आर जी कुलकर्णी सर

"आर जी कुळकर्णी"
जन्मदिवस-१२/०२/१९२९
मृत्यू- ३१/१२/२००८

आमच्या नववीच्या परीक्षेनंतर दहावीचे वर्ग चालू व्हायच्या आधी सरांनी गणितासाठी स्पेशल क्लास घ्यायचं ठरवलं.  अनिल डेग्वेकर, नितीन कुंभोजकर, मंजुषा देसाई ,अनुराधा गुणे , संदीप जनवाडकर, सरांचा मुलगा श्रीधर आणि मी असे थोडेसे हुशार समजले जाणारे विद्यापीठ हायस्कूलच्या 1980 च्या बॅचचे विद्यार्थी  सरांच्या घरी वरच्या मजल्यावर जमुन हे क्लास चालत. "मी दरवर्षी सर्व गणिताचा अभ्यासक्रम विसरून जातो आणि  शिकवताना  विषय पूर्णपणे जणू नवीन शिकवायचा असे चालू करतो "असे सर  सांगत होते.  आम्हाला वाटलं सर चेष्टा करत असावेत! सर मोठ्या तळमळीने शिकवायचे. वेद, उपनिषद्  ह्याच्यातल्या गोष्टी  सांगायचे .त्यांची अशी इच्छा होती की प्रत्येक सद्गुणावर उपनिषदात असलेले गोष्टीचा दाखला देऊन एक पुस्तक लिहायचे. उदाहरणात श्रावण बाळा चा आज्ञाधारकपणा, तसेच अरुणी नावाच्या  एका मुलाने शेतामध्ये बांधात  स्वतः झोपून पाणी अडवले होते..  अर्थात ही इच्छा पूर्ण झाली का नाही हे माहीत नाही, पण नन्तर झपाटल्यासारखे त्यांनी श्रीकृष्णावर  सव्यसाची नावाचे एक छान पुस्तक लिहिले होते .सर्व शिष्यांना जमिनीवर बसावे लागे ते स्वतः लुंगी आणि बंडी अशा घरगुती पोशाखात शिकवत.  आम्ही मुले ( फक्त) समोरच्या ग्राउंड वर क्रिकेट खेळायला जात असू.

सरांच्या ह्या क्लासमध्ये गणित सोडून इतर सुद्धा खूप विषयांवर चर्चा होत असे. सर म्हणाले होते मी प्रवासात जात असताना एखाद्या गोष्टीचा विचार करतो.
 कागदावरचा  एक ठिपका हा विषय घेऊन त्यांनी जवळजवळ पंधरा-वीस मिनिटे बोलून दाखवले होते आणि त्याचा संबंध शेवटी अध्यात्माशी लावला होता! त्यांना आपल्या मुलाचा म्हणजे श्रीधरचा अभिमान होता, ते म्हणायचे स्त्री श्रीधर शाळेमध्ये पहिला दुसरा येत नसेल पण तो रोज भरपूर व्यायाम करतो , पोहायला जातो, सायकलिंग करतो या सर्व गोष्टी सुद्धा अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या आहेत! सर तेव्हा जे म्हणत होते त्याचे महत्त्व आत्ता आम्हाला कळते. ते म्हणायचे श्रीधर एका गावाहून दुसऱ्या गावात जाताना वाटेत त्याची सायकल पंचर होऊ दे, त्याला एखाद्या शेतकऱ्याच्या घरी आसरा घ्यायला लागूदे, आणि यातच त्याचे खरे शिक्षण आहे! तसेच त्यांची मुलगी शरयू ( विद्यापीठ शाळेमध्ये साडी नेसून येणारी बहुतेक एकच मुलगी होती )ही मेडिकलला शिकत होती, ते तिला सांगायचे तुझ्या दारातून कोणीही पेशंट विन्मुख होऊन   जाता कामा नये . पैशासाठी तू हा व्यवसाय करू नको. एकदा आम्ही खेळत असताना एक एक दारुडा आमच्याबरोबर भांडायला लागला आम्ही सगळे क्रिकेटच्या बॅट आणि स्टंप घेऊन पळून आलो! सर आमच्यावर खवळले "अरे तुम्ही सहा-सात तरुण मुले होता आणि एका दारुड्याला घाबरला ,मी तुमच्या वयाचा असताना आम्हा सहा जणांचा संबंध राजापूर वर वचक होता!"

