामी झाल्या. हा गेलेला बरा, हाल तरी संपतील असे वाटू लागले होते. तरी आशिष जिद्दीने कंपनीचे सर्व काम करत होता! ICU तुन online meetings घेत होता. कम्पनीतील लोकांना भेटायला बोलवून चर्चा करत होता...

आणि तीन जूनला अचानक चारच्या सुमारास मिश्रा साहेबांचा मेसेज आला, Ashish Bhide is no more....दोनच मिनिटांनी आम्हा दोघांचे खास मित्र श्री अपशंकर यांचा फोन आला मी वैकुंठाला निघालोय ऑन द वे तुम्हाला पिकअप करतो. आम्ही पोहोचतोपर्यंत वैकुंठाला शेकडो लोक जमलेले होते. सर्व कामगार, सहकारी ,सप्लायर्स, कस्टमर्स, आशिषचे कॉलेजमधले मित्र जमले होते. तासाभरातच अंत्यसंस्कार पार पडला.
श्री राजेश मिश्रा आणि श्री चिंतामणी खाडे यांनी मनातील भावना  बोलून  दाखवल्या. आणि कंपनीच्या इतिहासातील एक पर्व संपले होते.


आशिषचा जन्म 14 डिसेंबर 1973 चा. त्याचे शालेय शिक्षण एका प्रख्यात कॉन्व्हेंट स्कूलमध्ये (St Xavier's) झाले. आशिष अतिशय हुशार आणि  तल्लख ! त्याच्या घरासमोरच एक खूप मोठी लायब्ररी होती .तो तिथून सर्व प्रकारची   पुस्तके आणून वाचत असे. अगदी  शेक्सपियरची नाटके, हिंदू धर्मग्रंथ रामायण महाभारत इत्यादी .  वाचनाची त्याला लहानपणापासून खूपच आवड होती .आणि शेवटपर्यंत तो नवीन नवीन पुस्तके बाजारातून विकत घेऊन घरी ठेवत असे. दहावीला त्याला आदर्श विद्यार्थी असा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या शाळेत असा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच मराठी विद्यार्थी होता. शाळेच्या बाहेर बोर्डवर त्याचे नाव लिहिलेले आहे आणि वर आणि खाली सर्व ख्रिश्चन मुलांची नावे आहेत! त्याला बॉक्सिंगचेही वेड होते आणि पुढचे एक दोन दातही त्याने त्यात घालवले होते. दहावीपर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स असलेल्या आशिषला कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र कॉलेजचे वारे इतके लागले इतके की बारावी मध्ये तो गणिताचा विषय क्लियर करू शकला नाही. त्या काळातील मुंबईतील तरुणांमध्ये हे कॉमन होते. हे सर्व पाहून त्याच्या आई-वडिलांनी मुंबईहून पुण्याला ठरवले, आशिष च्या दृष्टीने हा अतिशय चांगला निर्णय ठरला.

गवर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये दाखल होणे हा आशीषच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम निर्णय होता. तिथे त्याला श्री. पाकनीकर सरांसारखे शिक्षक भेटले, जे अत्यंत समर्पित आणि खूपच उत्साही होते. ते इंडस्ट्रीतून आलेले होते आणि ते विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष काम करायचे. आशीष लवकरच त्यांचा आवडता विद्यार्थी झाला आणि त्याला पण धातुविज्ञानाबद्दलची प्रचंड  आवड निर्माण झाली.

शेवटच्या वर्षात, आशीष बॅचमधील एक स्टार परफॉर्मर होता आणि सबंध महाराष्ट्रात 30 व्या क्रमांकावर उत्तीर्ण आला आणि इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात सीओईपीमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजमध्येही त्याने खूप चांगले काम केले आणि कुमिन्स इंडियामध्ये निवडला गेला. परंतु काही कारणाने तिथे जॉईन होऊ शकला नाही.

त्याने बजाज टेम्पोमध्ये हीट ट्रीटमेंट विभागात इंटर्नशिप केली होती, तिथेही त्याला खूप काही शिकायला मिळाले.