आम्ही बसलेलो असलो तरी सर उभे राहून  शिकवायचे. त्या भिंतीवर एक विवेकानंदांचे आणि एक श्रीकृष्णाचे चित्र लावलेले होते. ते दोन्ही सरांचे आदर्श होते ते म्हणायचे तत्त्वज्ञानामध्ये विवेकानंद व व्यवहारात कसे वागायचे यासाठी श्रीकृष्ण हे तुमच्यासाठी आदर्श असायला पाहिजेत.

ह्या क्लासमध्ये सरांचा आवडता विषय म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. विवेकानंदांना परमहंसानी  कालीमातेचे दर्शन कसे घडवले, तसंच विवेकानंदांना मांसाहार करण्यास कसे प्रोत्साहन दिले, विवेकानंदांना प्राप्त असलेल्या काही सिद्धी; त्यातली  एक अशी होती की एखाद्या पुस्तकावर हात ठेवला की त्यातला सारांश त्यांना क्षणार्धात समजत असे.
या क्लास मध्ये सरांनी सांगितलेल्या काही गोष्टी अजून  ठळक आठवतात.

एका श्रीमंताचा एक मोठा वाडा होता त्यात कोणीहि येऊन राहिले तरी त्याची अतिशय चांगली व्यवस्था होत असे .असाच एक परक्या गावातील माणूस येऊन तेथे येऊन काही दिवस   आरामात राहिला. निरोप घेताना मालकाचे आभार मानावेत अशी त्याला फार इच्छा झाली, पण  कोण मालक तेच कळेना! मग त्याने एक युक्ती केली. त्याने एक मोठा दगड आणून दरवाजा समोर ठेवला येणारे अनेक माणसे त्या दगडावर दगडाला शिव्याशाप देत आतबाहेर करत  पण एक माणूस आला आणि त्याने तो दगड धडपडत उचलून बाजूला ठेवला. त्या अथीतिला लगेच कळाले की हाच त्या वस्तूचा मालक आणि त्याने जाऊन लगेच त्या माणसाचे आभार मानले!

सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुबक असे वर्तुळ नुसत्या हातानी काढणे. सर कुठलाही कंपास न वापरता नुसत्या हातांनी एक अतिशय एक परिपूर्ण असे वर्तुळ काढू शकत असत. त्यांनी मारलेल्या सर्व रेषा हाताने मारलेल्या असल्या तरी पट्टीने मारल्या प्रमाणे दिसत.  वर्गामध्ये गणित सोडून इतर बर्‍याच विषयांवर चर्चा चालत. सरांना कम्युनिस्ट लोकांचा अतिशय राग होता.  त्यांचे मुख्य काम म्हणजे सामान्य लोकांचा बुद्धीभेद करणे असे ते म्हणत .संदीप जनवाडकर हा सेल्फ मोटिवेशनने  त्या क्लासला जॉईन झाला होता. अनिल डेंग्वेकर हा  साक्षात  टीपकागद होता, एकदा वाचलेले आणि एकदा ऐकलेली गोष्ट त्याच्या डोक्यात कायमची कोरली जात असे . आणि त्याची analytical अबिलिटी जबरदस्त होती. सर म्हणायचे की श्रीधरवर काहीतरी चांगले संस्कार व्हावेत हा या क्लास चा उद्देश होता पण त्याबरोबर इतर चार हुशार मुलांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी तत्कालीन हुशार विद्यार्थ्यांनाबोलवले होते. क्लास जवळजवळ एक-दीड महिना चालला.सकाळी दहा ते बारा .क्लास संपल्यानंतरआम्ही सरांना वर्गणी काढून एक घड्याळ भेट म्हणून दिले होते. पण सरांना ते अजिबात आवडले नाही नंतर त्यांनी ते घड्याळ व आपले काही पैसे विद्यापीठ शाळेला भेट म्हणून दिले ! त्यांचा मोठा मुलगा नरेंद्र याच्या लग्नात तर त्यांनी पत्रिकेवर लिहिले होते की  "कृपया आहेर आणू नयेत आणल्यास स्विकारले जाणार नाहीत! " तरी लोकांनी अनेक पैशाची पाकिटे नरेंद्राच्या हातात जबरदस्तीने कोंबली. सर्व पैसे तिथेच ठेवून जायचे पण त्यावेळेला आलेल्या पाहुण्यात श्री जेरे शास्त्री हे एक कोल्हापुरातील प्रथितयश विद्वान आले होते.त्यानी सरांना सांगितले की आलेल्या लक्ष्मीचा अपमान करू नकोस !   त्यांचा मान ठेवून सरांनी ते पैसे घेतलेआणि नंतर कुठल्या तरी संस्थेला भेट म्हणून दिले.

सरांचा जन्म 12 फेब्रुवारी  1929  मध्ये एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव देशपांडे ,पण ते त्यांच्या सावत्र बहिणीला दत्तक गेले होते. त्यांची सावत्र बहीण त्यांच्या पेक्षा बरीच मोठी असावि. लहान असताना ते खूप जाड होते, ते गमतीने म्हणत की माझं पोट  जेवल्यानंतर जमिनीला टेकायचे !पण नंतर त्यांचा फिटनेस दृष्ट लावावा असा होता. वयाच्या पन्नास-पंचावन्नव्या वर्षी ते म्हणायचे अजून वेळ आलीच  तर चार-पाच लोकांना मी सहज लोळवू शकेन.  दत्तक  गेल्यानंतर त्यांना एक शेत व कोल्हापुरात एक घर मिळाले. त्यात त्यांनी शेवटपर्यंत वास्तव्य केले .ते त्या काळात बी एस सी झाले होते,तेसुद्धा गणितासारख्या विषयात! सर्व कॉलेजातून त्यांना शिकवण्यासाठी ऑफर आल्या होत्या ;पण त्यांनी शाळेत शिकून विद्यार्थ्यांची घडण करायची असा निश्चय केला होता . त्यासाठी त्यांनी बीएड केले .विशेष म्हणजे बी एड ला ते महाराष्ट्रात पहिले आले होते. आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार  त्यांना मिळाला . अर्थात ते पुरस्काराच्या मागे कधीच नसायचे. शाळेमध्ये मुख्याध्यापक होण्याची संधी असताना त्यांनी नम्रपणे नाकारली. अप्पा पेंडसे हे ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक  त्याचे  खास मित्र. संघाच्या विचारसरणीतून दोघांनी बाहेर पडून शालेय वयात  मुलांची जडण-घडण करायची असे दोघांनीही ठरवले.

सर्व कॉलेजमध्ये शिकवण्याच्या ऑफर्स नाकारून त्यांनी शाळेत शिकवायचे आणि मुलांवर चांगले संस्कार करायचे हेच आपले जीवनध्येय असे त्यांनी  ठरवले.विद्यापीठ हायस्कुल मध्ये कित्येक दशके ते संस्कार नावाचे एक हस्तलिखित लिहून शाळेच्या शोकेसमध्ये लावत असत. हिंदू संस्कृतीचा त्यांना खूप अभिमान ! विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप पगडा होता.

 तरुण वयात त्यांचे एक  गुरु होते.  एकदा ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना  विचारले की मला देशसेवा करायची आहे ,मी लग्न करू का नको? त्यांचे गुरू  अध्यात्मिक  क्षेत्रात खूप पुढे होते. ते म्हणाले तुला  ज्या अर्थी हा प्रश्न पडला  त्याअर्थी नियतीच्या मनात तू लग्न करावे असे आहे! तर तू आता ताबडतोब लग्न कर... लगेचच  त्यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या गोखले कुटुंबियांच्या सुमन नावाच्या सुंदर मुलीला त्यांनी माझ्याशी लग्न करशील का असे विचारले.  त्यांच्यामध्ये नाकारण्यासारखे काहीच नव्हते! अतिशय चांगली तब्येत,  तेजस्वी व्यक्तिमत्त्व, संघाचे संस्कार , त्याकाळात गणितात एमएससी झालेले  आणि बीएड ला पाहिले आलेले!  सुमन व तिच्या कुटुंबीयांनी त्यांना ताबडतोब होकार दिला आणि त्यांचे लग्न ठरले आणि झाले.
 ते गमतीने म्हणायचे हनिमूनला आम्ही पन्हाळ्याला गेले होतो आणि आमच्या बरोबर  शंभर दोनशे  मुले होती. ही मुले शाळेतील त्यांच्याबरोबर सहलीला गेली होती!
सरांनी नोकरी सोडून दुसऱ्या कुठल्याही मार्गाने पैसे मिळवले नाहीत. He was more focussed on clearing concepts rather than preparing for examination.  श्रीधरला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपली जमीन विकण्यासाठी ते तयार झाले होते. ते म्हणाले होते की मुलाचं शिक्षण महत्त्वाचे जमीन काय श्रीधर परत घेऊ शकेल ! पण श्रीधरने त्याला नम्रपणे नकार दिला आणि AMIE करून अवघड मार्गाने   डिग्री घेतली.