त्याने प्रख्यात  मेटलॅर्जिस्ट श्री. अरविंद लक्ष्मण जोशी यांच्या सल्लागार फर्ममध्ये काम केले आणि मेटलमधील विविध दोष आणि त्यांचे सुधारात्मक उपाय याबद्दल बरेच काही शिकला.

त्याने आपल्या मित्राच्या एका ट्रॅव्हल एजन्सीत काम केले आणि हौस म्हणून संपूर्ण भारतभर प्रवास केला. स्वयंपाक हा त्याचा आणखी एक छंद होता आणि तो आपल्या आईसोबत काम करायचा, जी काही काळ केटरिंग कंत्राटाचे काम करायची. विशेषतः बार्बेक्यू बनवण्याची त्याला आवड होती.

मला आशिषबरोबर झालेली पहिली भेट अजूनही आठवते. 12 डिसेंबर 2002 रोजी मी  व्हल्कन टेक्नॉलॉजी ही  कम्पनी जॉईन केली. त्याआधी मी कमिन्स इंडिया या कंपनीत जवळजवळ बारा वर्षे होतो. काही कारणामुळे आमचे डिपार्टमेंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आणि बऱ्याच लोकांना व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायला लागली. कॉलेजमध्ये शिकवणे, वर्तमानपत्रात लिहिणे असे बरेच उद्योग करून मी पाहिले, आणि एका मित्राच्या सल्ल्यावरून  वल्कन टेक्नॉलॉजी ही जर्मन कंपनी जॉईन केली.

आठ एक दिवसांनी एक दिवस अचानक, एक हँडसम, गोरा,वेल ड्रेसंड उमदा तरुण माझ्याकडे आला. तो मार्केटिंगला होता. "माझं नाव आशिष भिडे. मला कळालं की तुम्ही कमिन्समधून आला आहात. आपण दोघे मिळून खूप काही डेव्हलपमेंट करू शकतो," त्याने सुरुवातच खूप आश्वासक केली होती. आमची विचारसरणी , हलीच्या भाषेत vibes एकदमच जुळल्या.वास्तविक मला कास्टिंग डेव्हलपमेंटचा अनुभव काहीच नव्हता. मग आशिषने सर्व सूत्रे हातात घेतली आणि जवळजवळ दर आठवड्याला एक नवीन कास्टिंग डेव्हलप करत गेला!(इतर कंपन्यात तीन चार महिने तरी एका कास्टिंगला लागत असत.)अशी त्याने साधारण 
१०० एक कास्टिंगज डेव्हवलप केली.

आमच्या कंपनीतील अल्युमिनियम हाऊसिंग हा प्रकार  जर्मनीमध्ये sand कास्टिंगमध्ये तयार केला जात असे, परंतु आशिषने त्यांना ग्रॅव्हिटी डाय कास्टिंगमध्ये कन्व्हर्ट केले. त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी खूप वाढली, कास्टिंगच्या प्रॉपर्टीज सुधारल्या, किंमत कमी झाली, आणि सेंडचे वेस्टेज खूपच कमी किंवा बंद झाले. जर्मनीतील metalurgists जगातील सर्वात टॉपचे समजले जातात, पण त्यांनाही जमले नव्हते ते काम आशिषने लहान वयात करून दाखवले. तसेच रेनफोर्समेंट रिंग सारखे  अतिशय अवघड कास्टिंग त्याने डेव्हलप करून दाखवले. मला खंत वाटते की या बाबतीत मेटालर्जी कम्युनिटीकडून त्याचे पुरेसे कौतुक किंवा रिकग्निशन झाले नाही. खरं तर त्याने एक-दोन पेटंट्स घ्यायला पाहिजे होती, जे झाले नाही. आता राहून राहून वाटते की ते नक्षत्रांचे देणे त्याला द्यायला पहिजे  होते ते राहून गेले........

नंतर त्याने घेतलेल्या प्रत्येक  प्रोजेक्ट्समध्येही त्याला यश मिळत गेले. कमिन्स इंडियाच्या ऑइल सप्समध्ये असलेल्या समस्या त्याने सोडविल्या.काही अतिशय अवघड कास्टिंगज डेव्हलप केली. कॅटरपिलर ही जगातली एक प्रसिद्ध कंपनी आहे आणि तिला सप्लाय करणे हे अतिशय अवघड समजले जाते, पण आशिषने हा विडा उचलला, अनेक कास्टिंगज  डेव्हलप केली आणि त्यांच्याकडून प्लॅटिनम रेटिंग मिळवून दाखवले. वल्कन ही प्लॅटिनम रेटिंग मिळालेली ही भारतातील पहिलीच फौंड्री होती आणि जगातली सुद्धा पहिलीच.