उन्हाळ्यात ड्यूक कींवा  तृषाशांती नावाच्या महाद्वार रोड वरील कोल्ड्रिंक्स हाऊस मध्ये सर सहकुटुंब आईस्क्रीम खाताना काही वेळा दिसायचे. ते रोज सकाळी उठून व्यायाम व योगासने करत असावेत कारण मी शाळेत असताना त्यांनी एकदाही रजा घेतलेली मला आठवत नाही !त्यांच्या सर्व रजा शिल्लक असायच्या आणि त्या वाया जायच्या! ते म्हणायचे मला लागतच नाही तर मी विनाकारण रजा कशाला घेऊ? शाळेत असताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता.  आपल्या विचारांशी तडजोड करायची त्यांची तयारी नसायची त्यामुळे सर्व मानाच्या पोस्ट पासून ते कायम चार हात दूरच राहिले! ते म्हणायचे मी जर मुख्याध्यापक झालो तर मी माझ्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना वागायला लागेल आणि ते कोणाला जमणार नाही! त्यामुळे मी आहे इथेच  बरा आहे!

सरांना एकूण चार अपत्ये. थोरला नरेंद्र. याने मार्केटिंग क्षेत्रात खूप प्रगती केली. दुसरी मुलगी नलिनी. ही इचलकरंजीला वेल सेटल्ड आहे. तिसरी शरयू. आम्ही पाचवीत असताना ती अकरावीला होती.  त्यावेळी शाळेत साडी नेसून येणारी ती बहुतेक एकच मुलगी होती. सरांच्या इच्छेनुसार ते मेडिकलला गेली. आणि शेंडेफळ श्रीधर.हा सरांचा थोडा जास्त लाडका ,आमच्या वर्गात होता.
त्याला बॉडी बिल्डिंग ,टेबल टेनिस, इतर मैदानी खेळ यांची खूप आवड.

सर रिटायर झाल्यानंतर आणि मी कोल्हापूर सोडल्यानंतर सुद्धा कित्त्येक वर्षे मी सरांकडे कोल्हापूरला आलो की न चुकता जात असे. का कोणास ठाऊक पण मला खूप चांगले वाटत असे. सरांच्या आजूबाजूला खूप पॉझिटिव्ह वाईब्ज असत .माझ्या मनाला खूप शांत आणि सकतात्मक वाटत असे. रिटायर झाल्यानंतर साधारण दहा वर्षांनी सुद्धा सर पूर्वी दिसायचे तसेच दिसत असत. त्यांनी मला गमतीत विचारले मी रिटायर  झाल्या सारखा दिसतोय का तुला? सुरुवातीला त्यांच्यावर आर एस एस च्या  विचारसरणीचा फार प्रभाव होता पण काही बाबतीत त्यांचे मतभेद असायचे. रिटायर झाल्यानंतर मात्र पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारात ते पूर्णपणे सामावून गेले होते .त्यांची अनेक शिबिरे ते अटेंड करत. हजारो लोक शांतपणे आणि नियोजनबद्ध  सर्व गोष्टी करत असत .कमालीचे शिस्तबद्ध आणि सौहार्दाचे वातावरण असावे  असे सरांच्या बोलण्यावरून वाटे. त्याच काळात सरांनी सव्यसाची नावाचे एक सुंदर पुस्तक श्रीकृष्णाच्या चरित्रावर लिहिले. त्यांच्याकडे एक छोटी टु व्हीलर आलेली होती . बहुतेक एम 80 असावी. तोपर्यंत त्यांचा मुलगा श्रीधर हा त्यावेळी कोल्हापुरातील एक प्रसिद्ध बिल्डर झालेला होता. त्याचे रंकाळ्यावर एक घर होतं. तेथे सर एकटे जाऊन  वीकेंडला रहात असत.

अशीच वर्षांपासून वर्षे जात होती. मी नोकरीसाठी पुण्यात राहत होतो , पण कोल्हापूरला आई-वडिलांच्या कडे वर्षातून एकदा तरी चक्कर असायची. आणि तिकडे गेलो की सरांच्या कडे कमीत कमी एकदा तरी चक्कर असायचीच. विशेष म्हणजे सर कायम बिझी असायचे .त्यांच्याकडे एक एम 80 होती. ती  घरात पार्क  केलेली असायची.  आणि एक फळी पायऱ्यांवर तिरकी  ठेवून ती ढकलत खाली आणायला लागायची. गीता प्रसार मंडळ, निरनिराळे स्वाध्याय मंडळाचे कार्यक्रम यात  सर त्यात खूप बिझी असायचे. तसेच रंकाळ्यावर च्या फ्लॅटवर जाऊन एखादा दिवस एकांतात राहणे त्यांना खूप आवडायचं. आणि एक दिवस असाच मी भेटायला गेलो असताना सरांना पोटाचा कॅन्सर झाला आहे असे मला कोणीतरी सांगितले .मी त्याला भेटायला गेलो त्यावेळी ते  खालच्या मजल्यावरिल देवघरात  देवाची पूजा करत  बसले होते. संपल्यानंतर ते भेटायला आले ,त्यांनीच मला धीर दिला . आपले दिवस काही मोजकेच राहिले आहेत अशी त्यांना कल्पना आली होती. 

एक दोन  महिन्यानंतरच ते गेल्याची बातमी आली... जाण्याच्या काही तास आधी ते त्यांच्या एका आवडत्या विद्यार्थ्यांशी तास दीड तास मृत्यू या विषयावर बोलत होते.

 ते देहाने जरी जगातून गेले  तरी ,त्यांचे विचार , त्यांचे आचार, त्यांची शिकवण मला तरी अढळ अशा ध्रुव ताऱ्याप्रमाणे  मार्गदर्शन करत आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या कित्येक विद्यार्थ्यांच्या   मनामध्ये  हीच भावना आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून मी माझा हा त्यांच्या विषयी चार शब्द लिहिण्याचा खटाटोप आटोपता घेतो.

2022: उपसंहार

सरांना जाऊन आज एका तपा पेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्या 1979 च्या सुट्टीतील क्लास मधल्या विद्यार्थ्याचे पुढे काय झाले हे बघ पाहूया .

अनिल डेग्वेकर हा दहावी नंतर कॉमर्सला गेला पण सहा महिने झाल्यानंतर तो परत सायन्सला आला. तो आयआयटी जेईई परीक्षेत भारतात 155 वा आला. त्याने मुंबई आयआयटीमध्ये एमटेक करून फिलीप्स हॉलंड मध्ये दोन वर्षे नोकरी केली. परदेशात राहणे सहज शक्य असताना त्याने भारतात परत यायचे  ठरवून पुण्यातील C DAC जॉईन केले.
आणि भारताचा पहिला सुपर  कॉम्प्युटर  परम तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा उचलला. 

मंजुषा देसाई ही त्रिवेंद्रमला  एमडी आयुर्वेद झाली आणि कॅलिफोर्नियाला स्थायिक झाली. Acuved  नावाचे क्लिनिक ती अमेरिकेत  चालवते आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस  करते . ती  कॉलेजमध्ये शिकवते आणि शिकवत असताना ती स्वतः डॉक्टरेट ॲक्युपंचर झाली . तसेच मेडिकल फिल्डमधील शब्दांना संस्कृत  प्रतिशब्द देणारी पहिलीच डिक्शनरी तिने विकसित केली .

नितीन कुंभोजकर याने स्वतःची इंजिनिअरिंग एक्सपोर्ट कंपनी चालू करून खूप यश मिळवले. जगात सगळीकडे त्याने भरपूर भ्रमंती केली आणि मित्रपरिवार जोडला. आता ऊस कापणिचे यंत्र तयार करण्याबाबत त्याचे संशोधन चालू आहे.