श्री राजेश मिश्रा, मॅनेजिंग डायरेक्टर वल्कन टेक्नॉलॉजी यांचे आणि आशिषचे एका वेगळ्या पातळीवरचे संबंध होते. आशिषच्या यशा पाठीमागे श्री. मिश्रा यांनी त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्याच्या शब्दावर भरोसा ठेऊन केलेली लाखो रुपयाची गुंतवणूक यांचा फार मोठा वाटा आहे. श्री गणोरकर यांनी त्याला ड्रॉइंगचा अभ्यास कसा करायचा हे शिकवले. तसेच त्याचे कंपनीतील  सहकारी विशेषतः तुषार किरीट, नारायण वानखंडे ,डि के मोरे, महेश दिघे ,ओंकार जाधव ,ओंकार पवार, महेश गवते अभिजीत अवताडे,बयाजी आटपाडकर ह्या व इतर सर्व सहकाऱ्यांनी त्याला जीव तोडून मदत केली. श्री प्रशांत पटेल यांच्याकडून मार्केटिंग कसे करायचे हे तो शिकला.

 तो आणि मी जवळजवळ दहा वर्षे शेजारी शेजारी बसत असू. आमचे एकदाही कधी भांडण झाले नाही! कंपनीत कामाला येतना आमचा ग्रुप त्याच्या गाडीतून येत असे. राजेंद्र मेंगणे, व्ही एन गवांडे आणि मी. खूपदा  बरोबर बर्थोल्ड डॉन हा 
जर्मन गृहस्थ असे. गाडीमध्ये कंपनीतील कुठलाही विषय व्यार्ज होता. आम्ही  क्लासिकल म्युझिक , साहित्य ,खेळ यांच्या विषयी चर्चा करत असू. शास्त्रीय संगीत आशिषला खूप आवडत असे आणि  समजतही असे. तो तबला चांगला वाजवत असे.

 तरुणपणातील बऱ्याच  सामर्थ्यशील व्यक्ती वृद्यापकाळात पालापाचोळा  होऊन पडल्याचे आपण  पाहतो .त्यातील विरोधाभास आणि कारूण्य आपल्याला बघवत नाही, पण जी माणसे कारकिर्दीत शिखरावर असताना मरतात त्यांची ऐनबहरातीलच प्रतिमा लोकांच्या मनात कायम राहते .जसे जॉन लेनन,  मधुबाला,  मर्लिन मनरो... आशिषला बरेचदा एक स्वप्न पडायचे की तो हायवे वरून आपल्या गाडीतून निघाला आहे आणि समोरून एक ट्रक भरधाव वेगाने येत आहे आणि आशिष ने आपला वेग खूप वाढवून त्या ट्रकवर पतंगाप्रमाने धडक दिली आहे. तो खडबडून जागा व्हायचा आणि मनातल्या मनात तो घटनाक्रम रिवाईंड करून गाडीचा स्पीड कमी करून सुखरूप बाहेर यायचा....

 आता त्याला जाऊन एक वर्ष झाले. आता  आठवतोय तो एक उमदा, दिलदार, मदतीला कायम तयार असलेला सच्चा मित्र! जोपर्यंत त्यांने डेव्हलप केलेली लाखो ॲल्युमिनियम कास्टिंग जगभरात सगळीकडे कार्यरत आहेत, हा त्याने जगासाठी सोडलेला सोडलेला वारसा आहे असे म्हणता येईल. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरल्या अंतकरणाने आता माझे हे लेखन मी आवरते घेतो. माझा तर्फे आशिषला श्रद्धांजली वाहण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आपण सर्वांनी वेळ काढून लिखाण वाचले  याबद्दल खूप  आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात,ही विनंती.





Comments

Popular posts from this blog

"रामचंद्रन साहेब"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

"देवधर सर"