संदीप जनवाडकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व!  त्याने कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काही दिवस काम करून मोबाईल टॉवर्स मेन्टेनन्स मध्ये करिअर शिफ्ट  केले . तो मुंबईला राहून सध्या हे काम करत आहे. त्याने आयुष्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय धडाडीने यशस्वी करून दाखवले.

अनुराधा गुणे डॉक्टर झाली आणि आता ती भारती विद्यापीठात  फिजिओलॉजी डिपार्टमेंटची हेड आहे.

श्रीधर याने करिअरच्या सुरुवातीला  स्ट्रगल केला पण नंतर त्याला योग्य दिशा मिळाली. कोल्हापुरातील एक ख्यातनाम बिल्डर म्हणून तो ओळखला जातो. त्याने स्वतः स्पोर्टस् अकॅडमी चालू केली आणि स्वतः रोज दोन तीन तास खेळल्या शिवाय तो दिवस चालू करत नाही. त्याचा फिजिकल फिटनेस  वाखाणण्यासारखा आहे.

आणि सदरहू लेखक ,मी चारुदत्त कुलकर्णी, बी इ मेटॅलर्जी एमबीए असून पुण्यातील एका जर्मन कंपनीत हेड ऑफ क्वालिटी  आहे.

आता आठवतात त्यांच्या अभ्यासिकेतील    श्रीकृष्ण व विवेकानंद यांचे फोटो, त्यांची शिकवण्यातील तळमळ, त्यानी सांगितलेल्या भारतीय संस्कृती बद्दलच्या अनेक गोष्टी, त्यांचा भारतीय संस्कृतीबद्दलचा जाजवल्य अभिमान, त्यांची शिस्त, त्यांनी फळ्यावर  नुसत्या हातानी काढलेली  सुबक वर्तुळे. काही जणांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही त्रुटी किंवा दोष दिसलेहि असतील अर्थात ही जगरहाटी तर कोणालाच चुकलेली नाही.  ज्या संवेदनाशील वयात परदेशातील सर्व गोष्टी चांगल्या व भारतातील गोष्टी कमी दर्जाच्या असे वाटायचे त्या वयात त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती किती अभिमानास्पद आहे हे मनावर ठसवले. 

"एव्हरी डॉग हॅज हिज डे" अशी इंग्रजीत एक  म्हण आहे . सर ती खूप छान समजावुन सांगायचे. प्रत्येकाला दिवसाचे चोवीसच तास असतात पण तो त्या वेळात काय करतो, काय विचार करतो ,यावर त्याच्या जीवनाची क्वालिटी अवलंबून आहे.

 तसेच माणूस म्हणजे काय ही त्यांची एक गमतीशीर व्याख्या होती. जो सकाळी शरीर साफ करायला पाणी किंवा कागद वापरतो तो माणूस, बाकी कुठलाही प्राणी या कामासाठी कुठल्याही बाहेरच्या मीडियाचा आधार घेत नाही .अर्थात शरीर साफ करायचा त्यांच्या वेगळ्या पद्धती असतात . 
तसेच चांगले आणि वाईट ,किंवा सज्जन आणि दुर्जन  यांच्यातील संघर्ष अनादि कालापासून चालू आहे आणि पुढेही सतत चालूच राहील. यात कायम दुर्जनांची सरशी होती असे वाटते कारण ते संघटित असतात . सज्जन लोकांनीही संघटित राहिले  तर ते आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकतात. कलियुगात समूहाला आणि संघटनेला खूप महत्त्व आहे!

शेवट त्यांनी सांगितलेल्या एका गोष्टीने करतो. एकदा एका शिष्याने वेद उपनिषदे यांचा खूप अभ्यास करून त्याच्या गुरूला विचारले माझी साधना पूर्ण झाली आहे हे मी कसे ओळखावे? गुरूंनी सांगितले तू कुठल्याही परिस्थितीत सतत उत्साही रहात असशील तर तुझी साधना पूर्ण झाली आहे असे समज......

Comments

Popular posts from this blog

"देवधर सर"

" अरुण किर्लोस्कर/ अरुणसाहेब"

मनोहरमामा